राहुल गायकवाड
पुण्यातील चिंचवड भागातील एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एका डॉक्टर पत्नीने घरातील एसीचा वापर करुन कोव्हीड बाधित पतीची ऑक्सिजनची पातळी वाढवल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या लाटेत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
यासोबतच राज्यातल्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
त्यामुळे मग एसी समोर उभं राहिल्यानं खरंच ऑक्सिजन पातळी वाढते का, हे पाहणं आवश्यक आहे.
काय घडलं होतं?
चिंचवडमध्ये राहणाऱ्या सुहास राव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ते होम क्वारंटाईन होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर रात्री अचानक दोन वाजताच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यावेळी त्यांची ऑक्सिजनची पातळी 87 पर्यंत खाली आली होती.
सुहास यांच्या पत्नी दीपिका डॉक्टर आहेत. इतक्या रात्री बेड मिळणं शक्य नसल्याने त्यांनी सुहास यांना घरातील ACच्या ब्लोअर जवळ जाऊन थांबण्यास सांगितलं. हा प्रयोग केल्यानंतर काही मिनिटांनी सुहास यांची ऑक्सिजन लेव्हल 92 वर स्थिरावल्याचा दावा व्हीडीओमध्ये करण्यात आला आहे.
या माध्यमातून दीपिका यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरने दिल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीचा एसीद्वारे वापर केला आणि त्या पतीची ऑक्सिजन लेव्हल सुधारण्यात यशस्वी ठरल्या, असा देखील दावा करण्यात आला.
AC समोर उभं राहिल्याने ऑक्सिजन पातळी वाढते का?
या व्हायरल व्हिडीओच्या अनुषंगाने आम्ही याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांची मते आम्ही जाणून घेतली.
या दाव्याला शास्त्रीय आधार नाही, असं मत पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. धनंजय केळकर मांडतात.
ते सांगतात, "शास्त्रीयदृष्ट्या हा दावा योग्य वाटत नाही. एसीमधून ऑक्सिजन वाढत नाही, केवळ गारवा येऊ शकतो. घरातल्या एसीमध्ये ऑक्सिजन मिक्सची सोय नसते. अशी सोय उंचावरील हॉटेल्समध्ये असू शकते. या दाव्याला कुठलाही शास्त्रीय आधार नसल्याने नागरिकांनी हा उपाय घरी करुन पाहणे योग्य नाही."
पुण्यातील कोव्हिड रुग्णालय असलेल्या नायडू रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता चंदनशिव या दाव्याबाबत सांगतात, ''याचे प्रात्याक्षिक केल्याशिवाय यावर ठोस काही बोलता येणार नाही. परंतु एसीच्या हवेमुळे कोव्हिड रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल वाढू शकते अशी शक्यता फार कमी वाटते. असं कुठलंही संशोधन अद्याप झालेलं नाही. त्यामुळे यावर ठोसपणे भाष्य करणं योग्य होणार नाही.''
अधिक संशोधनाची गरज
ACमुळे ऑक्सिजनची पातळी वाढते का, हे पाहण्यासाठी हजारो लोकांवर संशोधन करावं लागेल, असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे व्यक्त करतात.
त्यांच्या मते, ''एसीच्या ब्लोअरमधून मोठ्या प्रमाणात वारा येतो आणि त्यामुळे ऑक्सिजन वाढू शकतो. पण, ही ऑक्सिजन घेण्याची शास्त्रीय पद्धत नाही. याच्यामुळे ऑक्सिजन वाढला तरी काही काळ वाढेल. यावर कोणत्याही प्रकारचे संशोधन नाही. या रुग्णाचे वाढले असा दावा केला जातोय पण हजारो लोकांवर प्रयोग केल्यानंतरच हा दावा सिद्ध करता येऊ शकतो.''
ते पुढे सांगतात, ''वाऱ्याचा झोत सतत घेतल्याने ऑक्सिजन काहीकाळ वाढू शकतो. पण. तो फार काळ टिकू शकणार नाही. एका व्यक्तीला याचा उपयोग झाला म्हणजेच हा उपाय सर्वांनाच लागू होईल असे नाही. केवळ एसीनेच वाढतो की इतर यंत्रांनी वाढू शकतो याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. पण, हा उपाय ऑक्सिजनला पर्याय होऊ शकत नाही हे निश्चित.''