Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पानिपत: अहमद शाह अब्दालीच्या पात्रावरून अफगाणी फॅन्स चिडले आहेत कारण...

पानिपत: अहमद शाह अब्दालीच्या पात्रावरून अफगाणी फॅन्स चिडले आहेत कारण...
, सोमवार, 9 डिसेंबर 2019 (11:04 IST)
सुमारे 250 वर्षांपूर्वी झालेलं पानिपतचं युद्ध पुन्हा नव्या संदर्भांनी सुरू होणार की काय? पानिपत सिनेमाच्या निमित्ताने एका ट्वीटमुळे ही ठिणगी पुन्हा पडणार?
 
आशुतोष गोवारीकरच्या 'पानिपत'मध्ये संजय दत्तने अफगाणिस्तानच्या 17व्या शतकातील शासक अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारलीय. "त्याची जिथं सावली पडते, तिथं मृत्यू होतात" अशी आपल्या पात्राची ओळख संजूबाबाने ट्विटरवर केली आहे.
 
"भेटू या 6 डिसेंबर रोजी," असंही तो म्हटला आहे, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवण्यासाठी. मात्र, यामुळं अफगाणिस्तानातील बॉलीवुड फॅन्समध्ये संताप पाहायला मिळतोय.
 
'पानिपत' सिनेमाची कथा 17व्या शतकातील पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित आहे. हे युद्ध पेशव्यांच्या मराठा सैन्य आणि अब्दालीच्या अफगाणी सैन्यात झालं होतं. सिनेमाचा ट्रेलर पाहून तर असं वाटतं की हा सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरेल.
 
अफगाणिस्तानात हिंदी सिनेमा पाहणाऱ्यांचा आणि बॉलीवुडचे चाहते असलेला मोठा वर्ग आहे. मात्र आता त्यांना का राग आलाय?
 
इतिहासातील पात्रांवरील सिनेमे म्हटलं की वाद होणं सहाजिक असतं. आताही झाला आहेच, कारण अफगाणी सैन्याचा प्रमुख अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानसाठी राष्ट्राचा संस्थापक आणि हिरो आहे, तर भारतीयांसाठी असा आक्रमणकर्ता, ज्यानं पानिपतच्या युद्धात हजारो मराठा सैनिकांना मारलं.
 
पानिपत सिनेमाची पहिल्यांदा घोषणा झाली, तेव्हाच खरंतर यासदंर्भात काळजी व्यक्त करण्यात आली होती. 2017 मध्ये अफगाणिस्तानच्या मुंबईस्थित वाणिज्य दूतांनी थेट भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं दार ठोठावलं होतं.
 
अफगाणिस्तानचे भारतातील वाणिज्यदूत तसंच अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागारही असलेले नसीम शरीफ यांनी सांगितलं की, अफगाणी नागरिकांमध्ये अहमद शाह अब्दालींबद्दल आदराचं स्थान आहे. "जेव्हा सिनेमा बनत होता, तेव्हाच आम्ही विनंती केली होती की, सिनेमा आधी आम्हाला दाखवा. आम्ही कुठलीही बाब बाहेर लीक करणार नाही. मात्र, आमच्या सततच्या प्रयत्नांनांना सिनेमाच्या निर्मात्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही."
 
पण नंतर संजय दत्तचं ट्वीट आलं. त्यात संजय दत्तनं अहमद शाह अब्दालींची साकारलेल्या भूमिकेचा फोटो होता.
 
संजय दत्तच्या या पात्राबद्दल बोलताना अफगाणिस्तानातील ब्लॉगर इलाहा वालिझादे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "त्याला क्रूर दाखवलं गेलंय. त्यानं काजळ लावलंय. पण अब्दाली असा नव्हता. जसे कपडे त्याने परिधान केलेत, ज्याप्रकारे तो बोलतोय, हे अफगाणीही वाटत नाही. तो एखादा अरब व्यक्ती साकारलीय."
 
अफगाणिस्तानतील एक पिढी 'खुदा गवाह'सारखा सिनेमा पाहत मोठी झाली. अमिताभ बच्चन यांनी 'खुदा गवाह'मध्ये अत्यंत शूर अफगाणी देशभक्ताची भूमिका साकारली होती. तालिबान्यांच्या अंधारयुगात अफगाणी नागरिकांसाठी असे सिनेमे आशेची आणि आनंदाची किरणं होते.
 
या सिनेमातील गाणी अफगाणी लोकांनी लग्नसमारंभात वाजवली, या गाण्यावर ठेका धरला, डायलॉग पाठ केले आणि अगदी हिंदीही शिकले.
 
मात्र त्यानंतर 2018 मध्ये संजय लीला भंसाळीचा 'पद्मावत' सिनेमा आला. रणवीर सिंहने यात तुर्की-अफगाणी शासक अलाउद्दीन खिलजीची भूमिका केली होती. खिलजीनं 12व्या शतकात दिल्लीवर आक्रमण केलं होतं.
 
'पद्मावत' सिनेमा बॉक्स ऑफीस गाजला, समीक्षकांमध्ये त्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया होत्या. मात्र, या सिनेमात खिलजीची प्रतिमा अत्यंत क्रूर रंगवण्यात आल्यानं अनेक अफगाणी नाराज झाले होते. मात्र, या सिनेमावरून पेटून उठलेल्या एकमेव संघटनेपासून ते हजारो मैल दूर होते.
 
हेच साधारण वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'केसरी' सिनेमाबाबत झालं. ब्रिटिश सैन्यातील 21 शीख सैनिक आणि 10 हजारांहून अधिक अफगाणी सैन्यामध्ये ही ऐतिहासिक लढाई झाली होती. यातही अफगाणी सैन्याची प्रतिमा जबरदस्तीनं जमीन बळकावणारे आक्रमणकर्ते, अशी तयार केली गेल्याची टीका यावेळी करण्यात आली होती.
 
फेसबुक आणि ट्विटरसारखे प्लॅटफॉर्म हे अशा नाराजांसाठी एक माध्यम असतं, ज्याद्वारे इतर नाराजांना शोधू शकतात आणि आपल्याला झालेला भ्रमनिरास शेअर करू शकतात.
 
"सोशल मीडियामुळं लोक चुकीच्या पद्धतीनं रंगवलेल्या गोष्टी पाहत आहेत. अनेक अफगाणी तरुण ट्रेंड पाहतायत आणि त्यातील चर्चेत सहभागी होत आहेत," असं वालिझादे सांगतात.
 
"आधी हिंदी सिनेमातील छोट्याशा उल्लेखानंही अफगाणिस्तानातील नागरिक आनंदी व्हायचे. मात्र आता ते बारीक लक्ष देऊन सिनेमा पाहतात. चुकीची प्रतिमा रंगवणं ही आता एक जागतिक समस्या बनलीय. पण बॉलिवुडशी अफगाणिस्तानचं नातं पाहता, त्यांना जरा चांगल्या अपेक्षा आहेत."
 
काही लोकांना असं वाटतं की बॉलिवुडपटांमधली अफगाणी पात्रांच्या बदलत्या प्रतिमा अफगाणी प्रेक्षकांना आता खटकतेय कारण ते प्रगल्भ होत चालले आहेत. मात्र सिनेसमीक्षकांच्या मते, याला आणखी एक कारण आहे. गेल्या काही वर्षांत अनेक सिनेनिर्माते मुस्लीम पात्रांना क्रूर आणि अप्रेक्षणीय दाखवून भाजप सरकारच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
"सत्तेत असलेली बहुसंख्याकवादी, हिंदुत्ववादी पार्टी बॉलिवुडचा स्वतःची विचारसरणी लोकांवर सिनेमाद्वारे बिंबवण्याचा एक सौम्य प्रयत्न करत आहे," असं हफिंग्टन पोस्टचे मनोरंजन विभागाचे संपादक अंकुर पाठक सांगतात.
 
पाठक पुढे सांगतात, "मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिनेक्षेत्रातील स्टार्ससोबत सेल्फी काढणं असो, त्यांच्यासोबत भेटीगाठीचे कार्यक्रम आयोजित करणं असो किंवा राष्ट्रनिर्मितीसंदर्भातील बॉलिवुडमधील सिनेमांना प्रोत्साहन देणं असो, या सर्वांमागे भारताची सकारात्मक प्रतिमा बनवण्याचा एक अदृश्य प्रयत्न आहे. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास, याचा अर्थ मोदींची भारताबद्दलची कल्पना किंवा भाजपची भारताबद्दलची कल्पना, जी हिंदुत्ववादी आहे."
 
हा मार्ग अत्यंत घातक असल्याचंही अंकुर पाठक म्हणाले.
 
"कुठल्याही समूहाला चुकीच्या पद्धतीनं समोर आणणं, हे धोकादायक असतं. सध्याचं वातावरण पाहता आपल्याला यापासून दूर राहावंच लागेल," असंही पाठक म्हणतात.
 
पानिपत सिनेमाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत.
 
'फिल्म कंपॅनियन'शी बोलताना गोविरीकर सांगतात, "पानिपत हा सिनेमा हिंदू-मुस्लीम युद्धाबद्दल नाहीय. हा आक्रमणकर्त्याला रोखण्याबद्दल आहे. राज्य राखण्यासाठी लढलेल्या लढ्याबद्दल आहे आणि हीच या सिनेमाची मुख्य थीम आहे. अब्दालीनं आक्रमण केलं, मात्र त्याचवेळी आम्ही त्या पात्राची प्रतिष्ठाही राखली."
 
जर अब्दालीची प्रतिमा नकारात्मक रंगवली जात असती तर आपण ती भूमिका स्वीकारलीच नसती, असं आश्वासन संजय दत्तने दिलं होतं. मात्र अफगाणी वाणिज्यदूत शरीफ यांना अजूनही या सिनेमामुळं होणाऱ्या संभाव्य नुकसानाबद्दल काळजी वाटते.
 
प्रदर्शनाआधीच दोन्ही देशांमधील तज्ज्ञांच्या पॅनलनं या सिनेमाचं परीक्षण करावं, अशी इच्छा शरीफ यांनी व्यक्त केली होती.
 
या सर्व टीकेबद्दल बीबीसीनं अभिनेता संजय दत्तच्या प्रतिक्रियेसाठी त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.
 
बॉलिवुडचे अफगाणी चाहते मात्र या सिनेमामुळं नाराज होण्याची शक्यता आहे.
 
इतिहासात भारतीय सिनेमानं कायमच भारत-अफगाणिस्तान यांच्यातील संबंध मजबूत करण्याची भूमिका बजावलीय, असं अफगाणिस्तानच्या भारतातील माजी राजदूत डॉ. शायदा अब्दाली सांगतात.
 
"इतिहासातील एक महत्त्वाच्या घटनेबद्दल सांगताना, पानिपत सिनेमात सर्व तथ्यांना ध्यानात घेतलं असेल अशी आशा आहे," असंही डॉ. शायदा अब्दाली म्हणाल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अवकाळी पाऊस - केंद्राकडे 7 हजार 28 कोटींची मागणी