Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार 'मराठा' नेत्याच्या प्रतिमेतून बाहेर पडू पाहत आहेत?

अजित पवार 'मराठा' नेत्याच्या प्रतिमेतून बाहेर पडू पाहत आहेत?
, गुरूवार, 2 जानेवारी 2020 (17:26 IST)
"कोरेगाव भीमाच्या लढ्याला एक इतिहास आहे. या युद्धातील शूरवीरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी लोक दरवर्षी येतात. ही एक परंपरा आहे. मी महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या वतीनं या शौर्यस्तंभाला अभिवादन करतो. मध्ये काही घटना घडल्या होत्या. सरकार त्यामध्ये चांगल्या प्रकारची काळजी घेत आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी शांतता राखावी. कोणत्याही प्रकारे अफवा पसरवू नये," असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं होतं.
 
1 जानेवारीला ते भीमा-कोरेगाव इथं विजयस्तंभ अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भीमा-कोरेगावच्या लढाईचं महत्त्व अधोरेखित केलं.
 
1 जानेवारीला भीमा-कोरेगाव इथं विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम पार पडतो. 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान युद्ध झालं होतं. ब्रिटिशांनी या युद्धात विजय मिळवला होता. या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते.
 
दलित समाजाचे लोक दरवर्षी या दिवशी भीमा कोरेगाव इथं जमतात आणि या युद्धातील वीरांचं स्मरण करतात. 1 जानेवारी 2018 ला विजयस्तंभाच्या कार्यक्रमावेळी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. त्यामुळेच या कार्यक्रमासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावणं हे खूप महत्त्वाचं होतं.
 
दलित समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न?
या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील इंदू मिल स्मारकाला भेट दिली. "या कामाची प्रगती कशी होतीये, काही अडचणी आहेत का हे पाहण्यासाठी इथं आलो होतो," असं अजित पवार यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय भव्यदिव्य स्मारक आम्ही उभारु. शेकडो वर्षांसाठी हे स्मारक लोकांसाठी प्रेरणा देईल. हे स्मारक इतकं भव्य-दिव्य करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरुन इथं येणाऱ्या प्रत्येकाला या स्मारकाला भेट द्यावी वाटेल," असंही अजित पवार यांनी म्हटलं.
 
भीमा कोरेगाव असो की इंदू मिल हे दलित समाजासाठी अस्मितेचे मुद्दे आहेत. या दोन्ही ठिकाणी भेटी देत अजित पवार हे आपलं राजकारण अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करत आहेत का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
कारण अजित पवार यांच्याकडे मराठा समाजातील नेतृत्व याच म्हणूनच पाहिलं जातं. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमाही मराठ्यांचा पक्ष अशीच आहे.
 
अगदी आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे नजर टाकली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 मंत्री हे मराठा आहेत. वंजारा आणि मुस्लिम समाजातील प्रत्येकी दोन जणांना राष्ट्रवादीनं मंत्रिपद दिलं आहे. तर माळी, धनगर, गवळी समाजातील प्रत्येकी एका जणाचा समावेश राष्ट्रवादीनं मंत्रिमंडळात केला आहे. संजय बनसोडे हे राष्ट्रवादीच्या यादीतील एकमेव दलित मंत्री आहेत. संजय बनसोडे हेसुद्धा अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात.
 
त्यामुळेच अजित पवार आता काका शरद पवारांप्रमाणेच बेरजेचं राजकारण करण्यासाठी दलित समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत का?
 
पक्षाच्या वाढीसाठी सोशल इंजिनिअरिंग
न्यू इंडियन एक्सप्रेसचे असिस्टंट एडिटर सुधीर सूर्यवंशी यांनी अजित पवारांच्या या राजकारणाबद्दल बोलताना म्हटलं, की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दलित मतं न मिळाल्याचा फटका बसला. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादीची बरीच मतं घेतली.
 
पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दलितांची सोबत मिळाली नाही. या दोन्ही पक्षांना मिळालेल्या जागांमध्ये मराठा, ओबीसी समाजाच्या मतांचा वाटा फार मोठा आहे. त्यामुळे आता यापुढे पक्षाचा आधार वाढवायचा असेल तर सोशल इंजिनिअरींगला पर्याय नाही याची जाणीव अजित पवारांना झालेली असावी. शिवाय भाजपसोबत जाऊन अजित पवार यांच्या प्रतिमेला जो तडा गेला होता, तो सुधारण्याच्या दृष्टिनंही ते आता स्वतःची सर्वसमावेशक अशी प्रतिमा तयार करुन कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
"अजित पवार हे पक्षांतर्गतही हे सोशल इंजीनिअरिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळालेले संजय बनसोडे हे अजित पवारांच्या गोटातील मानले जातात. आतापर्यंत पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून प्रामुख्यानं छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जायचं. पण आता दुसरीकडे पर्यायी ओबीसी नेतृत्व म्हणून धनंजय मुंडेंना 'तयार' केलं जात आहे. मुंडे हेसुद्धा अजित पवार यांच्याच जवळचे आहेत.
 
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हेदेखील अजून एक नाव आहे. भरणे हे धनगर समाजातील आहेत. गेल्या काही काळात धनगर समाज भाजपच्या जवळ गेला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी दत्तात्रय भरणेंना मंत्री करण्यात आलं आहे," असं सूर्यवंशी यांनी म्हटलं.
 
'प्रत्यक्ष निर्णयातून चित्र अधिक स्पष्ट होईल'
"पवार यांची प्रतिमा मराठा नेते अशीच आहे. पण अजित पवार हे आता उपमुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळे आपोआपच पक्षाचे नेते म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. या नात्यानं दलित समाजाशी जोडून घेणं ही त्यांची आणि पक्षाची गरज आहे. शरद पवार वगळता पक्षातील अन्य नेत्यांना त्याची फारशी गरज वाटली नव्हती. अजित पवारांना या गोष्टीची जाणीव झालीये, हे स्वागतार्ह आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
 
"पण भीमा कोरेगाव किंवा इंदू मिल स्मारकाला भेट देणं या प्रतिकात्मक गोष्टी आहेत. आता अजित पवार प्रत्यक्ष निर्णय घेताना यासंदर्भात काय भूमिका घेतील यावरुन गोष्टी अधिक स्पष्ट होतील," असंही चोरमारे यांनी म्हटलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढ