शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत देऊन धीर द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. शेतकरी आमच्या जीवाभावाचे असल्यामुळे त्यांच्या असंतोषाचे नेतृत्व आम्ही करू, असा इशारा माजी खासदार उदयनराजे यांनी सरकारला दिला आहे.
उदयनराजे यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. "यावर्षी ऑगस्ट महिन्यात पूर आला. त्यात शेतकऱ्यांच्या साधनसंपत्तीचे नुकसान झाले होते. आता वादळ, चक्रीवादळ, हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली पिकं गेली आहेत. आम्ही दहा वर्षांपासून करत असलेली विमा योजनेची अंमलबजावणी झाली असती तर शेतकऱ्यांना मदतीसाठी हात पसरावे लागले नसते," असं उदयनराजे म्हणाले.
दरम्यान, सरकारनं शेतकऱ्यांसाठी वेगळं धोरण घेतल्याशिवाय शेतकरी वाचणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.