- मिशेल रॉबर्ट्स
कोरोना व्हायरसचे नवीन स्वरूप ज्याला अनेकांनी 'डेल्टा प्लस' असं संबोधलं आहे, ते कोरोनाच्या नियमित डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक सहजपणे पसरू शकते, असं युकेमधील तज्ञांनी म्हटलं आहे.
यूके हेल्थ सेक्युरिटी एजन्सीनं (UKHSA) या व्हेरियंटला 'चौकशी सुरू असलेल्या व्हेरियंट'च्या श्रेणीमध्ये टाकलं आहे. या व्हेरियंटपासून किती धोका निर्माण होऊ शकतो, याचा अंदाज यातून लागणार आहे.
पण, या व्हेरियंटमुळे अतिगंभीर असा आजार होतो, याविषयीचे काही पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.
तसंच सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोनावरच्या लशी या लोकांचं रक्षण करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
असं असलं तरी यूकेमध्ये डेल्टा व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत आणि डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोव्हिडच्या रुग्णसंख्येतील 6 टक्के प्रकरणं, यापद्धतीची असल्याचं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून समोर आलं आहे.
दरम्यान, भारतात सध्या AY4.2 म्युटेशनचे अत्यंत कमी संख्येत रूग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारची इन्स्टिट्यूट ऑफ जिनोम्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॅाजी (IGIB) कोरोना व्हायरसचं जिनोमिक सिक्वेसिंग करते. IGIB चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल बीबीसीशी बोलताना म्हणाले, "AY.4.2 व्हेरियंट भारतात अत्यंत कमी प्रमाणात आढळून आला आहे." कोरोना व्हायरसचं हे म्युटेशन झपाट्याने पसरत असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत डॉ. अग्रवाल पुढे सांगतात, "यूकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार इतर डेल्टा व्हेरियंटपेक्षा हा गंभीर आहे का याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये." भारतात या म्युटेशनचे 0.1 टक्क्यापेक्षा कमी रूग्ण आढळून आलेत. "या म्युटेशनवर लक्ष ठेवण्यात येतंय आणि याबाबत अधिक तपास सुरू आहे," असं डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं आहे.
यूकेमध्ये काय आहे परिस्थिती?
या नव्या व्हेरियंटमुळे संसर्गाची नवी लाट येण्याची किंवा सध्या उपलब्ध लशी या व्हेरियंटला लागू न होण्याची शक्यता दिसत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण अधिकाऱ्यांच्या मते डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत या नव्या डेल्टा प्लसमुळे युकेमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढल्यांचं सध्याच्या निरीक्षणांवरून दिसतंय.
"अलीकडच्या काही महिन्यांत यूकेमध्ये हा डेल्टाचा उप-प्रकार मोठ्या प्रमाणात सामान्य झाला आहे आणि यूकेमध्ये डेल्टाच्या तुलनेत याच्या वाढीचा दर अधिक असल्याचे काही पुरावे आहेत," UKHSA नं म्हटलं आहे.
असं असलं तरी डेल्टाप्रमाणे डेल्टा प्लस व्हेरियंटला अद्याप व्हेरियंट ऑफ कंसर्न (काळजी करण्यासारखा कोरोनाचा प्रकार) असं समजलं जात नाहीये.
जगभरात कोव्हिडचे हजारो प्रकार किंवा रुपे आहेत. कोरोनाचा विषाणू नेहमीच म्यूटेट (बदल) होत राहतो, त्यामुळे एखादं नवं रुप जन्मास येत असेल तर त्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाहीये.
'डेल्टा प्लस' व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाईक प्रोटीनमध्ये झालेलं K417N म्युटेशनदेखील आढळून आलंय
कोरोना साथीच्या सुरुवातीपासूनच व्हायरसच्या अनेक प्रजातींमध्ये Y145H आणि A222V हे म्यूटेशन्स आढळले आहेत.
अमेरिकेतही डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळले आहेत, तर डेन्मार्कमध्ये काही रुग्ण याआधी आढळले होते. पण, नंतरच्या कालावधीत डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण तिथं कमी होत गेले.
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर यूकेमध्ये हाय रिस्क झोनमध्ये असलेल्या लोकांना बुस्टर डोस दिले जात आहेत. यामाध्यमातून ही माणसं कोरोनापासून पूर्णत: सुरक्षित राहतील, याची खात्री केली जात आहे.
कोरोना साथीच्या विषाणूच्या कोणत्याही प्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीच्या नवीन प्रकाराची गरज असेल, असं कोणताही सूचना अद्याप आलेली नाही.
UKHSA चे मुख्य कार्यकारी डॉ जेनी हॅरी सांगतात, "सार्वजनिक आरोग्यासंबंधीचा सल्ला हा कोरोनाच्या सगळ्या प्रकारांसाठी एकसारखाच आहे. लसीकरण करा आणि जी माणसं किंवा बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्यांना फोन आल्याआल्या पुढे यावं.
"सावधगिरी बाळगणे सुरू ठेवा. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. घराच्या आत लोकांना भेटताना खोली हवेशीर ठेवण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. तुम्हाला कोरोनाची लक्षणं असतील तर आरटीपीसीआर चाचणी करून घ्या आणि निगेटिव्ह रिझल्ट येईपर्यंत घरीच विलगीकरणात राहा."