Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा
श्री स्वामी चरित्र सारामृत विशंतितमोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी करुणाकरा । जयजयाजी यतिवरा । भक्तजन संतापहरा । सर्वेश्वरा गुरुराया ॥१॥ लीलावेषधारी दत्ता । सर्वसाक्षी अनंता । विमलरुपा गुरुनाथा । परब्रह्म सनातना ॥२॥ तुझे चरित्र अगाध । केवी वर्णू मी मतिमंद । परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे ॥३॥ तुझ्या गुणांचे वर्णन । करिता भागे सहस्त्रवदन । निगमागमासहि जाण । नसे पार लागला ॥४॥ तुझे वर्णावया चरित्र । तुजसम कवी पाहिजेत । तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे ॥५॥ वर्णिता समर्थांचे गुण । नाना दोष होती दहन । सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि ॥६॥ अक्कलकोटी वास केला । जना दाखविल्या अनंत लिला । उद्धरिले कैक पाप्यांना । अद़्भुत चरित्र स्वामींचे ॥७॥ असो कोणे एके दिवशी । इच्छा धरोनी मानसी । गृहस्थ एक दर्शनासी । समर्थांच्या पातला ॥८॥ करोनियां श्रींची स्तुती । माथा ठेविला चरणावरती । तेव्हा समर्थ त्याते वदती । हास्यवदने करोनी ॥९॥ फकिराते देई खाना । तेणे पुरतील सर्व कामना । पक्वान्ने करोनी नाना । यथेच्छ भोजन देईजे ॥१०॥ गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली नाना पक्वान्ने । फकीर बोलाविले पाच जण । जेवू घातले तयाते ॥११॥ फकीर तृप्त होवोन जाती । उच्छिष्ट उरले पात्रावरती । तेव्हा समर्थ आज्ञापिती । गृहस्थाचे सत्वर ॥१२॥ शेष अन्न करी ग्रहण । तुझे मनोरथ होतील पूर्ण । परी त्या गृहस्थाचे मन । साशंक झाले तेधवा ॥१३॥ म्हणे यवन याती अपवित्र । त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट । यातीमध्ये पावेन कष्ट । कळता स्वजना गोष्ट हे ॥१४॥ आला मनी ऐसा विचार । तो समर्थांस कळला सत्वर । म्हणती हा अभाविक नर । विकल्प चित्ती याचिया ॥१५॥ इतक्यामाजी साहजिक । कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक । येवोन स्वामीसन्मुख । स्वस्थ उभा राहिला ॥१६॥ दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणोन । भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन । द्रव्य मिळवाया साधन । त्याजवळी नसे परी ॥१७॥ त्यासी देखोन समर्थ । म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरीत । तो निःशंक मनांत । पात्रावरी बैसला ॥१८॥ त्यासी बोलले समर्थ । तु मुंबापुरी जाई त्वरीत । सफल होतील मनोरथ । द्रव्यप्राप्ती होईल ॥१९॥ स्वामीवचनी भाव धरिला । तात्काळ मुंबईस आला । उगाच भटको लागला । द्रव्य मिळेल म्हणोनी ॥२०॥ प्रभात समयी एके दिवशी । गृहस्थ निघाला फिरायासी । येऊन एका घरापाशी । स्वस्थ उभा राहिला ॥२१॥ तो घरातून एक वृद्ध बाई । दार उघडोन घाईघाई । बाहेर येवोनिया पाही । गृहस्थ पडला दृष्टीसी ॥२२॥ तिने बोलाविले त्याला । आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिधल्या । नोटा आणून सत्वरी ॥२३॥ गृहस्थ मनी आनंदला । बाईते आशिर्वाद दिधला । द्रव्यलाभ होता आला । शुद्धीवरी सत्वर ॥२४॥ समर्थांचे वचन सत्य । गृहस्था आली प्रचित । वारंवार स्तुती करीत । स्तोत्र गात स्वामींचे ॥२५॥ समर्थांची लीला विचित्र । केवी वंदू शके मी पामर । ज्या वर्णिता थोर थोर । श्रमित जाले कविराज ॥२६॥ कोणी दाता नृपवर । दान कराया भांडार । मोकळे करी परी शक्त्यनुसार । याचक नेती बांधोनी ॥२७॥ षड्रस अन्नाचे ढीग पडले । क्षुधित जन तेथे आले । त्यांनी त्यातून भक्षिले । क्षुधा शांत होई तो ॥२८॥ स्वामीचरित्र भांडारातून । रत्ने घेतली निवडोन । प्रेमादरे माळ करुन । श्रोतयांचे कंठी घातली ॥२९॥ श्री स्वामीचरणसरोजी । विष्णुभ्रमर घाली रुंजी । अत्यादरे चरण पूजी । शंकर स्तोत्र प्रेमे गातसे ॥३०॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । विशंतितमोऽध्याय गोड हा ॥३१॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसवा