- रशीद किडवई
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी 2014 च्या तुलनेत चांगली होईल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र त्यांना केवळ 52 जागांवर विजय मिळवता आला.
काही राज्यात काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही अशी परिस्थिती आहे.
या निकालावर चर्चा करण्यासाठी शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित होते.
या पराभवाने राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की काँग्रेसचं भविष्य काय आहे? पक्ष आपल्या पराभवातून वर येणार आहे का? जर त्यांना पुनरागमन करायचं असेल तर त्यांची काय रणनीती असेल?
काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न
काँग्रेससमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
2014 मध्ये हे कळत होतं की 10 वर्षांपर्यंत यूपीएचं सरकार अस्तित्वात होतं. भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि नेतृत्वाचीही समस्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी काँग्रेस पक्ष पाच वर्षं विरोधीपक्षात होता. त्याचा काहीतरी फायदा व्हायला हवा होता.
निवडणुकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी प्रचार केला होता. काँग्रेसने चांगल्या पक्षांशी युती केली होती. ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार आहे तिथे कमीत कमी तीस जागा येतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही झालं नाही.
काँग्रेसच्या नऊ माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला. अमेठी हा तर पक्षाचा बालेकिल्ला होता. तिथेही पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसच्या समोर एक मोठं संकट उभं राहिलं आहे. पुढे काय करावं हे त्यांना समजत नाही.
आव्हानं काय आहेत?
नेहरू-गांधी कुटुंबीयांमधले सर्व सदस्य प्रभावहीन ठरले ही काँग्रेससमोरची सगळ्यांत मोठी समस्या आहे. मात्र त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा अशा स्थितीत सध्या काँग्रेस नाही.
प्रियंका आणि राहुल गांधी दोघंही सक्रिय राजकारण सोडू इच्छित नाही. मोदी सरकारच्या काळात त्यांच्यावर काही आरोप लागले तर त्यांच्या बचाव करण्यासाठी निदान एका राजकीय पक्षाची गरज आहे.
सध्या काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावरून मला असं वाटतं की येणारा काळ काँग्रेससाठी अत्यंत कठीण आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींकडे कोणत्याही प्रकारचा जनाधार नाही. आपल्या स्थानाला धक्का लागू नये यासाठी ते नक्कीच प्रयत्नशील असतील. त्यामुळे राहुल गांधींनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मुळीच इच्छा नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचं आहे आणि त्याचा कोणताच तोडगा सध्या दिसत नाही.
आता राहुल गांधीच जर पक्षाध्यक्षपदी राहणार असतील तर प्रश्न कुणाला आणि किती विचारायचे हा प्रश्न उरतो. उत्तरदायित्वाचा प्रश्न असेल तर त्यात पहिला क्रमांक खुद्द राहुल गांधींचाच आहे.
नेहरू गांधी कुटुंबीयांवरची श्रद्धा हा त्यांच्या यशातला पहिला अडथळा आहे. हीच गोष्ट काँग्रेसच्या बहुतांश लोकांना कळत नाही.
राहुल गांधी या निवडणुकीत चांगलं बोलले. खूप प्रयत्न केले, मात्र जनता त्यांचं ऐकायला तयार नव्हती.
ज्या लोकांना आपण नवोदित मतदार म्हणतो ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधी यांना वैतागले आहेत. त्यांना एक वेगळं कुटुंब हवं आहे.
त्यांच्यामते काँग्रेसने आता एक दुसरा नेता आणायला हवा. हे काँग्रेससाठी एक मोठं आव्हान आहे. काँग्रेस त्यासाठी तयार नाही आणि हीच त्यांच्यासमोर एक मोठी अडचण आहे.
नेहरू गांधी कुटुंबाचा वापर राजकारणासाठी करावा मात्र राजकीय नेतृत्व, महत्त्वाचं पद दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला द्यावं. हे सगळं समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जाऊन करावं. हे ज्या दिवशी होईल त्यादिवशी काँग्रेसमध्ये खरा बदल होईल.
नेहरू-गांधींना सोडावी लागतील महत्त्वाची पदं
मला असं वाटतं की नेहरू गांधी कुटुंबीय सद्सदविवेकबुद्धीचा वापर करतील. राहुल गांधींमुळे काहीही होत नाही हे त्यांना कळतंय. प्रियंका राजकारणात आल्या आहेत आणि त्यामुळे लोक खूश आहेत.
प्रियंकांची शैली राहुलपेक्षा चांगली आहे. त्यांचं संवादकौशल्य उत्तम आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांना पूर्व उत्तर प्रदेशात पाठवलं. तिथे काँग्रेसची अवस्था आधीपासून बिकट होती. त्यामुळे त्यांना तिथे काहीही करिश्मा दाखवता आला नाही.
काँग्रेससमोर तसे अनेक पर्याय आहेत. त्यांच्या कुटुंबाशिवाय जर कुणी अध्यक्ष झालं आणि भलेही त्याला सोनिया, राहुल आणि प्रियंकाचा पाठिंबा असेल तर काँग्रेसवर नेहरू गांधी कुटुंबीयांचाच वारसा असल्याचा आरोप दूर होईल.
ममता बॅनर्जी, शरद पवार, जगनमोहन रेड्डी हे लोक काँग्रेसला सोडून गेले आहेत. त्यांच्याशी योग्य संवाद साधून एक मोठा फ्रंट तयार केला तर काँग्रेसला आणि या पक्षांनाही मोठा फायदा होईल.
मात्र असं करण्यासाठी त्यांना मोठ्या पदांचा त्याग करावा लागेल. मग ते संसदेत असो किंवा संसदेच्या बाहेर. ममता, जगनमोहन रेड्डी यांना मोठी पदं द्यावी लागतील.
त्यांच्याशी संवाद साधणं, एकत्रीकरण करणं हा भाग कठीण आहे. त्यात सोनिया गांधी सक्रिया भूमिका निभावू शकतात. कारण त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत.