समीरात्मज मिश्र
बनारस हिंदू विद्यापीठातील संस्कृत विद्या धर्म विज्ञान विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेल्या फिरोज खान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.
आयुर्वेद विभागात याच पदावर त्यांची नियुक्ती झाल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु त्या पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला आहे की नाही, याबद्दल विद्यापीठातून अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
फिरोज खान यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी धरणं धरलेल्या विद्यार्थ्यांना संस्कृत धर्म विज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक कौशलेंद्र पांडेय यांनी या घडामोडीची माहिती दिली. फिरोज खान यांच्या राजीनाम्याची माहिती पांडेय यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवली.
ते विद्यार्थ्यांना म्हणाले, "संस्कृत धर्मविज्ञान विभागातील साहित्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक पदावरील डॉक्टर फिरोज खान यांनी 9 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणप्रक्रियेत आणि परीक्षांमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात येत आहे."
सोनवारी संध्याकाळी उशिरा फिरोज खान यांनी या विभागातील प्राध्यापकांच्या उपस्थितीत राजीनामा दिला, असं सांगण्यात येत आहे. मात्र याची माहिती लोकांना बऱ्याच उशिरा देण्यात आली. याबाबत विद्यापीठ प्रशासन आणि फिरोज खान यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु प्रा. पांडे यांनी खान यांच्या राजीनाम्याची माहिती देऊन राजीनामा स्वीकारला जाईल, असं सांगितलं.
विद्यार्थ्यांचा विरोध
मुस्लीम शिक्षकाची नियुक्ती होण्यावर संस्कृत विद्या धर्म विज्ञान विभागाचे विद्यार्थी प्रश्न उपस्थित करत होते आणि त्याला विरोध करत होते. सुमारे एक महिना हे धरणं आंदोलन सुरू होतं. तसेच त्यांनी सेमिस्टर परीक्षेवर बहिष्कार घातल्यामुळे ही परीक्षा दोनवेळा पुढे ढकलण्यात आली होती.
फिरोज खान यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलनसुद्धा संपलं आहे.
आयुर्वेद विभागात याच पदावर फिरोज खानयांची नियुक्ती झाल्याचं आणि तिथला पदभार स्वीकारल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु त्या पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला आहे की नाही विद्यापीठ प्रशासन किंवा फिरोज खान यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यांची गेल्या काही दिवसांमध्ये कला विभाग आणि आयुर्वेद विभाग या दोन्ही ठिकाणी संस्कृत विभागात नियुक्ती झाली होती.
BHUमध्ये कला विभाग, संस्कृत विद्या धर्म आणि आयुर्वेद विभागात संस्कृत शिकवलं जातं. फिरोज खान यांची संस्कृत विद्या धर्म विज्ञान विभागात नियुक्ती झाली होती. त्या विभागात धर्मशास्त्र शिकवलं जातं. त्यामुळे एक मुस्लीम व्यक्ती हिंदू धर्मशास्त्र कशी शिकवू शकते, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला होता.
फिरोज खान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी धरणं आंदोलन समाप्त केलं आहे. आंदोलनात सहभागी झालेले एक विद्यार्थी चक्रपाणी ओझा म्हणाले, "आम्हाला फिरोज खान यांच्याशी किंवा त्यांनी संस्कृत शिकवण्याशी काहीही समस्या नव्हती. मात्र त्यांची नियुक्ती ज्या विभागात झाली होती तिथं हिंदू नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती होऊ शकत नाही."