Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिपब्लिकन ऐक्य हे मृगजळ?

रिपब्लिकन ऐक्य हे मृगजळ?
चौदा एप्रिल हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिन. बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना दिली. त्याचबरोबर देशातील दलित, मागासवर्गीय, महिला यांना शोषणमुक्तीचा मार्ग दाखविला.समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचे विचार दिले. आपल्या माघारी ही परंपरा चालू राहावी यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. पण दुर्देवाने आंबेडकरांनंतर त्यांची परंपरा चालविणारा समर्थ वारस मिळाला नाही. रिपब्लिकन पक्षाचे शतशः तुकडे झाले. 

डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष वाढला असता तर देशाचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. महाराष्ट्राचे चित्र खूपच वेगळे राहिले असते. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाची वाट लावण्यात त्यांचे अनुयायीच आघाडीवर राहिले. निवडणूक आयुक्ताकडे- आज ३२ रिपब्लिकन पक्षाची नोंदणी आहे. प्रत्यक्षात शंभरपेक्षा अधिक रिपब्लिकन पक्ष असावेत असा अंदाज आहे. दर चार सहा महिन्याला रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा नारा दिला जातो. परंतु, प्रत्यक्षात काम मार्गी लागत नाही. रिपब्लिकन पक्षाचे नेते ‘मी सांगतो तेच अंतिम सत्य’ ही भावना सोडायला तयार नाहीत.

पक्षाचे एक्य होत नाही. काँग्रेस किंवा राष्ट्वादी काँग्रेसला बाबासाहेबांचे अनुयायी संघटीत होणे पडवणारे नाही. बहुजन समाज संघटित झाला तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला मोठा प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतो, म्हणून या दोन्ही पक्षाला रिपब्लिकन पक्षाला संघटीत होऊ द्यायचे नाही. एखाद्या राजकीय पक्षात तात्विक राजकारणावरून फूट पडणे समजू शकते. परंतु, निव्वळ किरकोळ लोकांच्या स्वार्थासाठी फूट पडावी. पक्षाचे एक दोन नव्हे तर शंभर तुकडे व्हावेत यापेक्षा वाईट काही असू शकत नाही.

आता रिपब्लिकन पक्षाच्या एकीकरणाचा खेळ पुरे झाला. जनतेने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. बहुजन समाजाला संघटीत व्हायचे असेल तर त्यांनी आता रिपब्लिकन पक्षाचे तुकडे पाडणार्‍या लोकांना पद्धतशिरपणे दूर ठेवले पाहिजे. जनतेने त्यासाठी नव्या नेत्यांचा शोध घ्यावा. रिपब्लिकन पक्षाच्या उभारणीसाठी नेतृत्व कोणत्या जातीचे असावे, हा मुद्दा तितका महत्त्वाचा नाही. तर पक्ष उभारणीचा आहे. उत्तर प्रदेशात मायावती यांनी क्रांती घडवली. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यां दोन्ही पक्षांना आडवे पाडून सत्ता मिळविली. मायावती यांचा प्रयोग इतर राज्यातही यशस्वी होऊ शकतो. महाराष्ट्रात त्यांनी पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्यातील बहुजन समाजाने मायावतींचा वाढता प्रभाव लक्षात घेतला पाहिजे. मायावती प्रभावी होत आहे असे लक्षात आले तर किमान रिपब्लिकन पक्षाचे नेते स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ सोडतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आजच्या परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न हीच बाब महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल.

- महेश जोशी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एआय तंत्रज्ञान करू शकते एलियनचा शोध घेण्यास मदत