Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मायकल ब्लूमबर्ग: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार अब्जाधीश माध्यमसम्राट

मायकल ब्लूमबर्ग: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार अब्जाधीश माध्यमसम्राट
, बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (14:06 IST)
अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाणारे मायकल ब्लूमबर्ग हे आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. मायकल ब्लूमबर्ग यांनी न्यूयॉर्कचे महापौर म्हणूनही काम पाहिलं आहे.
 
डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ब्लूमबर्ग यांनी स्वतःच्या नावाची घोषणा केली आहे. 77 वर्षीय ब्लूमबर्ग यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे, की आपण ट्रंप यांचा पराभव करून अमेरिकेची पुनर्उभारणी करण्यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहोत.
 
मी त्यासाठी सगळं पणाला लावायला तयार आहे, असंही ब्लूमबर्ग यांनी लिहिलं आहे.
 
डेमोक्रॅटिक पक्षाकडून ब्लूमबर्ग यांच्यासह 17 जण अध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी रिंगणात आहेत. 2020 साली होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी मिळवून ट्रंप यांना आव्हान दिलं जाईल.
 
सध्या डेमोक्रॅटिक पक्षातील उमेदवारांची यादी पाहिली तर माजी उपाध्यक्ष जो बायडेन, सिनेटर एलिझाबेथ वॉरेन आणि बर्नी सँडर्स यांची नावं आघाडीवर आहेत.
 
अमेरिकेतील संपत्तीच्या असमान वाटपावरून अनेक महिने झालेल्या चर्चेनंतर ब्लूमबर्ग हेदेखील अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत सहभागी झाले. एलिझाबेथ वॉरेन आणि बर्नी सँडर्स यांनी अब्जाधीशांवरील करांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचे संकेत दिले होते. सप्टेंबर महिन्यात कर प्रस्तावांबद्दल बोलताना सँडर्स यांनी म्हटलं होतं, की अब्जाधीशांची काही आवश्यकता नाही.
 
याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी ब्लूमबर्ग यांना टोमणा मारत म्हटलं होतं, "ब्लूमबर्ग यांच्याविरोधात लढण्यापेक्षा मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीविरोधात लढणं पसंत करेन."
 
ज्या दिवशी ट्रंप यांनी हे वक्तव्य केलं, त्याच दिवशी ब्लूमबर्ग यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीसाठी अलाबामामधून अर्ज भरला.

"ट्रंप यांनी हरवण्यासाठी काय करावं लागतं ते मला चांगलंच माहीत आहे कारण मी ते आधी केलं आहे आणि आताही करेन," अशा अर्थाचं ट्वीटही त्यांनी केलं होतं.
 
कोण आहेत मायकल ब्लूमबर्ग?
ब्लूमबर्ग हे अमेरिकेतील आठव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्जनं दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती ही जवळपास 54.4 अब्ज डॉलर्स इतकी आहेत.
 
मॅसेच्युसेट्समध्ये जन्म झालेल्या ब्लूमबर्ग यांनी वॉल स्ट्रीटवरील बँकर म्हणून व्यवसायाची सुरूवात केली. माध्यमांमधलं आपलं साम्राज्य उभं करण्यापूर्वी ब्लूमबर्ग बँकर म्हणून कार्यरत होते.
 
आपला व्यवसाय वाढवत असतानाच ब्लूमबर्ग यांनी शैक्षणिक, वैद्यकीय आणि अन्य कार्यांसाठीही लक्षावधींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी राजकीय देणग्याही दिल्या.
 
2001 मध्ये ब्लूमबर्ग हे न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आले आणि सलग तीन वेळा त्यांनी हे पद सांभाळले. 2013 पर्यंत मायकल ब्लूमबर्ग न्यूयॉर्कचे महापौर होते.
 
तेव्हापासूनच त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेबद्दल चर्चा सुरू होती.
 
ब्लूमबर्ग निवडणुकीच्या रिंगणात का उतरले?
ब्लूमबर्ग हे अतिशय हुशार आणि चाणाक्ष व्यावसायिक आहेत. तुलनेनं उशीर झाला असला तरी डेमॉक्रॅटिक पक्षात अजूनही फारसा समर्थ उमेदवार नाहीये, हे कदाचित त्यांनी जोखलं असावं.
 
या घडीला डेमोक्रॅटिक पक्षात चार महत्त्वाचे उमेदवार आहेत. त्यांची स्वतःची बलस्थान आहेत तसंच काही कमकुवत बाजूही. या उमेदवारांना सुरुवातीच्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये लढू द्यायचं आणि नंतर मार्चमध्ये डझनभर राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या वेळी आपल्याकडील साधनसंपत्तीच्या जोरावर आघाडी घ्यायची, अशी ब्लूमबर्ग यांची सध्याची व्यूहरचना दिसत आहे.
 
यामध्ये धोकाही आहे आणि ब्लूमबर्ग यांच्याइतकी अफाट संपत्ती असलेली व्यक्तीच हा धोका पत्करू शकते.
 
अर्थात, सध्याच्या काळात डेमॉक्रॅट्स न्यूयॉर्कमधील या धनाढ्य, व्यवसायाला प्राधान्य देणाऱ्या, आर्थिक आघाडीवर पारंपरिक विचार करणाऱ्या आणि आक्रमक राजकीय सुधारणांचा आग्रह धरणाऱ्या या व्यक्तीला पाठिंबा देतील असा विचार करणं धाडसांचे ठरेल पण डाव्या विचारांकडे झुकू लागलेल्या पक्षाला उद्योगस्नेही मध्यममार्गाकडे वळविण्यासाठी ब्लूमबर्ग प्रयत्न करू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे: शिवसेना पक्षप्रमुखांचा प्रवास ‘दादू’पासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपद