थर्टी फर्स्टसाठी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये नशेबाज अमली पदार्थाची मागणी करतात. याच पार्श्वभूमीवर आंबोली पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ कोटीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. २० किलो इफिड्रीन नावाचं अमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहे.
आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे अगरवाल इस्टेट रोड परिसरात पाळत ठेवून सापळा रचला असता मध्यरात्री २. ४० वाजताच्या सुमारास दोन इसम पायी चालत येताना दिसले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पथकास त्या दोन्ही इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या अंगझडतीत ३ कोटी ४ लाख ५ रुपयांचा इफिड्रीन नावाचा अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अमली पदार्थ हस्तगत केला आहे. मोहम्मद इस्माईल गुलामहुसेन (४५) आणि दयानंद माणिक मुद्दानर (३२) या दोन्ही आरोपींनी हैद्राबादहून थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी हा अमली पदार्थ आणला असल्याचे चौकशीत निष्पन्न झालं आहे.