सर्वात तरुण जगज्जेता गुकेश डोम्माराजू पुढील वर्षी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनशी भिडणार आहे. येथे 26 मे ते 6 जून या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
18 वर्षीय गुकेशने यावर्षी टाटा स्टील मास्टर्स जिंकले, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, उमेदवारांच्या स्पर्धेत चमक दाखवली आणि गेल्या आठवड्यात सिंगापूर येथे झालेल्या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. गुकेशने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'नॉर्वेमध्ये पुन्हा एकदा जगातील सर्वात बलाढ्य खेळाडूंपैकी एकाचा सामना करताना मला आनंद होत आहे. आर्मगेडॉन मजा येईल.'
गतवर्षी गुकेशने येथे तिसरे स्थान पटकावले होते पण यावेळी तो विश्वविजेता म्हणून कार्लसनला त्याच्याच देशात आव्हान देईल. नॉर्वे बुद्धिबळाचे संस्थापक आणि स्पर्धेचे संचालक केजेल मेडलँड म्हणाले, 'हा सामना शानदार असेल. जागतिक चॅम्पियनचा नंबर वन खेळाडूविरुद्ध कसा सामना होतो हे पाहणे रंजक ठरेल.
याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल. नॉर्वे बुद्धिबळात जगातील अव्वल पुरुष आणि महिला खेळाडू सहा खेळाडूंच्या दुहेरी राऊंड रॉबिन स्वरूपात खेळतील.