Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दलितांचे 'बाबा' गेले

- आचार्य अत्रे

दलितांचे 'बाबा' गेले
बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. 

आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली ‘भीमा’ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय.

महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते.

जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच ‘लोकसभे’ त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, ‘हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.’ हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृति’मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते.

यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.

धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ”हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !” हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता.

अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’ वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.’पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.

आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,”स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!” नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, ‘जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!’ आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि ‘स्वातंत्र भारता’ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. ‘मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!’ घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही.

आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.

डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता.

शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा ‘साऱ्या भारताला मी बौध्द करीन!’ अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता. भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.’मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!’ ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते.

आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते.

महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वता त्यांचा त्याग, चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपापल्या जीवनांत निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहीलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उध्दार होईल. तीन कोटि मराठी जनतेच्या वतीनं व्याकूळ हृदयाने आणि अश्रपूर्ण नेत्रानीं आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुजबळ यांना दिलासा नाही