मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ते माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून सांगितलं आहे.
संजय राऊतांनी हेर देखील लावले होते आणि आता ते त्यांचा छळ करत असल्याचे स्वप्ना यांनी पत्रात लिहिले आहे.
1034 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करून केली जात आहे. स्वप्ना पाटकर यांनी नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी स्वप्ना पाटकरांचे निवेदन वाचून दाखवले. निवेदनात स्वप्ना लिहितात मी माझ्या आईसोबत राहते. संजय राऊत माझा आणि कुटुंबाचा छळ करत आहे. माझी हेरगिरी करण्यात आली. 3 मे रोजी माझा पाठलाग झाला आणि त्यापूर्वी माझ्यावर हल्ला झाला. गुन्हा दाखल करून देखील काहीच झालं नाही. आता पर्यंत मी हजारो पत्र लिहून देखील मला अजून त्रास होत आहे. संजय राऊतांच्या एका गुप्तहेराला अटक देखील झाली तरीही संजय राऊतांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. संजय राऊतांनी मला धमकी दिली, शिवीगाळ केली.गाडीवर हल्ला करण्यात आल्या. पत्राचाळ प्रकरणात मी केलेल्या खुलाशामुळे त्यांना अटक झाली. माझ्या जीवाला धोका आहे. मला संरक्षण द्या. अशी विनंती आहे. अशा निवेदनाचे पत्र स्वप्ना यांनी नीलम गोऱ्हे यांना लिहिले आहे.
पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांवर स्वप्ना पाटकर यांनी मोठे खुलासे केल्यावर संजय राऊतांना अटक करण्यात आली होती. स्वप्ना आणि संजय राऊतांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. या क्लिप मध्ये अश्लील आरोप आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा स्वप्ना पाटकरांनी संजय राऊतांवर धमकी देण्याचे गंभीर आरोप केले आहे.