शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्षही वाढताना दिसत आहे. एकीकडे राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मात्र, एका जिल्ह्यात शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटात परत आले आहेत. विशेष म्हणजे अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर या जिल्ह्यात दौरा केला होता.
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे सोलापूर उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताना मनोज पवार यांनी शिंदे गटाच्या सोलापुरातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच अक्कलकोट तालुक्यातील या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. आता हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत.
शिंदे गट हा दोन वर्षेही टिकणार नाही
शिंदे गटातून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर मनोज पवार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख हे एकदम निष्क्रिय माणूस आहेत. आपली पोळी शेकून घेण्यासाठी हे लोक शिंदे गटात गेले आहेत. शिंदे गट हा दोन वर्षेही टिकणार नाही. यांची लवकरच माती होणार आहे, अशा शब्दांत मनोज पवार यांनी सोलापुरातील शिंदे गटावर घाणाघात केला.
Edited By-Ratnadeep Ranshoor