Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2021 वर्ष अखेर : टोकियो ऑलिम्पिक कव्हरेजने काय शिकवलं?

2021 वर्ष अखेर : टोकियो ऑलिम्पिक कव्हरेजने काय शिकवलं?
, शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (22:44 IST)
प्रत्येक खेळाडूचं आणि खेळाशी निगडीत प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे ऑलिंपिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं.
तसं हे दर चार वर्षांनी होणारं संमेलन. पण यंदा ते एक वर्ष उशिरानं भरलं. कोव्हिडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर हो-नाही करता करता टोकियो 2020 ऑलिंपिकचं आयोजन झालं, मला त्याचं वार्तांकन करता आलं आणि भारताच्या नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकून या अनुभवातली गोडी आणखी वाढवली.
 
पण यंदाच्या ऑलिंपिकची कहाणी अशी साधी सरळ - ते म्हणतात ना, सुफळ संपूर्ण, तशी - नव्हती.
 
कारण कोव्हिडची दुसरी लाट आणि अफगाणिस्तानातात तालिबाननं केलेला सत्तापालट या अनेकांना हादरवून टाकणाऱ्या दोन घटनांच्या दरम्यानच्या काळात ऑलिंपिकचं आयोजन झालं.
स्पर्धेच्या दोन आठवड्यात सगळ्या जगाचं लक्ष बऱ्याचदा टोकियोवर एकवटलं होतं. या स्पर्धेत नवे आध्याय लिहिले गेले, नव्या पर्वाची सुरुवात झाली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेनं जगाला एक नवी उमेद दिली.
 
2020 हे वर्ष कोरोना विषाणूच्या जागतिक साथीसाठी ओळखलं गेलं होतं. 2021 या वर्षाचा उल्लेख इतिहासात टोकियो ऑलिंपिकशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.
 
जगाला एकत्र बांधणारा क्षण
खरं तर टोकियो 2020 चं आयोजन 2021 मध्ये झालं, ते 2020 च्या सावटाखालीच. त्यासाठी प्रत्येकालाच अभूतपूर्व तयारी करावी लागली.
 
जपानमध्ये कोव्हिडच्या वाढत्या केसेस, बदलणारे नियम, विमानांचं बदलतं वेळापत्रक, विलगीकरण, बायोबबल, रोजच्या पीसीआर टेस्ट्स - अडथळ्यांची अशी शर्यत प्रत्येकालाच पार करावी लागली.
 
भीती, उत्सुकता, काळजी, आनंद, अशा वेगवेगळ्या भावना टोकियोत जमलेल्या लोकांनी अनुभवल्या. म्हणूनच उद्घाटन सोहळ्याची 'युनायटेड बाय इमोशन' - भावनेनं एकत्र आलेलं जग ही संकल्पना आजही सार्थ वाटते.
मला 23 जुलैचा तो उद्घाटन सोहळ्याचा दिवस लख्ख आठवतोय. अगदी त्या दिवशी सकाळीही स्पर्धा होईल की नाही, मध्येच बंद करावी लागली तर काय असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते.
 
पण दिवस संपेपर्यंत ते प्रश्न मागे पडले आणि अख्ख्या मानवजातीनंच एक नवं पाऊल टाकल्यासारखं वाटू लागलं.
 
कोव्हिडोत्तर 'न्यू नॉर्मल' युगातला हा पहिला आणि सर्वात मोठा जागतिक सोहळा होता. जगातल्या कानाकोपऱ्यातले लोक तिथे एकत्र आले होते आणि आपण या इतिहासाचा भाग आहोत, ही भावनाच खूप काही देऊन जाणारी होती.
 
मागे वळून पाहिलं, तर हे सगळं अचाट आणि स्वप्नवत वाटतंय. पण प्रत्यक्षात हा अनुभव थोडा वेगळा होता.
 
बबलमधला अनुभव
वरवर सगळं नॉर्मल वाटत असलं तरी या ऑलिंपिकला दुःखाची किनार होती. कारण प्रेक्षकांची गैरहजेरी पदोपदी जाणवत होती. खेळात चाहत्यांची उपस्थिती किती महत्त्वाची असते, याची जाणीव तिथे पदोपदी झाली.
 
जगातल्या सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या महानगरात असूनही 'ऑलिंपिक बबल'मुळे आम्ही तिथल्या रहिवाशांपासून बऱ्यापैकी दूरच होतो. त्यामुळे जवळपास प्रत्येकालाच थोडा मानसिक ताण जाणवत होता.
 
पण या अनुभवात मी एकटी नाही, आपण सगळे एकत्र आहोत, ही जाणीव दिलासा द्यायची. तिथे वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी झालेली मैत्री ही माझी ऑलिंपिकमधली वैयक्तिक कमाई आहे.
 
पत्रकार म्हणूनही हा अनुभव समृद्ध करणारा होता. मी रोज बीबीसी मराठीवरच्या माझ्या डायरीतून, बातम्यांतून तुमच्याशी संवाद साधत होते.
 
तेव्हा आपण केवळ खेळाच्या बातम्या देत नाहियोत, तर एका अभूतपूर्व काळाचं 'Documentation' - दस्तावेजीकरण - करतो आहोत याची जाणीव व्हायची. ही गोष्टच काम करत राहण्यासाठी प्रेरणा द्यायची.
त्या पंधरा दिवसांत अनेक क्षण अनुभवता आले. सिमोन बाईल्सनं उचललेला मानसिक आरोग्याचा मुद्दा असो किंवा तांबेरी आणि बारशिम या दोघांनी उंच उडीचं सुवर्णपदक वाटून घेणं असो, ऑलिंपिकच्या इतिहासात या सगळ्याची नोंद घेतली गेली आहे.
 
नीरजचं ऐतिहासिक यश
ऑलिंपिकचं वार्तांकन करण्यासाठी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या टीममध्ये आम्ही दोन भारतीय पत्रकार होतो. मी आणि बीबीसी पंजाबीमधले माझे सहकारी अरविंद छाबडा. बाकीही काही भारतीय पत्रकार सोबत होते.
 
भारतीयांना फारशी पदकं मिळत नसतानाही भारतीयांना या स्पर्धेत एवढा रस आहे, की तुमचे एवढे पत्रकार इकडे आले, अशी कौतुकमिश्रित टिप्पणी मला ऐकायला मिळाली होती. मला ती काहीशी रंजक वाटली.
 
पण आम्ही जे दिव्य पार करून टोकियोला पोहोचलो होतो, त्या सगळ्याचं 7 ऑगस्टच्या रात्री सार्थक झाल्यासारखं वाटलं, जेव्हा नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकलं.
 
नीरज काहीतरी खास करून दाखवणार आहे, असं स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच वाटत होतं. प्रेस सेंटरमध्ये काही सहकाऱ्यांसोबत तशी चर्चाही झाली होती. पण त्यानं सुवर्ण जिंकून सर्वांच्या अपेक्षा कित्येक पटींनी पूर्ण केल्या.
 
नीरजचा तो पहिला थ्रो आजही माझ्या डोळ्यांसमोर तरळतो आहे आणि मला खात्री आहे की तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.
 
हवा कापत सर्रकन गेलेला भाला 87.03 मीटर्सवर जाऊन पडला आणि मी खुर्चीतून जवळजवळ उडीच मारली होती. त्या पहिल्या भालाफेकीनंच आपण इतिहासाचे साक्षीदार बनणार आहोत याची जाणीव करून दिली.
असे क्षण अपवादानंच अनुभवायला मिळतात. त्या क्षणात आनंद असतो, सेलिब्रेशन असतं, काहीतरी साचून राहिलेलं मोकळं झाल्याची भावना असते.
 
खरं तर या स्पर्धेत भारतानं सात पदकं जिंकली. त्यातले सहा विजयाचे नेमके क्षण काही ना काही कारणांमुळे मी प्रत्यक्ष स्टेडियममधून पाहू शकले नाही. कारण काही विजय अनपेक्षित होते, आम्ही बऱ्याच स्पर्धा वाटून घेतल्या होत्या तर कधी लाईव्ह वार्तांकनासाठी मी स्टेडियमबाहेर होते.
 
पण जो क्षण कधीतरी पाहायला मिळेल असं लहानपणापासूनचं स्वप्न होतं, तो सुवर्णविजयाचा क्षण मला पाहता आला.
 
संयम ठेवला, वाट पाहिली आणि आपलं काम करत राहिलं, तर स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. 2021 मध्ये झालेल्या ऑलिंपिक 2020 नं मला हेच शिकवलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रुग्णालयातून सुट्टीसाठी ओमायक्रॉनबाधिताचा अजब हट्ट!