USB कॉंडम: तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर...

शनिवार, 7 डिसेंबर 2019 (15:29 IST)
सध्याच्या जगात ठिकठिकाणी मोबाईलचा वापर केला जातो. मोबाईल म्हटलं की त्यामध्ये बॅटरी असणारंच. बॅटरी नसेल तर मोबाईलचा उपयोग शून्य.
 
त्यामुळेच की काय मोबाईलची बॅटरी संपल्यानंतर जणू आयुष्यच थांबल्यासारखं वाटतं.
 
आज सगळीकडे डिजिटायझेशनचं वारं आहे. गेल्या काही दिवसांत एखादी सुई घेतल्यानंतरसुद्धा ऑनलाईन पेमेंट केलं जातं. त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलची बॅटरी फुल असणं ही सध्याच्या काळातली एक मूलभूत गरज बनली आहे.
 
म्हणूनच लोकांच्या सोयीसाठी विमानतळं, रेल्वेस्थानकं, सार्वजनिक शौचालयं, मॉल किंवा बाजारपेठांच्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगचे युएसबी पोर्ट लावण्याचा ट्रेंड भारतात सुरु झाला आहे.
 
लोक याला आपलं युएसबी कॉर्ड जोडतात आणि बॅटरी चार्ज करून घेतात. पण हे कितपत सुरक्षित आहे, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
 
ज्यूस जॅकिंग
अनेकांना मोबाईलचा चार्जर नेहमी सोबत बाळगण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे आपल्याला या समस्येतून मुक्त करण्यासाठी युएसबी पोर्ट आलेत खरे पण हे युएसबी पोर्ट आपल्या खासगी माहितीसाठी मोठा धोका ठरू शकतात.
 
सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या युएसबी पोर्टचा वापर सायबर गुन्हेगार आपली संवेदनशील माहिती चोरण्यासाठी करू शकतात.
 
याला तोंड देण्यासाठी बाजारात कथित युएसबी डेटा ब्लॉकर्स लावण्यात आले आहेत. रंजक बाब म्हणजे यांना 'युएसबी कॉंडम' असं नाव देण्यात आलं आहे.
 
पण थांबा, हे कॉंडम खऱ्याखुऱ्या कॉन्डमप्रमाणे रबरी नाहीत.
 
हे युएसबी कॉंडम तुम्हाला सुरक्षित ठेवतात. तुमची माहिती चोरली जाण्यापासून (ज्यूस जॅकिंग) हे तुम्हाला वाचवतात.
 
ज्यूस जॅकिंग हा एक सायबर हल्ला आहे. ज्यामध्ये सार्वजनिक युएसबी पोर्टच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचता येतं. तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर इंस्टॉल केलं जातं. हे मालवेअर सायबर गुन्हेगाराला तुमची माहिती मिळण्यास मदत करतात.
 
यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ल्यूक सिसक यांनी याबाबत इशारा दिला होता. ल्यूक अमेरिकेत लॉस एंजल्सस्थित काऊंटी कार्यालयात सहायक म्हणून काम करतात.
 
युएसबी कॉंडम एका लहान युएसबी अॅडॉप्टरप्रमाणे आहेत. ज्यामध्ये इनपुट आणि आऊटपुट पोर्ट असतात. हा अडॉप्टर मोबाईलला चार्जिंग पुरवतो पण माहितीची देवाणघेवाण पूर्णपणे थांबवतो.
 
किंमत काय?
युएसबी कॉंडम अमेरिकन बाजारपेठांमध्ये 10 डॉलरना उपलब्ध आहे. भारतात ऑनलाईन स्वरूपात तुम्ही हा कॉंडम खरेदी करू शकता. यासाठी 500 ते 1000 रुपये किंमत तुम्हाला मोजावी लागेल.
 
ल्यूकच्या मते, सायबर हल्ल्याचे परिणाम भयानक असू शकतात. याबाबत सावधगिरीचा इशारा देताना ते सांगतात, पूर्णपणे मोफत असलेलं एक बॅटरी चार्जिंग पॉईंट तुमचं बॅंक खातं रिकामं करू शकतं. सायबर हल्लेखोराने मालवेअर तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल केलं तर ते तुमचा फोन ब्लॉक करू शकतात. पासपोर्ट किंवा घरचा पत्ता यांसारख्या संवेदनशील माहितीची चोरी करू शकतात.
 
आयबीएमच्या सायबर सुरक्षा अहवालानुसार, मालवेअर कंप्युटिंग क्षमता हायजॅक करू शकतात. त्यामुळे तुमचा मोबाईल संथपणे काम करु लागतो.
 
अहवालात संवेदनशील माहितीची चोरी होण्याचा धोकाही सांगितला आहे. सायबरतज्ज्ञसुद्धा लोकांना युएसबी कॉंडमचा वापर करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

पुढील लेख हैदराबाद 'एन्काऊंटर': तेलंगणा पोलिसांच्या दाव्यावर उपस्थित होणारे 5 प्रश्न