युक्रेनला युद्धासाठी आतापर्यंत बिटकॉईन देणगीच्या माध्यमातून किमान $13.7 दशलक्ष एवढी मदत मिळाल्याचं क्रिप्टोकरन्सी तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ब्लॉक चेन अॅनालिसीस कंपनी इलिप्टिकच्या संशोधकांचं म्हणणं आहे की, युक्रेनच्या सरकारी, निमसरकारी आणि स्वयंसेवक संघटनांनी आपल्या बिटकॉईन वॉलेटच्या ऑनलाईन जाहिरातींमधून पैसे उभे केले आहेत.
आतापर्यंत 4 हजारहून अधिक लोकांनी युक्रेनला युद्धासाठी मदत म्हणून देणगी दिली आहे. एका दात्याने एनजीओला 30 लाख रुपये किमतीचे बिटकॉईन दिले आहेत, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
लोकांनी सरासरी 95 डॉलर दान केले आहेत.
शनिवारी (26 फेब्रुवारी) युक्रेन सरकारने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक संदेश पोस्ट केला. "युक्रेनच्या नागरिकांना साथ द्या. आता आम्ही क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातूनही देणगी स्वीकारत आहोत. बिटकॉईन, इथीरियम आणि अमेरिकन डॉलरच्या माध्यमातून दान द्या."
सरकारच्या आवाहनानंतर देणगी
सरकारने क्रिप्टो वॉलेटचा पत्ता पोस्ट केल्यानंतर 54 लाख डॉलर एवढी देणगी जमा झाली आहे. 8 तासांच्या आतच बिटकॉईन, इथिरियम आणि इतर क्रिप्टो करन्सीद्वारे युक्रेनला देणगी जमा झाली.
युक्रेनला युद्धात मदत करण्यासाठी ही रक्कम वापरली जाईल, असं युक्रेनच्या डिजिटल मंत्रालयाने सांगितलं. परंतु हे पैसे कसे वापरले जाणार हे मात्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
इलिप्टिकचे संस्थापक टॉम रॉबिन्सन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "काही समूहदान माध्यमं आणि पेमेंट कंपन्यांनी युक्रेनचं समर्थन करणाऱ्या काही गटांसाठी पैसे जमा करण्याची प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून पैसे जमवले जात आहेत."
शुक्रवारी (25 फेब्रुवारी) निधी उभा करणारी संघटना पेट्रियोनने घोषणा केली की, 'कम बॅक अलाईव्ह' या अभियानासाठीचा निधी थांबवला आहे. युक्रेनमधील ही एक एनजीओ असून 2014 पासून ते युक्रेनच्या लष्करासाठी निधी गोळा करत आहेत.
आमच्या निधीचा वापर आम्ही लष्करी कारवायांसाठी होऊ देत नाही, असं पेट्रियोनने म्हटलं आहे.
बदलती पद्धत
जगभरातच क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून निधी उभा करण्याची पद्धत लोकप्रिय होताना दिसत आहे.
घोटाळे करणाऱ्या टोळ्याही युक्रेनच्या सध्याच्या संकटाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकांना फसवून देणगी देण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
इलिप्टिकने सावध केलं आहे की, किमान एका सोशल मीडिया पोस्टमध्ये एनजीओच्या देणग्यांसाठीचं आवाहन कॉपी केलं गेलं आणि बिटकॉइन वॉलेटचा पत्ता बदलण्यात आला होता. त्यात त्यांनी त्यांच्या वॉलेटचा पत्ता टाकला असावा अशीही शक्यता आहे.
आतापर्यंत काय घडलं?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनमध्ये 'विशेष लष्करी कारवाई'केल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेनंतर युक्रेनची राजधानी कीव्हसह देशातील इतर भागांत स्फोटांचे आवाज येऊ लागले आहेत.
रशियाकडून झालेली ही कारवाई पुतीन यांच्या 'मिन्स्क शांती करार' संपुष्टात आणल्याने आणि युक्रेनच्या दोन कट्टरतावादी क्षेत्रात लष्कर पाठवल्याच्या घोषणेनंतर झाली. 'शांतता कायम करण्यासाठी' सैन्य पाठवल्याचं रशियाकडून सांगण्यात आलंय.
यापूर्वी रशियाने गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनच्या सीमेवर हजारो सैनिक तैनात केले होते. तेव्हापासूनच युक्रेनवर युद्धाचं सावट होतं. रशिया बऱ्याच काळापासून युरोपीय संघटना आणि विशेषत: नेटो आणि युक्रेनच्या संबंधांना विरोध करत आला आहे.
या दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सातत्याने विविध देशांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेसह काही पश्चिमेकडील देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्र पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.