"शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज चित्र वेगळच असतं," असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या आणि ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
महिला व बाल विकासमंत्री योशमती ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं, "शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर चित्र काही वेगळच असतं. शरद पवार काळाची गरज आहेत. कोणी कितीही तीर मारले तरी सरकार अस्थिर होणार नाही."
महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज पेक्षागृहाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. तसंच त्यावेळी क्रीडामंत्री सुनील केदार आणि खासदार नवनीत राणाही उपस्थित होत्या.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत असताना यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
भाजप आणि मनसे एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तीव्र शब्दांत टीका करत असताना दुसऱ्याबाजूला सरकारमधील मंत्र्यांनीच 'शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत आणि ते काळाची गरज आहेत' असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "यशोमतीताई, मला वाटतं शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे. त्याचा उपयोग संपूर्ण भारतात होईल. देता प्रस्ताव?" असा प्रश्नही त्यांनी यशोमती ठाकूर यांना विचारला.
काँग्रेसच्या काही आमदारांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय परिस्थितीची चर्चा करण्यासाठी ही भेट हवी होती, असं काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.
महाविकास आघाडीत काँग्रेस अस्वस्थ आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.