अजित पवारयांनी ३१ जुलै पर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा भरण्याची घोषणा केली होती. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही फसवी घोषणा असल्याचा आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला.
अजित पवारांनी जी ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीतील रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे ती म्हणजे परिक्षा दिलेल्या उमेदवारांची भरती नव्हे, तर संस्थेत रिक्त असलेली पदे भरण्याची असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. एमपीएससी संस्थेमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी मुदत कशाला लागते, ती कधीही भरता येतात, असा आरोप करत ही फसवी घोषणा असल्याचे फडणवीस म्हणाले.