आगामी फुटबॉल विश्वचषकासाठी ब्राझीलने 26 जणांचा संघ जाहीर केला आहे. पाचवेळा चॅम्पियन संघाने 39 वर्षीय बचावपटू डॅनी अल्वेसचीही संघात निवड केली आहे. त्याचबरोबर इंग्लंड क्लब लिव्हरपूलकडून खेळणारा स्ट्रायकर रॉबर्टो फिरमिनो याला वगळण्यात आले आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांनी सोमवारी संघाची घोषणा केली.
विश्वचषक संघात निवड झालेला अल्वेस हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने माजी बचावपटू दल्मा सँटोसचा विक्रम मोडला. 1966 मध्ये जेव्हा सॅंटोसची विश्वचषकासाठी निवड झाली तेव्हा तो 37 वर्षांचा होता. ब्राझीलने 2002 पासून विश्वचषक जिंकलेला नाही. डॅनी अल्वेसने आपल्या कारकिर्दीत 44 ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याला विश्वचषकही आपल्या झोळीत टाकायला आवडेल. स्पॅनिश क्लब बार्सिलोनाकडून दीर्घकाळ खेळणारा अल्वेस सध्या मेक्सिकन क्लब पुमासकडून खेळतो. या मोसमात त्याने संघासाठी 12 सामने खेळले आहेत.