आतिश अली तासीर याचं OCI कार्ड रद्द , पंतप्रधानांविरोधात लिहिलेल्या लेखामुळं कारवाई?

शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (15:11 IST)
लेखक आणि पत्रकार आतिश अली तासीर यांच्या ओवरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीई)/ पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजन (पीआईओ) कार्डवरून वाद रंगला आहे.
 
भारत सरकारने आतिश अली तासीर यांचं OCI कार्ड रद्द केलं आहे. या कार्डासाठी ते अपात्र असल्याचं त्यांना गृह मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. यावर आतिश अली तासीर म्हणतात, की त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना पुरेसा वेळच देण्यात आला नाही.
 
OCI कार्डामुळे भारतीय वंशाच्या परदेशी लोकांना भारतात येणं, इथं राहणं आणि काम करण्याचे अधिकार प्राप्त होतात. परंतु अशा व्यक्तीला मतदान करणं आणि कुठलंही संविधानिक पद स्वीकारण्याचे अधिकार नसतात.
 
भारतीय वंशाच्या लोकांना PIO, OCI कार्ड दिलं जातं.
 
आतिश अली तासीर यांचे वडील सलमान तासीर पाकिस्तानचे उदारमतवादी नेते होते. ईशनिंदेच्या कायद्याविरोधात बोलल्यामुळे पाकिस्तानात त्यांच्याच अंगरक्षकानं त्यांच्यावर गोळी घालून हत्या केली होती. भारतातील प्रसिद्ध पत्रकार तवलीन सिंह या तासीर यांच्या आई आहेत.
 
नक्की प्रकरण काय आहे?
'टाइम' मासिकात मोदी यांच्यावर टीका करणारा लेख लिहिल्यामुळे लेखक आतिश अली तासीर यांचं ओसीआय कार्डं रद्द करण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती `द प्रिंट'नं गुरुवारी (7 नोव्हेंबर) दिली होती.
 
आतिश तासीर यांनी अमेरिकेतल्या प्रसिद्ध 'टाइम' मासिकाच्या मे महिन्याच्या अंकात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक लेख लिहिला होता.
 
या अंकाच्या मुखपृष्ठावर नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह `इंडियाज डिव्हायडर इन चीफ' हा लेख लिहिला होता. या लेखावरून भारतातही अनेक वाद रंगले होते.
 
`द प्रिंट'च्या या बातमीवर भारतीय गृह मंत्रालयानं गुरुवारी (7 नोव्हेंबर) रात्री ट्वीटरवरून खुलासा दिला आहे.
 
प्रशासनाच्या ट्वीटर हँडलवरून 'द प्रिंटमधील वृत्त पूर्णपणे चुकीचं असून यात काहीही तथ्य नाही' असं ट्वीट करण्यात आलं आहे.
तसंच गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या संदर्भात आणखी काही ट्वीट केले. यातील एका ट्वीटमध्ये "तासीर यांनी पीआयओसाठी अर्ज करताना त्यांचे वडील पाकिस्तानी वंशाचे आहेत ही बाब लपवली होती,'' असं म्हटलं आहे.
 
तर आणखी एका ट्वीटमध्ये "तासीर यांना पीआयओ/ओसीआय कार्डासंदर्भात उपस्थित केलेल्या शंकाचं निरसन करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. पण त्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत," असंही सांगण्यात आलं आहे.
 
प्रवक्त्यांच्या अन्य ट्वीटमध्ये असंही म्हटलं आहे, की तासीर नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत ओसीआय कार्ड प्राप्त करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांनी मूलभूत गोष्टी लपवल्या आहेत आणि सुस्पष्टतेचे पालन केलं नाहीये.'
आतिश तासीर यांचं स्पष्टीकरण
 
आतिश तासीर यांनी भारतीय गृहमंत्रालयानं जे आरोप केले आहेत ते साफ नाकारले असून स्पष्टीकरणासाठी एक इमेज ट्वीट केलं आहे.
 
या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं, की मंत्रालयाच्या आरोपात तथ्य नाही. माझ्या उत्तरांवर कौन्सिल जनरल यांनी अक्नॉलजमेंट (पावती) दिली आहे. मला उत्तर देण्यासाठी 21 दिवसांचा अवधी देणं अपेक्षित असतानाही त्यांनी मला 24 तासांची मुदत दिली होती. पण तेव्हापासून मंत्रालयाकडून मला कुठलीही सूचना मिळालेली नाही.
 
आतिश तासीर यांनी या ट्वीटबरोबर आपल्या मेलची एक इमेजही टाकली आहे. भारतीय गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या पत्राला त्यांनी उत्तर दिल्याचं त्यात दिसत आहे, तसंच हा मेल मिळाल्यासंदर्भात डेप्युटी कौन्सिल जनरल यांच्याकडून अक्नॉलेजमेंटही देण्यात आलं आहे.
 
यानंतर लगेचच दोन तासांत त्यांचं ओसीआय कार्डं रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाळी आणि या सूचनेचा स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केला आहे.
नियमांनुसार ओसीआय नोंदणी रद्द करण्यात येत असून त्यांच्याकडील ओसीआय कार्ड न्यूयॉर्कच्या भारतीय दूतावासाकडे जमा करण्याच्या सूचना तासीर यांना देण्यात आल्या आहेत.
 
"काही तासांपूर्वी भारतीय गृह मंत्रालयानं मी त्यांना उत्तर दिल्याचं माहीत नसल्याचं मान्य केलं होतं. आता गृह मंत्रालय बंद असूनही माझं ओसीआय रद्द करण्याची जबाबदारी योग्य अधिकाऱ्याकरवी पार पाडण्यात आली आहे," असं सांगणारा स्क्रीनशॉट तासीर यांनी शेअर केला आहे.
 
तसंच माझं ओसीआय कार्ड इतक्या तातडीनं रद्द करणं ही भयंकर योजना असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी बीबीसीच्या सौतिक बिस्वास यांच्याशी संवाद साधला.
 
"मी 2 वर्षांपासून दहाव्या वर्षांपर्यंत भारतात राहिलोय. तसंच वय वर्षे 26 ते 35 या काळातही मी इथे राहिलोय. माझ्याकडे भारताच्या स्थानिक बँकांची खाती आहेत, ओळख क्रमांक आहे आणि मी या देशाचे कर भरतो,'' असं तासीर सांगत होते.
 
"माझ्या वडिलांचं नाव नागरिकत्वाच्या कागदपत्रांवर आहे. याव्यतिरिक्त ते माझे वडील आहेत हे सिद्ध करणारे कुठलीही कागदपत्रं माझ्याकडे नाहीत, कारण माझी आईच त्यांच्याबरोबर राहात नाही. मग यात अपारदर्शकता कोठे आहे? मी याबद्दल त्यांना लिहिलंही आहे.'' तासीर त्यांची मतं बीबीसीला सांगत होते.
 
"मी फसवणूक केल्याचा आरोप ते माझ्यावर लावत आहेत. त्यांनी मला काळ्या यादीत टाकलंय. आता मी भारतात सर्वसाधारण नागरिक म्हणून येऊ शकत नाही. माझी आजी 90 वर्षांची आहे आणि ती भारतात राहाते. मी आता तिला कधीच पाहू शकणार नाही. माझ्या वडिलांनी मला मोदींच्या सत्ताधारी भाजपसाठी 'विशेषतः असुरक्षित' बनवलं आहे.'' तासीर पुढे म्हणाले.
 
गृहमंत्रालयाच्या या निर्णयावर भारत आणि परदेशातही जोरदार टीका होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख चीनने लावला व्हीडिओ गेम खेळण्याच्या वेळांवर कर्फ्यू