सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन विशेष न्यायालयाने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने राष्ट्रवादीसह मलिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
ब्राह्मण संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी स्वतःचे उदाहरण देत नवाब मलिक यांचा बचाव केला. ते म्हणाले, माझ्यावरही अनेक आरोप झाले होते. अनेकांनी तशी टीका टिप्पणी केली होती. अखेर ज्यांनी आरोप केले होते, त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधीमंडळात सांगतिले, की आम्ही जी टीका केली त्यात काहीच तथ्य नाही, आम्ही विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो. सर्व चित्र समोर आल्यानंतर नवाब मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल अशी मला खात्री आहे.
शरद पवार म्हणाले, की नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमबाबत न्यायालयाने जे सांगितले ते त्यांचे मत आहे, तो न्यायालयाचा निकाल नाही. न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतर आम्ही त्यावर बोलू. नवाब मलिक यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचे दाऊदशी संबंध नाहीत. त्यांच्या कटिबद्धतेबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. चुकीचा लोकांशी त्यांचा संबंध आहे यावर मझा विश्वास नाही.
सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाकडून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. नवाब मलिक यांचे दाऊद टोळीशी संबंध होते. मलिक जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. या प्रकरणी सुनावणी पुढे सुरू ठेवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. नवाब मलिक जाणूनबुजून या प्रकरणात सहभागी झाले होते. हे प्राथमिकदृष्ट्या पुराव्यांमध्ये समोर आले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.