टिटरवरून मिळवा सचिनची सही
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची सही आणि संदेश असलेला फोटो मिळवून देण्यासाठी ‘बीसीसीआय’ आणि ‘डिजिग्राफ’ ने ‘थँक यू सचिन’ ही मोहीम टिटरवर सुरू केली आहे. या मोहिमेत लाखोंच्या संख्येनी सचिनप्रेमी सचिनविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सध्या अशा ट्विटसचा आकडा सात लाखांहून अधिक झाला आहे. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सन्मानार्थ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि ‘डिजिग्राफ’ च्या एकत्रित प्रयत्नांमधून मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून सचिनच्या पल्लेदार हस्ताक्षरातील स्वाक्षरी आणि संदेश असलेला फोटो उपलब्ध करून दिला जात आहे. विशेष म्हणजे, टिटरचे अकाउंट ज्या नावाने असेल, त्यालाच उद्देशून हा संदेश उपलब्ध होत आहे. त्यासाठी बीसीसीआयने 1989 ते 2011 या काळातील सचिनचे अनेक फोटो उपलब्ध करून दिले आहेत. असा फोटो मिळविण्यासाठी टिटरवरून ‘बीसीसीआय’ चे टिटर हँडल आणि ‘थँक्यू यू सचिन’ हे शब्द ‘हॅश टॅग’ च्या साहाय्याने वापरून आपला संदेश टिट करणे आवश्यक आहे. या दोन्ही बाबी असणारा संदेश ट्विट केला, की लगेचच ‘बीसीसीआय’ कडून तेंडुलकरच्या फोटोची डिजिग्राफची लिंक री-ट्विट केली जात आहे. क्रिकेटपटू युवराजसिंग, गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणेचाही यात समावेश आहे. प्रत्येक फोटोवर सचिनची वेगळी छबी आणि वेगळा संदेश असल्याने एकाच व्यक्तीकडून अनेकदाही ट्विट करून फोटो गोळा केले जात आहेत.