क्रीडा नैपुण्याच्या मापदंडाविषयी भारतीय खेळाडू अनभिज्ञच आहेत. आपल्याकडे केवळ ऑलिंपिक स्पर्धेतील कामगिरीचाच विचार केला जातो. मात्र, अन्य खेळांमधील खेळाडू कशी सातत्यपूर्ण कामगिरी करतात याच विचार होत नाही. अशी खंत जागतिक बिलियर्ड्स व स्नूकर विजेता पंकज अडवाणीने व्यक्त केली.
पंकजने कारकीर्दीत आतापर्यंत 16 विश्वविजेतेपदे मिळवली आहेत. तो म्हणाला, जेव्हा ऑलिंपिक स्पर्धा होते, तेव्हाच फक्त या क्रीडा प्रकारांबाबत ऊहापोह केला जातो. उर्वरित साडेतीन वर्षांच्या कालावधीत याबाबत फारशी चर्चा होत नाही किंवा प्रत्यक्ष कृती होत नाही. लोक ऑलिंपिकबाबत विसरूनही जातात. आपल्याकडे फक्त क्रिकेटबाबत वर्षभर चर्चा होत असते. या खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जे काही प्रयत्न केले आहेत, त्याचा आदर्श अन्य खेळांच्या संघटनांनी ठेवला पाहिजे.