Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजाराविषयी 7 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं

शेअर बाजाराविषयी 7 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं
, मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (20:50 IST)
ऋजुता लुकतुके
मागच्या महिन्यात 1 सप्टेंबर 2021 ला बाँबे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स हा निर्देशांक 57,388 वर होता. 27 सप्टेंबरला तो 60,077 वर गेला. पहिल्यांदाच निर्देशांक साठ हजारांच्यावर गेला आणि हा निर्देशांकाचा नवा उच्चांक होता. मधल्या 26 दिवसांमध्ये निर्देशांक तब्बल 2,700 अंशांनी वर गेला. या काळात भारतीय शेअर बाजारांनी गुंतवणूकदारांना काही लाख अमेरिकन डॉलरनी श्रीमंत केलं.
 
अनेकदा काही दिवस बाजार सतत वर चढतो तेव्हा चढला असेल तर पुढे नफारूपी विक्रीचा जोर वाढून लगेच तो खालीही येतो. म्हणजे गुंतवणूकदार शेअर बाजारातून नफा घेऊन बाहेर पडतात. आताही 27 सप्टेंबर नंतरच्या तीन दिवसांत सेन्सेक्स निर्देशांक चक्क 900 अंशांनी घसरला.
 
शेअर बाजारातले हे चढ-उतार बातम्या किंवा सार्वजनिक चर्चेच्या माध्यमातून आपण नियमितपणे ऐकलेल्या असतात. काहींना नोकरी गमावल्यानंतरही शेअर बाजारातल्या गुंतवणुकीमुळे कसा आधार मिळाला याच्याही कथा आपण ऐकलेल्या असतात.
 
2020मध्ये कोरोनाच्या आघातानंतर जो अर्थव्यवहार सगळ्यांत आधी लॉकडाऊनमधून सावरला त्यामध्ये शेअर बाजाराचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. 2021पासून जगभरातल्या शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसायला लागली आहे. त्यातही भारताचं वैशिष्ट्य हे की, अमेरिकेचा डाओ जोन्स (56%), जपानचा निक्की (52%) आणि रशियाचा मोएक्स (62%) या निर्देशांकांमध्ये मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 दरम्यान झालेल्या वाढीपेक्षा भारताच्या संवेदनशील निर्देशांक अर्थात सेन्सेक्समध्ये झालेली वाढ 100% आहे.
 
याचाच अर्थ जगभरातल्या परकीय गुंतवणूकदार संस्था आणि जागतिक गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावर विश्वास आहे. भारतातले अनेक लोक मात्र शेअर बाजारातल्या गुंतवणुकीबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे किंवा तेवढा धोका पत्करण्याची तयारी नसल्यामुळे या गुंतवणुकीपासून दूर आहेत.
कारण, उपलब्ध आकडेवारीनुसार, 130 अब्ज लोकांच्या देशात फक्त 2 कोटी 32 लाख डीमॅट अकाऊंटधारक आहेत. यातल्याही लाखांहून जास्त खात्यांमध्ये वर्षभरात काहीही खरेदी-विक्री झालेली नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे पण, माहिती नसल्यामुळे भीती वाटते अशा लोकांसाठी हा खटाटोप आहे. सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात असलेले सर्वसामान्य सात प्रश्न आणि त्यांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.
 
1) शेअर बाजारात पैसे गुंतवू का?
शेअर बाजारात तुम्ही थेट गुंतवणूक करता म्हणजे काही कंपन्यांचे शेअर विकत घेता. तुम्ही विकत घेतलेल्या कंपन्यांचे शेअर वर चढले तर तुम्हाला थेट याचा फायदा मिळतो. पण, काही वेळा शेअरची किंमत कमी होऊन तुम्हाला काही दिवसांतच मोठा तोटाही होऊ शकतो. मुदत ठेव, पोस्टातली गुंतवणूक यांच्या तुलनेत शेअर बाजारात चढ-उताराची जोखीम आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना ही जोखीम समजून घ्यायची गरज आहे.
 
शेअर बाजारातली गुंतवणूक ही लवचिक आहे. कारण, आज शेअर विकल्यावर दोन ते तीन दिवसांत तुमचे पैसे बँक खात्यात जमा होतात.
 
बाकी हा प्रश्न फिरवून शेअर बाजारात गुंतवणूक का करावी असा केला तर या प्रश्नाचं जास्त चांगलं उत्तर देता येईल.
बँकांमधल्या मुदतठेवींवर सध्या 5%हून कमी व्याज मिळत आहे. महागाई दर मात्र सातत्याने पाच टक्क्यांच्या वर आहे. शिवाय बँका किंवा पोस्टाच्या इतर अनेक मुदतठेवींतून मिळणाऱ्या व्याजावर आपल्याला सरकारी नियमांनुसार, टीडीएस आणि आयकर असे दोन्ही कर भरावे लागतात.
 
या स्थितीला निगेटिव्ह रिटर्न्स असं म्हणतात. म्हणजे तुमच्या पैशाचं मूल्य गुंतवणुकीमुळे न वाढता उलट कमी होणार असतं. भारतातही सध्या व्याजदर कमी करण्याचंच सरकारचं धोरण आहे. पीपीएफ वरचे व्याजदरही मागच्या काही वर्षांत सातत्याने कमी होत आहेत. अशावेळी या सगळ्या गुंतवणुकीच्या साधनांपेक्षा शेअर बाजारातली थेट गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष गुंतवणूक आपल्याला आपल्या मेहनतीच्या पैशावर जास्त परतावा मिळवून देऊ शकते.
 
अर्थात, यातली जोखीम समजून घेतली तर. त्यासाठी वित्त क्षेत्राचा अभ्यास असलेले अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजीत फडणीस यांनी डोळस आणि अभ्यापूर्ण गुंतवणुकीला महत्त्व दिलं आहे.
 
"कंपन्यांचे शेअर का चढतात किंवा उतरतात, कुठल्या कंपन्यांचे शेअर कधी चढतात? या गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मेहनतीचे सगळे पैसे शेअर बाजारात गुंतवण्याचा धोकाही पत्करू नये. पोहता येत नसेल तर कमरेपर्यंतच्या पाण्यातच डुंबावं म्हणतात, तसं शेअर बाजाराचं आहे. आपण जितक्या पैशाचा धोका पत्करू शकतो तितकीच गुंतवणूक शेअर बाजारात असावी. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातूनही आपण शेअर बाजाराचा धोका कमी करून जास्त परतावा मिळवू शकतो," शेअर बाजारातल्या गुंतवणुकीविषयी डॉ. फडणीस यांनी आपलं मत सांगितलं.
 
अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजारांनी गुंतवणूकदारांना परतावाही चांगला दिला आहे. त्यामुळे गुंतवणुकीचं प्रमाण 1990च्या दशकाच्या तुलनेत 20% नी वाढलं आहे.
 
2) शेअर बाजारात पैसे कसे गुंतवायचे?
शेअर बाजारात पैसे गुंतवणं जसं जोखमीचं आहे. तसंच कुणामार्फत आणि कसे गुंतवायचे याचीही नीट माहिती करून घेणं गरजेचं आहे. 1992मध्ये झालेला हर्षद मेहता घोटाळा (1200 कोटी रुपये) त्या पाठोपाठ झालेला केतन पारेख घोटाळा (800 कोटी रुपये) यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसानही झालं आहे आणि त्या त्या काळात शेअर बाजाराची विश्वासार्हताही धोक्यात आली.
 
पण, त्यानंतर 1992मध्येच सेबी म्हणजे सेक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया या शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेची निर्मिती झाली. तसंच शेअरही डिमॅट म्हणजे डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हायला लागले. त्यातून हा धोका कमी झाला. शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार पारदर्शक झाले.
 
आता तुम्हाला शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर काय करावं लागेल हे बघू…
 
शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी तुम्हाला डी-मॅट खातं, ट्रेडिंग खातं आणि एक बँक खातं लागेल.
 
डी-मॅट शब्दाचा अर्थ डिमटेरिअलाईझ्ड खातं असा आहे. म्हणजे तुम्ही खरेदी केलेले शेअर या खात्यात डिजिटल स्वरूपात साठवले जातात. ही तुमच्या शेअरसाठीची डिजिटल तिजोरी आहे असं समजा.
हे खातं ऑनलाईन प्रक्रियेनंतर सुरू करता येतं. सेबीच्या मान्यताकृत संस्थांना हे खातं सुरू करून देण्याची परवानगी आहे. त्या संस्थांना डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा सोप्या भाषेत डीपी संस्था असं म्हणतात. भारतात स्टेट बँक, महाराष्ट्र बँक असा सरकारी बँकांबरोबर आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस यासारख्या खाजगी बँकांनाही असं डीमॅट खातं सुरू करण्याची सुविधा आहे. त्याशिवाय खास गुंतवणूक क्षेत्रातल्या अग्रेसर संस्थाही डीपी म्हणून काम करतात. तुम्ही डीमॅट खातं सुरू करण्यापूर्वी या कंपनीची विश्वासार्हता (रेटिंग) आणि त्यांना मिळालेला सेबीचा परवाना नक्की तपासून पाहा.
 
डीमॅट बरोबरच तुम्हाला हवं एक ट्रेडिंग खातं. डीमॅट आणि ट्रेडिंग ही एकमेकांना पूरक खाती आहेत. आणि ही दोन्ही खाती असल्या शिवाय शेअरची खरेदी-विक्री करता येत नाही. या खात्याच्या माध्यमातून तुम्ही बाँबे स्टॉक एक्सचेंज किंवा राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूक करणार असता. या दोन शेअर बाजारांच्या व्यतिरिक्त एकूण 17 चालू स्थितीतले शेअर बाजार भारतात आहेत. पण, हे दोन जागतिक स्तरावर नावारुपाला आलेले आणि लोकांचा विश्वास मिळवलेले बाजार आहेत.
 
याव्यतिरिक्त डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याला जोडलेलं एक बँक खातंही आवश्यक आहे. म्हणजे या खात्यातून पैसे ट्रेडिंग खात्यात वळते होतात. आणि शेअर विकलात तर याच खात्यात जमाही होतात. अलीकडे बहुतेक भारतीय बँका डीमॅट, ट्रेडिंग आणि बचत खातं अशी एकाच खात्यात तिहेरी सोय तुम्हाला करून देतात. अशा खात्यांना थ्री-इन-वन खातं असं म्हणतात.
 
डीमॅट आणि ट्रेडिंग खातं उघडण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रं बँकेला किंवा डीपी संस्थेला सादर करावी लागतात,
 
पॅनकार्ड
आधारकार्ड (किंवा पत्त्यासाठी दुसरा एखादा प्रमाणित दस्ताऐवज)
बँकेचा रद्द केलेला धनादेश
तुमचा राहण्याचा पत्ता प्रमाणित करणारं एखादं प्रमाणपत्र
तुम्ही कमावते असल्याचा पुरावा (आयकर प्रमाणपत्र किंवा पगाराची पावती इ.)
तुमचे सध्याचे पासपोर्ट आकाराचे फोटो
यानंतर शेअर बाजाराचेही दोन प्रकार आहेत. प्राथमिक शेअर बाजार आणि दुय्यम शेअर बाजार. आपण सर्वसाधारणपणे जी गुंतवणूक करतो ती दुय्यम बाजारातच असते. इंग्रजीत याला सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं.
 
पण, एखाद्या कंपनीच्या शेअरची सर्वप्रथम नोंदणी ही प्राथमिक बाजारात होत असते. तिथून तो शेअर सेकंडरी मार्केटमध्ये खुला करण्यात येतो. पण, शेअर पहिल्यांदा बाजारात येतो किंवा त्याची नोंदणी होते तेव्हा येणाऱ्या इनिशियल पब्लिक ऑफर किंवा आयपीओमध्ये आपण गुंतवू शकतो. आणि हा आयपीओ प्राथमिक बाजारातच येतो. एरवी जे व्यवहार आपण करतो ते सेकंडरी मार्केटमध्ये असतात.
 
3) पैसे कशात गुंतवायचे?
शेअर बाजारातल्या जोखमीची मानसिक तयारी झाली की, पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो तो कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची. हा निर्णय अर्थातच अनुभवाने आणि अभ्यासपूर्वक घ्यावा लागतो.
 
'इन्व्हेस्ट ऑनलाईन' या गुंतवणूक विशेष वेबसाईटचे संस्थापक अभिनव अंगरिश यांच्यामते शेअर खरेदी करताना गुंतवणूकदाराची जोखीम उचलण्याची तयारी, कंपनी आणि शेअरचा नीट अभ्यास आणि ठोस रणनिती ठरवून निर्णय घेतला पाहिजे.
 
"सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक आणि ट्रेडिंग यात फरक करता आला पाहिजे. ट्रेडिंग म्हणजे अल्प मुदतीसाठी बऱ्याचदा अगदी एका दिवसासाठी एखाद्या शेअरची केलेली खरेदी-विक्री. यामध्ये मोठा नफा मिळण्याची शक्यता असली तरी जोखीमही तितकीच असते. आणि अल्पमुदतीत फासे उलटे पडू शकतात. आणि शेअरमधली गुंतवणूक म्हणजे किमान सहा महिने ते 1-3 वर्षांची आखणी करून काही ठरावीक शेअरमध्ये पैस गुंतवणे. दीर्घ मुदतीत अशी गुंतवणूक जास्त फायद्याची ठरू शकते," स्वत: शेअर ब्रोकर असलेल्या अभिनव यांनी आपला मुद्दा सांगितला.
 
खरेदीसाठी शेअर निवडताना बाजारात कंपनीची मागच्या काळातली कामगिरी, तिचं सेबीनं दिलेलं रेटिंग, टेक्निकल आणि फंडामेंटल चार्टच्या आधारे विश्वासू तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन, कंपनीच्या मागच्या तीन वर्षांच्या ताळेबंदाचा लेखाजोखा, तिमाही उत्पन्नाचे अहवाल, कंपनीचं उत्पादन आणि त्याला बाजारात असलेली मागणी यावर आधारित खरेदीचा निर्णय घ्यावा असं अभिनव अंगरिश यांनी सुचवलं आहे.
 
त्याचबरोबर शेअर बाजाराचा पूर्ण अभ्यास नसेल तर तज्ज्ञ लोकांचा किंवा दलालांची मदतही तुम्ही घेऊ शकता. पण, ब्रोकर किंवा संस्था विश्वासू तसंच नोंदणीकृत आणि जाणकार हव्या. अनेक संस्था तुमच्याकडून फी आकारून त्या बदल्यात तुमच्यासाठी शेअरमधले व्यवहार स्वत: करत असतात. किंवा तुम्हाला फीच्या मोबदल्यात कुठले शेअर घ्यायचे यावर सल्लाही देतात. अशा सल्ल्यांचाही उपयोग होतो. पण, तुम्ही आणि अशी संस्था किंवा व्यक्ती यांच्यात चांगला संवाद हवा आणि विश्वासही.
 
कंपन्यांच्या कार्यक्षेत्राप्रमाणे ढोबळ मानाने शेअरचे सेक्टर ठरवण्यात आले आहेत. त्यामुळेही शेअरची निवड करणं सोपं जातं. जसं की माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, बँका, कृषि उत्पादनं, तेल उत्पादन वगैरे...जेव्हा पावसाळा असतो तेव्हा शेतीची लागवड सुरू असते.
अशावेळी रसायनं आणि खतं आणि शेतीच्या अवजारांना तसं बियाणांना मागणी असते. पण, शेतीच्या हंगामाच्या पूर्वी मात्र हे शेअर पडलेले असतात. अशावेळी भाव कमी असताना विश्वासू आणि चांगल्या रेटिंगच्या कंपन्यांचे शेअर विकत घेऊन मालाला उठाव आला की हे शेअर विकण्याचा मार्गही अनुभवी गुंतवणूकदार अवलंबतात. त्यासाठी त्या-त्या क्षेत्रातल्या उत्पादनांची माहिती असणं आवश्यक आहे.
 
असे चांगले शेअर निवडून त्यात गुंतवणूक करून आपण चांगला गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करू शकतो. पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्याकडे असलेले शेअर, त्याची खरेदीची किंमत, बाजार भावाने असलेली किंमत यांचा एकत्र मांडलेला लेखाजोखा. चांगल्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या कंपनीच्या शेअरबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये थोडी थोडी गुंतवणूक असणंही महत्त्वाचं आहे. याला डायव्हर्सिफाईड किंवा विविधांगी गुंतवणूक असं म्हणतात. त्यातून जोखीम कमी होते.
 
कारण, देशाचीच बांधकाम क्षेत्राची कामगिरी एखाद्या तिमाहीत खालवली असेल तर या क्षेत्रातले सगळ्याच कंपन्याचे शेअर खाली येणार. पण, आपली गुंतवणूक एकट्या बांधकाम क्षेत्रात न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या कंपन्यांमध्ये विखुरलेली असेल तर आपलं एकदम नुकसान होणार नाही. म्हणून अशी विविधांगी गुंतवणूक मोलाची असते.
 
त्याचबरोबर शेअर खरेदीची आणखी एक उत्तम संधी म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग किंवा आयपीओ. एखाद्या कंपनीची शेअर बाजारात पहिल्यांदा नोंदणी होताना आयपीओ काढला जातो. आणि तेव्हा बोली लावून तुम्ही हा शेअर खरेदी करण्याची इच्छा दर्शवू शकता. आयपीओमध्ये गुंतवणूक करून अनेकदा गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला आहे. असा नफा हा करमुक्तही असतो. अर्थात, आयपीओची नीट माहिती करून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये.
 
4) शेअरमध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ कुठली? किती काळ गुंतवणूक ठेवावी?
सध्या शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार सकाळी सव्वा नऊ ते संध्याकाळी साडे तीनपर्यंत सुरू असतो. या कालावधीत शेअरच खरेदी-विक्री पार पडते.
 
बाजारात जर खरेदीचं वातावरण असेल निर्देशांक वर चढतो. आणि विक्रीचा माहोल असेल तेव्हा तो खाली येतो. अशी आवर्तनं शेअर बाजारात अव्याहत सुरू असतात. अशावेळी शेअरचा भाव खाली आलेली वेळ साधून खरेदी करणं आणि भाव वर कधी जाईल याचा अंदाज बांधून उंचीवर असताना विक्री करणं ही खरंतर पुस्तकी रणनीती आहे.
 
पण, हा उच्चांक-नीचांक गाठताना मात्र भल्या भल्यांची दमछाक होते. शिवाय किती काळ एखादा शेअर आपल्याकडे ठेवायचा याचं उत्तरही असंच कठीण आहे. या क्षेत्रातले तज्ज्ञही याचं निश्चित उत्तर देऊ शकणार नाहीत.
 
अभिनव अंगरिश यांच्याही मते, "गुंतवणूक करताना आपण केलेला अभ्यास, त्यातून स्वत:ची अशी तयार झालेली रणनीती आणि तात्कालिक पैशाची गरज यावर शेअर बाजाराची स्थिती गुंतवणुकीचा कालावधी ठरवता आला पाहिजे."
 
त्याचबरोबर शेअर बाजारात गुंतवणुकीच्या संधीची वाट पाहणाऱ्यांसाठीही अंगरिश यांनी सल्ला दिलाय की, गुंतवणुकीची योग्य वेळ 'आता' हीच असते. "बाजारात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातले शेअर खाली असतात. ते निवडून छोट्या गुंतवणुकीला सुरुवात कधीही करता येते."
 
याशिवाय ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी अल्प मुदतीची म्हणजे आज शेअर खरेदी करून आजच विकण्याचा किंवा 'बाय टुडे, सेल टुमॉरो' असा पर्यायही उपलब्ध आहे. पण, अर्थात त्यात जोखीमही खूप आहे.
शेअरमधल्या गुंतवणुकीच्या कालावधीसाठी तीन महिने म्हणजे एक क्वार्टर किंवा तिमाही, मग सहा महिने म्हणजे सहामाही किंवा एक वर्षं ते तीन वर्षं असे ढोबळमानाने काही गट पाडण्यात आले आहेत. एक वर्षापेक्षा कमी गुंतवणूक ही अल्प मुदतीची समजली जाते. तर एक वर्षापासून पुढे ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक असते. त्यानुसार, शेअर विकून मिळणाऱ्या नफ्यावर कर आकारला जातो. कुठलीही गुंतवणूक नियमित आणि शिस्तबद्ध असेल तर तिचा फायदा होतो तसंच शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं आहे.
 
अलीकडे काही जण शेअर बाजारात दर महिन्याला विशिष्ट शेअरमध्ये ठरावीक रक्कम नियमितपणे गुंतवतात. अशा गुंतवणुकीचा फायदाही अनेकांना झाला आहे.
 
5) शेअर बाजारातून किती फायदा मिळू शकतो?
जशी शेअर बाजारातली मुदत आणि कंपन्यांची निवड ही ज्याची त्याला करावी लागते. तसंच फायद्याचं आहे. नोकरी गेलेली असताना शेअर बाजारातल्या गुंतवणुकीवर घर चालवणारी उदाहरणं आहेत. तसंच शेअर बाजारात अवाजवी आणि पुरेपूर जोखीम पत्करून कर्जबाजारी झालेली कुटुंबंही पाहायला मिळतात.
 
पण, शास्त्रशुद्ध गुंतवणुकीने फायदा नक्कीच करून घेता येतो असं इन्व्हेस्ट ऑनलाईनचे अभिनव अंगरिश सांगतात. "शेअर बाजाराकडे आपल्या इतर गुंतवणुकीला पूरक गुंतवणूक म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. आपलं मूळ उद्दिष्टं हे आपल्या कुटुंबाला जन्मभर पुरेल इतकी मालमत्ता तयार करणं हे असतं. त्यात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचा वाटाही असावा."
 
सरकारी बचत योजनांमध्ये सगळ्यांत जास्त व्याज या घडीला 7 ते 7.5% इतकं आहे. त्यापेक्षा जास्त परतावा सुनियोजित शेअर गुंतवणुकीवर मिळू शकतो. हा फायदा 9-10% पासून ते अगदी 100% वरही असू शकतो. पण, यात शेअरची किंमत उलटी कमी होऊन नुकसान होण्याचा धोकाही असतो.
 
म्हणूनच असा धोका पत्करण्याची तयारी नसलेल्या लोकांसाठी तुमच्या वतीने तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला अंगरिश देतात. काही म्युच्युअल फंडांनी मागच्या दोन दशकांत सातत्याने 14-20% परतावा दिला असल्याची आठवण ते करून देतात.
 
शेअर बाजारातला नफा हा अर्थातच तुम्ही किती जोखीम घेऊ शकता आणि तुमची शेअरची निवड किती चोख होती यावरच अवलंबून असतात. पण, महागाई दरापेक्षा जास्त परतावा इथं मिळू शकतो.
 
6) शेअर बाजार सुरक्षित आहे का?
शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या अनेकांची हा प्रश्न आठवल्यावर पाचावर धारण बसते. एक तर या गुंतवणुकीत असलेली जोखीम आणि दुसरं म्हणजे कंपनी बुडली तर आपले पैसे बुडण्याची भीती. त्यातच 1990च्या दशकांत बाहेर आलेले शेअर बाजारातले घोटाळे. अशा सगळ्यामुळे मध्यमवर्गीय माणूस शेअर बाजारात येताना दहादा विचारच करतो.
 
पण, अलीकडे बचत योजनांवरचे घसरते व्याजदर आणि 2000 पासून भारतीय शेअर बाजारांनी केलेली सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांचाही शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे.
 
शिवाय सेबी या नियामक संस्थेनं सगळे व्यवहार ऑनलाईन केल्यामुळे आणि शेअर व्यवहारांवर ठेवलेल्या नजरेमुळे इथले व्यवहारही पारदर्शक झाले आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेवरचा जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्यामुळे देशातल्या बँका आणि म्युच्युअल फंडांबरोबरच परकीय गुंतवणूकदार संस्थाही भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. आणि या सगळ्याची परिणिती म्हणून शेअर बाजार निर्देशांकही वर जात आहे.
 
एका दिवसांत एखादा शेअर पाच टक्क्यांनी वर किंवा खाली गेला तर सेबीकडून त्या शेअरची खरेदी-विक्री तात्काळ थांबवण्यात येते. याला सर्किट असं म्हणतात. सेबीकडून शेअरमधली संपूर्ण खरेदी-विक्री थांबवण्यात येते. आणि सगळे व्यवहार तपासल्यावरच पुन्हा व्यवहार सुरू करता येतात. गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावेत हाच यामागचा हेतू आहे. असे आणखीही काही उपाय मागच्या वीस वर्षांत सेबीने हाती घेतले आहेत. संस्थेकडून गुंतवणूकदारांच्या जनजागृतीसाठी मार्गदर्शकपर व्याख्यानंही आयोजित करण्यात येतात.
 
एखाद्या व्यवहाराविषयी तुमची गुंतवणूकदार म्हणून काही तक्रार असेल तर त्याची दादही तुम्हाला सेबीकडे मागता येते.
 
अर्थात, शेअर बाजाराच्या कामगिरीवर तुमचा परतावा अवलंबून असतो. आणि ही गुंतवणुकीतली जोखीम तुम्हाला उचलावीच लागते. पण, अभ्यास आणि माहितीपूर्वक केलेली गुंतवणूक चांगला परतावाही देऊन जाते.
 
7) शेअर बाजारातील गुंतवणुकीवर कर लागतो का?
शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचे अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीची गुंतवणूक असे दोन भाग पाडले जातात. एक वर्षांपेक्षा कमी मुदतीची गुंतवणूक ही अल्प मुदतीची असते. तर एक वर्षांपुढची गुंतवणूक ही दीर्घ. शेअर बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नावरचा कर हा मुदतीवर अवलंबून असतो.
 
आयपीओमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर अल्पमुदतीत मिळवलेला नफा हा करमुक्त असतो. तर 1-3 वर्षांपर्यंत शेअरमध्ये केलेली गुंतवणूक आणि तिचा परतावा हा करमुक्त असतो.
 
पण, त्याव्यतिरिक्त, अल्पमुदतीत म्हणजे एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून सरसकट 15% आयकर आकारला जातो. यात तुम्ही उत्पन्नाच्या कुठल्या मर्यादेत येता याचा विचार केला जात नाही. तर दीर्घ मुदतीच्या नफ्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन आकारला जातो. यालाही उत्पन्नाची मर्यादा नाही. हा कर 10% इतका आहे. आयकर विवरणपत्र भरताना तुम्ही त्या आर्थिक वर्षात शेअर बाजारातून कमावलेला नफा जाहीर करणं बंधनकारक आहे.
 
शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारल्या जाणाऱ्या आयकराविषयी सीए निखिलेश सोमण यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. "आयकर विवरणपत्र भरताना तुम्ही मागच्या तीन वर्षांत केलेले शेअर बाजारातले व्यवहार गृहित धरू शकता. म्हणजे गेल्यावर्षी शेअर बाजारात तोटा झाला असेल तर आताच्या वर्षात तेवढ्याच रकमेच्या नफ्यावरील कर रद्द होतो. म्हणजे आधीच्या वर्षातील नुकसानाचा फायदा तुम्हाला घेता येतो. ही तरतूद तीन वर्षांपर्यंत लागू आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सकाळी उठल्यावर मोबाइल वापल्याने....