Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अस्मितेचा सूर्य : डॉ. आंबेडकर

अस्मितेचा सूर्य : डॉ. आंबेडकर
बाबा, तूच आम्हाला लेखणी दिली, 
भावना दिल्या, करुणा दिल्या, 
विवेक प्रेरणा-धैर्य दिले 
निष्ठा दिल्या आणि
दिशाही दिल!
 
तुझ्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाने 
असंख्य शब्द निर्मात्यांना  
जाग आली
आत्मभान घेऊन जगाच्या शाळेत
वादळवारे झेलून
स्वंतेजाने उभी राहिली ।
 
प्रस्थापित व्यवस्थेनं दबलेल्या 
वांझ शब्दाला विद्रोहाची धार आली
कळू लागल व्यथांच्या वेदना
अन् वास्तव जीवनाचं अस्तित्व
बाबा, तुझा आश्वासक हात
आमच्या पाठीवर टाकून
तू प्रहार केलेस लेखणीने
मानवाचे अस्तित्व नाकारणार्‍या अमानवतेला, अमानुषतेला 
संस्कृतीच्या पिढीजात ठेकेदारांना
शोधून ठेचून
शोषणाचे पाट फोडून
पुरातन मूल्यांना जाळून
विषमतेच्या भिंतीला गाडून 
स्वातंत्र्य-समता-बंधुत्व-न्याय  
भारतीय संविधानात नोंद केलीस ।
 
तू दिलास आविष्कार स्वाभिमानाचा
तू दिलेस सजीवत्व नाकारलेल्यांना  
तू रोविलेस निशाण समतेचे
तू अंधाराला छेदून
व्यवस्‍थेला भेदून
प्रज्ञेचे, करुणेचे दिवे पेटवून
उजेडाचं दान देऊन
तू अस्मितेचा सूर्य झालास ।
 
अंधारलेली गावे उजेडात आली
गावकूस आणि 
वेस कालबाह्य झाली !
मुक्यांना बोलतं करून
तू मूकनायक झालास
बाबा, आता व्हाला हवं संघटित
तुझा अर्ध्यावर राहिलेला
क्रांती-प्रगतीचा रथ
तुझी शिरसावंद्य आज्ञा
आसासह चाक पूर्ण फिरविण्याची  
आम्ही घेत आहोत प्रतिज्ञा
तथागताच्या शीलाचं तोरण बांधून
प्रज्ञेचं गीत गाऊन
करुणेची जेत पेटवून
निळ्या किरणांच्या साक्षीने
तुझ चरणी फुले वाहून
 
फुले वाहून !..
 
अशोक जानराव

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाच शहरात रोज बदलणार पेट्रोल- डिझेलचे भाव