काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मुर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियाने पोस्टने बेंगळुरूत वादंग माजवला आहे. रात्रीच्या सुमारास जमावाने मूर्तींच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. जमाव प्रक्षुब्ध झाल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दोनजणांचा मृत्यू झाला. शहराचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे. बेंगळुरूत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सोशल मीडिया पोस्टसंदर्भात 110 लोकांना अटकही करण्यात आली आहे. बीबीसी हिंदीने यासंदर्भात बातमी दिली आहे.
या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. कथित सोशल मीडिया पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्याचं जमावाचं म्हणणं होतं.
पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वीजपुरवठा खंडित झाला. जमावाला काबूत आणण्यासाठी आम्हाला वेळ लागला .पोलिस स्टेशनवर चहूबाजूंनी हल्ला करण्यात आला. त्यामुळे गोळीबार करण्यावाचून पर्यायच उरला नाही असं पाटील यांनी सांगितलं.
श्रीनिवास मूर्ती, गृहमंत्री यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.