Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CCD : उत्तराधिकारी आता कोण... की कंपनी विकली जाणार?

CCD
, शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (13:53 IST)
व्ही. जी. सिद्धार्थ हेगडे यांच्या मृत्यूनंतर आता कॅफे कॉफी डे (सीसीडी)च्या भविष्याबद्दल सवाल निर्माण झाले आहेत.
 
सीसीडीचे शेअर्स गेल्या तीन दिवसांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घसरले असले तरी कंपनीची स्थिती अजूनही अत्यंत वाईट झाली नसल्याचं, या उद्योगावर नजर ठेवून असणाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
सीसीडीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश मल्होत्रांनी बीबीसीला सांगितलं, "सीसीडी तोट्यात असणारी कंपनी नाही, उलट प्रत्यक्षात या कंपनीने नफा कमावलेला आहे. कर्जाची समस्या असली तरी तिच्यावर तोडगा काढता येणार नाही, असं नाही. आणि ज्या कंपनीला वेगाने प्रगती असते त्यांच्यासमोर कर्जाची अडचण येतेच."
 
व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगाला सामोरं जायला आणि या दुःखातून सावरायला वेळ द्यायला हवा, असं कॉफी उद्योगाचा अभ्यास असणाऱ्यांचं म्हणणं आहे. भविष्यामध्ये सीसीडीचा उद्योग कसा सांभाळायचा हे ठरवण्यासाठी सिद्धार्थ यांच्या कुटुंबाला वेळ द्यायला हवा, असं तज्ज्ञ सांगतायत.
 
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर कंपनीच्या एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, "सिद्धार्थ यांची पत्नी मालविका आणि त्यांच्या दोन्ही मुलाकडे कंपनीचे सर्वाधिक (54%) शेअर्स आहेत. म्हणून पुढच्या 10-12 दिवसांमध्ये कुटुंबच काही महत्त्वाचे निर्णय घेईल."
 
दुःखाच्या या काळातही कुटुंबाने एक निर्णय घेतलेला आहे. कर्नाटकचे माजी मुख्य सचिव आणि कॉफी बोर्डाच्या माजी अध्यक्षांना कुटुंबाने अध्यक्षपदाचा कार्यकाळा तात्पुरता सांभाळायला सांगितला आहे.
 
सरकारी अधिकारी म्हणून रंगनाथ यांची कामगिरी चांगली होती. एके काळी ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सिद्धार्थ यांचे सासरे एस. एम. कृष्णा यांचे सचिवदेखील होते.
 
यासोबतच नितीन बागमाने यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) करण्यात आलं असून एक कार्यकारी समितीही तयार करण्यात आली आहे.
 
कार्यकारी समिती काय करू शकते?
कॉफी उद्योगाविषयी अभ्यास असणाऱ्या एका तज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "समितीचं सगळ्यांत पहिलं काम असायलं हवं एक अशी व्यक्ती शोधणं जिला कॉफी व्यवसायाची चांगली जाण असेल. चांगली गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक माणसं आहेत."
 
कॉफी इंडस्ट्रीमधल्या खरेदी-विक्री शिवाय सीसीडीची ब्रँड इक्विटी आणि रिटेलिंगच्या बाबतीतही ही व्यक्ती तज्ज्ञ असायला हवी.
 
कॉफी उद्योगातले जाणकार सांगतात, "याही पेक्षा गरजेची गोष्ट म्हणजे कुटुंबाला एक असा माणूस शोधायला हवा जो वाईट काळामध्ये धीराने आणि कौशल्याने गोष्टी सांभाळेल. सर्व काही सुरळीत असताना कामकाज करण्याचा अनुभव असलेली व्यक्ती या काळामध्ये फायद्याची ठरणार नाही."
 
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका शेअर मार्केट विश्लेषकाने सांगितलं, "ज्याच्याकडे कंपनीची जबाबदारी येईल त्याच्या निर्णयांवर सीसीडीचं भविष्य अवलंबून असेल. शक्यता अशी आहे की एखाद्या योग्य व्यक्तीची नेमणूक झाल्यानंतर शेअर्सच्या किंमतींमधली घसरण कमी होईल आणि परिस्थिती सुधारेल."
 
शेअर्सच्या किंमती वाढल्याने कंपनीच्या परिस्थितीत सुधारणा होईल, असं या विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं, "जर कंपनी ताबडतोब विकण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला तर आर्थिकदृष्ट्या हे योग्य ठरणार नाही."
 
एकंदरीतच तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जरी कुटुंबाला कंपनी विकायची असली, तरी त्यांनी थोडं थांबायला हवं.
 
एका तज्ज्ञाच्या मते, "जर कंपनी विकायची असेल आणि कर्जही फेडलं नसेल तर हे सर्वांत शेवटचं पाऊल असायला हवं."
 
कोका कोलाला सीसीडी विकत घेण्यात रस असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून बाजारात आहे. पण मार्केट तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की कोका कोलाने ज्या किंमतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि सिद्धार्थ यांना जी किंमत अपेक्षित होती, यामध्ये खूप मोठी तफावत होती.
 
सीसीडी विकायची गरज नाही
मार्केट तज्ज्ञांमध्ये एक गट असाही आहे ज्यांचं म्हणणं आहे की सीसीडी विकण्याची पाळी यावी इतकी वाईट परिस्थिती नाही.
 
कॉफी इंडस्ट्री जवळून पाहिलेल्या एका माजी सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "सीसीडी विकायची गरज आहे असं मला वाटत नाही. सीसीडीच्या अशा अनेक सहयोगी कंपन्या आहेत ज्या विकून परिस्थिती सुधारली जाऊ शकते."
 
कर्जाची परतफेड करण्यासाठी पर्यायी निधीची तजवीज करण्यासाठी सिद्धार्थ कोणत्या प्रकारची खासगी हमी द्यायचे याचा तपासही कार्यकारी समिती करेल.
 
पण सीसीडीकडची सर्वांत मोठी जमेची बाजू म्हणजे कंपनीच्या ब्रँडला असणारी किंमत. ब्रँड तज्ज्ञ हरीश बिजूर यांचं हे म्हणणं आहे.
 
हरीश यांनी बीबीसीला सांगितलं, "एक ब्रँड म्हणून सीसीडी अतिशय मजबूत आहे. लोकांना सीसीडी माहित आहे आणि सीसीडी प्रत्येक ठिकाणी आहे. याचा महसूलाशी संबंध नसला तरी सीसीडी एक मोठा ब्रँड आहे यात शंकाच नाही."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्विटरने ग्लोबल#TweetUps लाँच केला