दोन दुचाकींच्या अपघातानंतर एक दुचाकी 50 ते 60 फूट पुढे फरफटत जाऊन दगडावर आदळली. या दुर्घटनेत दुचाकीवरून ट्रिपलसीट निघालेल्या तिघा मजुरांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. पुण्याजवळील कात्रज -देहूरोड बाह्यवळण महामार्गावर किवळे-विकासनगरजवळ हा अपघात घडला.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल दादाराव करे (वय 22), मंगेश शंकर कुंडगीर (वय 17 ), महादू लक्ष्मण केजगीकर (वय 29 , तिघे रा. डोंगरपिंपळा,ता गंगाखेड, जिल्हा परभणी) अशी मृत मजुरांची नावे आहेत. जखमींमध्ये मल्लया इरय्या स्वामी, शंकरय्या मलकय्या स्वामी यांचा समावेश आहे.
मृत मजूर हे परभणी जिल्ह्यातील होते. कामाच्या शोधात ते लोणावळा येथे गेले होते. हे तिघेजण एकाच दुचाकीवर पुन्हा आपल्या घराकडे जात होते. त्यांच्या दुचाकीची पुढे जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीच्या सायलेन्सरला धडक बसली. यात दुचाकीसह फरफटत पुढे जाऊन दगडावर दुचाकी आदळली. यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. जखमींना त्वरित देहूरोड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.