Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वरुण सरदेसाई कोण आहेत? उद्धव ठाकरे-नारायण राणे वादादरम्यान ते चर्चेत का आले?

वरुण सरदेसाई कोण आहेत? उद्धव ठाकरे-नारायण राणे वादादरम्यान ते चर्चेत का आले?
, गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (11:08 IST)
- प्राजक्ता पोळ
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यासाठी युवासेनेकडून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली.
 
नारायण राणे यांच्या जुहू इथल्या निवासस्थानाबाहेर युवासेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना आक्रमक शिवसैनिकांवर लाठीमार करावा लागला.
 
हे आंदोलन युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं. वरूण सरदेसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्रमकपणे आंदोलनाचे नेतृत्व करणारे वरूण सरदेसाई नेमके कोण आहेत? याबाबतचा हा आढावा..
 
आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ
वरूण सरदेसाई हे युवा सेनेचे सचिव आहेत. त्यांनी 'सिव्हील इंजिनिअरिंगचं' शिक्षण घेतलं आहे. ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. वरूण सरदेसाई यांचे ठाकरेंशी असलेल्या कौटुंबिक संबंधांमुळे त्यांचा युवासेनेत कायम दबदबा राहीला आहे.
 
पूर्वी राज ठाकरे हे युवासेनेचे अध्यक्ष होते. युवासेनेच्या मार्फत तरूणांच्या प्रश्नांना हात घालून ते सोडवण्याचं काम युवासेनेकडून केले जात होते. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर 11 वर्षांपूर्वी युवासेनेची जबाबदारी ही आदित्य ठाकरेंकडे देण्यात आली.
 
आता आदित्य ठाकरे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ युवासेनेकडे लक्ष देणं शक्य होतं नाही.
webdunia
यासाठी वरुण सरदेसाई यांच्याकडे युवा सेनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. पण अद्याप ही नियुक्ती झालेली नाही.
 
जर वरुण सरदेसाई यांना युवासेनेचे अध्यक्षपद दिले तर पहिल्यांदाच हे पद ठाकरे कुटुंबीयांच्या बाहेर दिलं जाईल.
 
आदित्य ठाकरेंचे प्रचारक?
आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीआधी राज्यभर जनआशीर्वाद यात्रा काढली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला होता.
 
या यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी वरुण सरदेसाई यांच्याकडे देण्यात आली होती.
 
त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा असल्याची पोस्ट पहिल्यांदाच वरुण सरदेसाई यांनी टाकली होती. त्यानंतरच आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार याची चर्चा सुरू झाली आणि त्यावर शिक्कामोर्तबही झालं.
 
सरदेसाई आणि वादविवाद
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सचिवांसोबत एक बरोबर एक बैठक बोलवली होती.
 
त्या बैठकीत आदित्य ठाकरेबरोबर वरुण सरदेसाई देखील उपस्थित होते. या बैठकीचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाले.
 
आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री आहेत मग वरुण सरदेसाई या बैठकीत काय करत आहेत? असा सवाल विरोधी पक्षाकडून उपस्थित केला गेला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर वरुण सरदेसाई यामुळे वादात सापडले होते.
 
काही दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे आयपीएलच्या पार्श्वभूमीवर बेटिंग रॅकेट चालतं असा आरोप केली होता. सचिन वाझे यांच्यामार्फत बेटिंग रॅकेट चालवणाऱ्यांना फोन करून 150 कोटींची खंडणी मागितली गेली.
 
या खंडणीमध्ये वरुण सरदेसाईंनी हिस्सा मागितला असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता.
 
या आरोपांमुळे वरुण सरदेसाईंचं नाव चर्चेत आलं होतं. शिवसेनेतंही खळबळ माजली होती. पण त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्याचबरोबर नितेश राणेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी म्हटले होते.
 
काही महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. त्या नेत्यांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, किरीट सोमय्या, राज ठाकरे अश्या अनेक मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. त्याचवेळी वरुण सरदेसाई यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा देण्यात आली. यावेळीही नितेश राणेंनी वरुण सरदेसाई यांच्यावर टीका केली होती.
 
24 ऑगस्टला नारायण राणे यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनादरम्यान वरूण सरदेसाई यांनी पोलीसांना शिवीगाळ केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. यासाठी त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
webdunia
भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अमर शहा यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक होऊ शकते मग वरुण सरदेसाईवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.
 
मनसेने वरुण सरदेसाई यांना 'सरकारी भाचा' म्हणत त्यांनी केलेल्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांना काही प्रश्नच विचारले आहेत.
 
त्यात चित्रे विचारतात,
 
'तिसरी लाट किंवा डेल्टा प्लसची पूर्वकल्पना असतानाही तथाकथित युवानेता श्री. वरुण सरदेसाई मेळावे घेऊन महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश देऊ इच्छितो? मराठी सण-समारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर होणारी आंदोलनांवर बंदी 'सरकारी भाचा' सभा कसा घेऊ शकतो?'
'राजकीय हेव्यादाव्यांसाठीही सरकारी भाच्याकडून आंदोलनं करताना गर्दी जमवली जाते, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या भगिनींना अत्यंत घाणेरड्या आवेशात शिवीगाळ केली जाते. महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तथाकथित युवा नेत्याला विशेष सवलत का?'
'सरकारी आदेशांचं उल्लंघन केलं म्हणून श्री. वरुण सरदेसाई ह्यांच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये? जनतेने समाज माध्यमातून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करूनही जर मेळावे होणार असतील तर श्री. सरदेसाई ह्यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये?'
'जनतेने समाज माध्यमातून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करूनही जर मेळावे होणार असतील ह्यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये? जनता निर्बंध पाळत नाही म्हणून आम्ही कडक लॉकडाऊन लावणार' आणि 'मी जबाबदार' म्हणून जनतेवर करोना महासाथीचं खापर फोडणारं सरकार'सरकारी भाच्या'वर इतकं उदार का?'
'कुणी भ्रष्ट किंवा बेशिस्त वागत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीचा तात्काळ बंदोबस्त करत मग अगदी आपल्या नातेसंबंधांतला का असेना,मग वारंवार शिवरायांचं नाव घेणारं हे सरकार 'बेशिस्त भाच्याचा' बंदोबस्त कधी करणार?'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तालिबाननं मलाला यांच्याबरोबर नेमकं काय केलं होतं?