विकटो नाम विख्यात: कामासुरविदाहक:।
मयूरवाहनाश्चायं सौरब्रम्हाधर: स्मृत: ।।
विकट नावाचा प्रसिद्ध अवतार कामासुराचा संहारक आहे. मयूर त्याचे वाहन आहे. श्री विष्णू जेव्हा जालंधराची पत्नी वृंदाजवळ गेले तेव्हा त्यांच्या शुक्रापासून अत्यंत तेजस्वी अशा कामासुराचा जन्म झाला. त्याने शुक्राचार्यांकडे जाऊन त्यांना श्रद्धापूर्वक प्रणाम केला. शुक्राचार्यांनी त्याला शिव पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली. त्याने पुन्हा आपल्या गुरूला प्रणाम केला आणि नंतर तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला.
तेथे त्याने महादेवाला संतुष्ट करण्यासाठी अन्न, पाण्याचा त्याग करून पंचाक्षरी मंत्राचा जप करत तपस्या सुरू केली. अत्यंत कठीण परिस्थितीत कामासुराने तपश्चर्या केली. त्याने प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्याला वर मागण्यासाठी सांगितले. त्याने ब्रम्हाडांचे राज्य प्रदान करण्याचा वर मागितला. मी बलवान, निर्भय आणि मृत्युंजयी झालो पाहिजे याचीही मागणी केली.