Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी
, सोमवार, 16 डिसेंबर 2019 (15:56 IST)
उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांना दोषी ठरवण्यात आलंय. दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाने हा निकाल दिलाय.
 
19 तारखेला शिक्षेची सुनावणी होईल. सध्या सेंगर दिल्लीतल्या तिहार तुरुंगात आहे. महिला आरोपी शशी सिंह याही दोषी ठरल्या आहेत.
 
सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर हा खटला उत्तर प्रदेशातून दिल्लीत हलवण्यात आला होता. CBIने चार्चशीट सादर करायला उशीर केल्याबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली.
 
4 जून 2017 रोजी पीडित मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कारला एका ट्रकने संशयास्पदरीत्या धडक दिली होती. या अपघातात तिच्या दोन नातेवाइकांचा मृत्यू झाला होता.
 
या प्रकरणातले मुख्य आरोपी भाजपचे 'बाहुबली' आमदार असल्यामुळे या खटल्याकडे देशाचं लक्ष होतं.
 
कोण आहे कुलदीप सिंह सेंगर?
राजकीय कारकिर्दीची सुरुवात सेंगर यांनी काँग्रेसपासून केली. 2002च्या निवडणुकांआधी त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने हरवलं. 2007येईपर्यंत त्यांची बाहुबलीसारखी प्रतिमा निर्माण झाली. यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.
 
2012मध्ये सपाच्या तिकfटावर त्यांनी निवडणूक लढवत जिंकली आणि 2017मध्ये ते भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. 2002पासून सेंगर हे सलग आमदार आहेत. 2002 ते 2017च्या दरम्यान ते बसपी, सपा चे आमदार होते आणि आता ते भाजपचे आमदार आहेत.
 
पण त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
 
आतापर्यंत काय झालं?
4 जून 2017 - नोकरी मिळवण्यासाठी मदत मागायला कुलदीप सिंह सेंगरकडे गेलेली असताना या आमदाराच्या घरी आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप पीडित मुलीने केला.
 
11 जून 2017 - यानंतर 11 जूनला ही मुलगी बेपत्ता झाली. यानंतर या मुलीच्या कुटुंबाने ती हरवल्याची तक्रार दाखल केली.
 
20 जून 2017 - ओरैयाच्या एका गावात ही मुलगी सापडली आणि दुसऱ्या दिवशी तिला उन्नावमध्ये आणण्यात आलं.
 
22 जून 2017 - पीडितेला कोर्टात हजर करण्यात आलं. आणि CrPCच्या कलम 164 खाली तिचा जबाब नोंदवण्यात आला. हा जबाब देताना पोलिसांनी आमदार कुलदीप सिंह सेंगरचं नाव घेऊ न दिल्याचा आरोप पीडित मुलीने केला होता.
 
3 जुलै 2017 - जबाब नोंदवण्यात आल्याच्या 10 दिवसांनंतर पोलिसांनी या मुलीला कुटुंबाकडे सोपवलं आणि पीडिता दिल्लीत आली. पोलिसांनी आपलं शोषण केल्याचं पीडितेने म्हटलं. आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांचा भाऊ अतुल सिंह सेंगर यांची नावं FIRमध्ये सामील करण्यात यावी, अशी मागणी पीडित मुलीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.
 
24 फेब्रुवारी 2018 - पीडितेच्या आईने पुढे येत उन्नावच्या मुख्य ज्युडिशल कोर्टाकडे CrPCच्या कलम 156(3)नुसार FIR दाखल करण्याची मागणी केली.
 
3 एप्रिल 2018 - कुलदीप सिंह सेंगर यांचा भाऊ अतुल सिंह सेंगर याने मुलीच्या वडिलांना मारहाण केली.
 
4 एप्रिल 2018 - यानंतर उन्नाव पोलिसांनी या मुलीच्या वडिलांवर बेकायदेशीररीत्या हत्यारं बाळगण्याचा आरोप ठेवत त्यांना आर्म्स अॅक्टअंतर्गत अटक केली.
 
8 एप्रिल 2018 - FIR दाखल करण्याच्या मुद्यावरून पीडित मुलीने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याचा आरोप करण्यात आला आणि एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर आपल्याला त्रास देण्यात येत असल्याचा आरोप या मुलीच्या कुटुंबाने केला.
 
9 एप्रिल 2018 - या मुलीच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला.
 
10 एप्रिल 2018 - पोस्टमॉर्टेममध्ये त्यांच्या शरीरावर 14 ठिकाणी जखमा झाल्याचं आढळलं. या प्रकरणी सहा पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं आणि न्यायालयीन तपासाचे आदेश देण्यात आले.
 
11 एप्रिल 2018 - राज्यातल्या योगी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं.
 
12 एप्रिल 2018 - अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेंगरला आरोपी बनवण्यात आलं. पण अटक मात्र करण्यात आलं नाही. अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेत कुलदीप सिंह सेंगरला अटक करण्यात येणार की नाही, याविषयी विचारणा केली.
 
13 एप्रिल 2018 - सीबीआयने सेंगरना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर अटक करण्यात आली आणि नवीन एफआयआर दाखल करण्यात आली.
 
11 जुलै 2018 - या प्रकरणी सीबीआयने पहिली चार्जशीट दाखल केली ज्यामध्ये कुलदीप सिंह सेंगरचं नाव होतं.
 
13 जुलै 2018 - या प्रकरणातली दुसरी चार्जशीट दाखल करण्यात आली. आणि पीडीत मुलीच्या वडिलांना तथाकथितरित्या अडकवण्याप्रकरणी कुलदीप सेंगर, त्यांचा भाऊ अतुल सेंगर आणि काही पोलिसांना आरोपी बनवण्यात आलं. या प्रकरणी कुलदीप सेंगर, अतुल सेंगरसह सात आरोपी आहेत.
 
28 जुलै 2019 - पीडीत मुलगी आपली काकी, मावशी आणि वकिलांसोबत रायबरेलीला जात असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये या मुलीच्या काकीचा आणि मावशीचा मृत्यू झाला. पीडीत मुलगी आणि तिच्या वकिलांना उपचारांसाठी लखनऊच्या किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि दोघांनाही लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं. ज्या ट्रकने कारला धडक दिली होती त्याच्या नंबरप्लेटवर ग्रीस लावून नंबर लपवण्यात आला होता.
 
1 ऑगस्ट 2019 - त्यावेळचे चीफ जस्टिस रंजन गोगोई यांनी पाचही प्रकरणं लखनऊच्या कोर्टातून दिल्लीच्या सीबीआय कोर्टात हलवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सुनावणी रोज व्हावी आणि 45 दिवसांत सुनावणी पूर्ण करण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले.
 
2 ऑगस्ट 2019 - पीडीत मुलीच्या काकांना सुरक्षेच्या कारणास्तव रायबरेलीतल्या तुरुंगातून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये हलवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
 
5 ऑगस्ट 2019 - पीडित मुलीवर अधिक चांगले उपचार करता यावेत यासाठी तिला लखनऊमधून दिल्लीला आणण्यात यावं असं आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
 
9 ऑगस्ट 2019 - दिल्लीतल्या सत्र न्यायालयाने कुलदीप सेंगरविरोधातले आरोप निश्चित केले. त्यांच्यावर बलात्कार [376(1)] आणि कट रचणे [(120 B)] सह भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत. सोबतच पॉक्सो कायद्याच्या कलम तीन आणि चार नुसारही प्रकरण दाखल करण्यात आलेलं आहे.
 
14 ऑगस्ट 2019 - पीडीत मुलीच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी सेंगरसह नऊ लोकांवर कोर्टाने आरोप निश्चित केले.
 
7 सप्टेंबर 2019 - पीडीत मुलीचा जबाब नोंदवण्य़ासाठी दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये तात्पुरतं न्यायायस स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
 
29 सप्टेंबर 2019 - कोर्टाच्या आदेशानुसार या पीडीत मुलीची आणि तिच्या कुटुंबाची दिल्लीमध्ये तात्पुरती (11 महिन्यांसाठी) राहण्याची सोय सुरक्षित ठिकाणी करण्यात आल्याचं दिल्लीच्या महिला आयोगाने सांगितलं.
 
11 ऑक्टोबर 2019 - पीडीतेच्या कारवर हल्ला करण्याप्रकरणी सीबीआयने कुलदीप सेंगरच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केली.
 
10 डिसेंबर 2019 - कोर्टाने आपला निकाल 16 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला. जर कोणत्याही मुद्द्याबाबत दोन्ही पक्षांकडून नव्याने युक्तीवाद करण्याची मागणी करण्यात आली नाही, तर निकाल सुनावण्यात येईल.
 
16 डिसेंबर 2019 - उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सेंगर दोषी, 19 तारखेला शिक्षा सुनावली जाणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Aadhaar -PAN : पॅन-आधार असं लिंक करा, 31 डिसेंबर शेवटची तारीख