ऑनलाईन गेम खेळण्याची सवय कधीही चांगली नाही. ऑनलाईन मध्ये असे काही गेम आहे जे खेळून पैसे जिंकण्याची संधी मिळते. एकदा काय ते पैसे मिळू लागले की मुलांना त्याची सवय लागते आणि ते पैसे मिळवण्यासाठी काहीही करतात. असाच एक फ्रीफायर नावाच्या गेम मध्ये जिंकलेल्या 100 रुपयांसाठी काही अल्पवयीन मुले भिडली आहे .100 रुपयांसाठी एकाने चाकूने वार केला त्यात सहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सदर घटना जालना शहरातील मोतीबाग परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी आठ अल्पवयीन मुलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालनाच्या मोतीबाग परिसरात दुखी नगर मध्ये राहणाऱ्या फिर्यादीला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती. गेम खेळताना त्याची ओळख एका संशयित मुला सोबत झाली. 18 मार्च रोजी गेम मध्ये जिंकलेले पैसे त्या संशयित मुलाला देण्याचे ठरले. मात्र फिर्यादीने पैसे दिले नाही. यावरून त्या संशयित मुलाने फिर्यादीला फोन करून दमदाटी देत पैसे देण्याचे म्हटले. आणि त्याने फिर्यादीला ठरलेल्या जागेवर बोलावले. फिर्यादी आपल्या मित्राला घेऊन दुचाकीवरून त्या संशयित मुलाला भेटायला गेला असता संशयित मुलाने शिवीगाळ करत मारहाण केली. यावर फिर्यादीने आपल्या काही मित्रांना बोलवून घेतले आणि त्या मुलाच्या मित्रांनी चाकूने हल्ला करायला सुरु केले असता त्यात सहा जण जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आणि त्याच्या हल्लेखोर मित्रांचा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आठ जणांपैकी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. तर इतर चौघांचा शोध सुरु आहे.