Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुरुषोत्तम मास कथा

Purushottam maas katha Marathi
ऐका पुरुषोत्तमदेवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते. मनीं धरावें तें मिळतें, जन्माचे सार्थक होतें.
 
अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहात होते. मनानं श्रीमं परंतु धनानं गरीब. मोठ्याच्या बायकोचं नांव होतं रूपवती. धाकट्याच्या बायकोचं नांव होतं मुग्धा. एकदां ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठीं परगांवी गेले. तेव्हांपासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. 
 
धाकट्या जावेकडून बटकीसारखी काम करवून घेई. तिच्यावर सारखी आग पाखडी. एकदां तर थोरली एवढी संतापली कीं तिनं धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी, एका शेजारणीच्या ओसरीवर राहूं लागली.
 
त्या वर्षी अधिकमास आला. थोरलीनं पुरुषोत्तमव्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही तें व्रत करावं. 
 
म्हणून ती थोरल्या जावेच्या घरीं गेली, म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तमव्रत करायची माझी इच्छा आहे. परंतु मला त्या व्रताची कांहीच माहिती नाहीं. तुम्ही मला सगळा व्रतविधि सांगाल का ?
 
थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट. ती धाकटीला म्हणाली, तूं आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते. 
 
पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन तें दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाहीं. धाकटीनं कबूल केलं. थोरलीनं दुष्टपणानं उगीच काहीतरी खोटंनाटं रचून तिला सांगितलं. 
 
म्हणाली, अधिकमास म्हणजे मलिनमास. या महिन्यांत आपणही मलिन राहायचं. मलिन गढूळ पाण्यांत स्नान करायचं. मळकट वस्त्रं वापरायचीं, शिळेपाके उष्टेखरकटे पदार्थ खायचे. 
 
घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा, माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल.
 
धाकटीला खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरीं जेवायला बोलावू लागली. होतां होतां उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं १०८ ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं. 
 
तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलावलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणं ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा, माझ्या घरीं आज उद्यापन आहे. 
 
तूं जेवायला ये. तेव्हां पिंपळातून श्री विष्णु प्रगट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तिला म्हणाले, ठीक आहे. मी जेवायला येतो. कोणी विचारलंच तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग.
 
धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरांत काय होतं नव्हतं तें गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यांत श्रीविष्णु जेवायला आले. तिला म्हणाले, ताई, बाहेर १०८ ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं, मग १०८ ब्राह्मणांना कसं जेवण घालणार ? घरांत अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आतां काय करायचं ? विष्णूनं तिची चिंता दूर करायचं ठरवलं.
 
ते म्हणाले, आतां असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीनं विष्णूच्या सांगण्याप्रमाणं केलं. मग विष्णूनं त्या पानाचे १०८ तुकडे केले. द्रोणाचे १०८ तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले.
 
धाकटीनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हां श्रीविष्णूच्या कृपेनें १०८ पात्रं पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले.
 
तिकडे थोरलीच्या परी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहींसे झाले. १०८ ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं तिला शाप देत निघून गेले. 
 
परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशांत आपण तिला खोटंनाटं सांगितलं आणि तरीही तिनं १०८ ब्राह्मणांना भोजन कसं दिलं, याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं लवून नमस्कार केला. म्हणाली, तुम्हीं सांगितल्याप्रमाणं मी अधिकमासाचं व्रत केलं. 
 
म्हणूनच भगवान श्रीविष्णु प्रसन्न झाले. आणि त्यांच्या कृपेनंच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तीभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णु प्रसन्न झाले, हे थोरलीनं मनोमन जाणलं. ती खजील झाली. तिनंधाकटीचे पाय धरले. तिची क्षमा मागितली. तेव्हां आकाशवाणी झाली.
 
जे कोणी श्रद्धेनें अधिकमास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईन. त्यांच्या सर्व मनकामना पूर्ण करीन..
 
त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदांत वागूं लागल्या. श्रीपुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. 
 
त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली, तशीच त्या श्रीपुरुषोत्तमाचे कृपेने तुम्हा आम्हाला मिळो ! ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सफल संपूर्ण. ॐ विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shiva And Nandi नंदी हे भगवान शिवाचे द्वारपाल आहेत