कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच वर्षाच्या बालकाच्या हत्येची घटना समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी गावात ही घटना घडली आहे.
रविवार (3 ऑक्टोबर) रोजी मुलाचा शोध लागत नसल्याने अपहरणाची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण मंगळवारी (5 ऑक्टोबर) पहाटे घराच्या मागील बाजूस मुलाचा मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मुलाचा मृतदेह हळद कुंकू लावून फेकण्यात आला होता. त्यामुळं काही माध्यमांनी नरबळीची शक्यता वर्तवली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती नाही.
ही हत्या नरबळीसाठी झाली असावी या वक्तव्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी कसून चौकशी सुरू केली आहे.
हा मुलगा आपल्या मोठया भावासोबत गावातच आजोळी खेळायला गेला होता. तिथून संध्याकाळी पाचच्या सुमारास आरव घरी परतण्यासाठी निघाला मात्र सात वाजले तरी तो घरी परतला नसल्याने सगळ्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली.
अखेर रात्री अकरा वाजता घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
दुसऱ्या दिवशी दिवसभर पोलीस आणि गावकऱ्यांनी गावात आणि आसपास या मुलाचा शोध घेतला. मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर मंगळवारी पहाटे सहा वाजता घराच्या मागे त्याचा मृतदेह सापडला.
संबंधित घटनेत नरबळीच्या अनुषंगाने सत्यता आढळली तर संशयित आरोपींवर तात्काळ जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी देखील अंनिसने या निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान बालकाचं अपहरण करून खून करण्याची कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात कागल तालुक्यात बालकाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. मुरगूड येथील एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांचा मित्र असलेल्या मारुती वैद्य या आरोपीला ताब्यात घेतले होतं.
अज्ञातांविरोधात गुन्हा
हा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा शाहूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दृष्टीने सोमवारी दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, मंगळवारी पहाटे या मुलाचा मृतदेह सापडल्याने अज्ञात व्यक्तिविरुद्ध 302 अंतर्गत खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांची 8 पथकं कार्यरत आहेत. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी वारणा कापशी इथं श्वान पथकासह तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कोल्हापूरमध्ये सीपीआर रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी ही घटना निंदनीय असल्याचे सांगत घटनेचा निषेध केला आहे.
या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली आहे. 'शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी इथं अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना प्रथम दर्शनी नरबळी प्रकाराची असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या प्रकरणी स्वतंत्र विशेष पथक नेमण्यात यावे' अशी मागणी अंनिसने केली आहे.