"बेड आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर पुढील निर्णय घेऊ. मात्र, आता लॉकडाऊनचा निर्णय नाही. लॉकडाऊनविषयी कुठेही चर्चा नाही," अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
"संख्या वाढतेय. त्यामुळे निर्बंधांची नीट अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. निर्बंध पहिलं पाऊल असतं. निर्बंधांच्या बाबतीत कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगानं काम करत आहोत. निर्बंध कागदावर राहू नये असाच मानस महाविकास आघाडी सरकारचा आहे," असं राजेश टोपे म्हणाले.
मात्र, निर्बंधांबाबत रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, शाळा आणि कॉलेज यांना अद्याप हात लावला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
सध्याच्या RT-PCR मध्ये ओमिक्रॉनचं डिटेक्शन शक्य असल्याचंही टोपेंनी यावेळी सांगितलं.
यावेळी राजेश टोपेंनी बनावट लशीच्या मुद्द्यावर म्हटलं की, "कोविन अॅप केंद्रानं बनवलंय, लसीकरणाचं केंद्र ठरवतायेत, त्यामुळे बनावट लशीचा प्रश्न केंद्रानं सोडवावा."
कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं सर्वांच्या चिंता वाढवल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ पाहायला मिळत आहे.आज मुंबई महानगर क्षेत्रात 5631 नवे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं विविध प्रकारची पावलं उचलली जात आहेत. त्यानुसार राज्यात वेगवेगळे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.