सिन्नरजवळ सोमठाणे येथे बिबट्याने हल्ला केल्यामुळे सतरा वर्षीय मुलगा जखमी झाला. त्याच्या डोक्यावर व छातीवर बिबट्याने पंजे मारल्यामुळे त्यास उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत वन विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की सोमठाणे येथे राहणारा सतरा वर्षीय युवक कृष्णा सोमनाथ गिते हा रस्त्याने जात असताना शेतामध्ये लपलेला बिबट्याने सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याच्यावर झडप घातली. त्यावेळी कृष्णाने आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावत आले. त्यामुळे कृष्णाला सोडून बिबट्याने धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनाधिकारी मनीषा जाधव व त्यांच्या कर्मचार्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली, तसेच कृष्णा गिते याला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी केलेली मागणी पूर्ण करीत असल्याचे वनाधिकारी मनीषा जाधव यांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वीच नाशिकरोड परिसरात आनंदनगर येथे बिबट्याने हल्ला केल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. त्या व्यक्तीला बिबट्याने गुरुवारी या व्यक्तीला दवाखान्यातून उपचारानंतर सोडण्यात आले, तर अगदी दोन दिवसांपूर्वीच आडगावमध्ये एका बंगल्यामध्ये बिबट्याने घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या दोन कुत्र्यांनी बिबट्याबरोबर झुंज दिली.
त्यामुळे बिबट्याने त्या बंगल्यातून पळ काढला होता. या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा सिन्नरमध्ये बिबट्याने युवकावर हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.