Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाः वुहान लॅब कुठे आहे? 'लॅब लिक थिअरी'वर एवढी चर्चा का?

कोरोनाः वुहान लॅब कुठे आहे? 'लॅब लिक थिअरी'वर एवढी चर्चा का?
, शनिवार, 29 मे 2021 (18:26 IST)
चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरस पहिल्यांदा आढळून आला होता. या गोष्टीला आता दीड वर्ष उलटून गेलं आहेत.पण अजूनही हा विषाणू नेमका कसा बाहेर पडला, कशामुळे तो मानवी आयुष्यात दाखल झाला, हे मोठं कोडं बनलेलं आहे.
 
कोरोना व्हायरस चीनच्या एका प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा दावा सुरुवातीला करण्यात येत होता. पण अनेकांनी ही फक्त एक थिअरी असल्याचं सांगत त्यात काहीएक तथ्य नसल्याचं म्हटलं.
 
मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचं मूळ वुहानच्या प्रयोगशाळेतच आहे, या वादग्रस्त दाव्याला बळ मिळू लागलं.
 
याचं कारण म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतेच दिलेले आदेश.
 
बायडन यांनी कोरोना व्हायरस नेमका कुठून निर्माण झाला, याचा तपास करण्यासाठी आदेश दिले आहेत. हा विषाणून वुहानच्या प्रयोगशाळेत निर्माण झाला किंवा इतर ठिकाणी याबाबत तपास केला जाणार आहेत. शिवाय, सदर तपास 90 दिवसांत करून तातडीने अहवाल पाठवण्याची सूचनाही बायडन यांनी केली आहे.
पण कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबद्दल कोणत्या थिअरी मांडल्या जातात. या विषयावर केला जाणारा वादविवाद सर्वांसाठी महत्त्वाचा का आहे?
 
वुहान लॅब-लीक थिअरी काय?
चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहानमधील एका प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस अपघाताने बाहेर पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो.
वुहानमध्ये चीनचं एक मोठं जैविक संशोधन केंद्र आहे. योगायोग म्हणजे वुहानमधूनच पहिल्यांदा कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती.
 
वुहानमधील वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी नामक संस्थेत वटवाघळांमधील कोरोना व्हायरसच्या अस्तित्वाबाबत अनेक दशकांपासून संशोधन सुरू आहे.
 
वुहान प्रयोगशाळेपासून हुआनन वेट मार्केट नामक एक पशू बाजार काही अंतरावरच आहे. या मार्केटच्या परिसरातच कोरोना संसर्गाचा पहिला क्लस्टर आढळून आला होता.
 
कोरोना व्हायरस प्रयोगशाळेतून लीक झाल्याच्या थिअरीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या मते, कोरोना व्हायरस प्रयोगशाळेतून लीक झाल्यानंतर या वेट मार्केटमध्ये पसरला असण्याची शक्यता आहे.
 
हा विषाणू वटवाघळातूनच मिळवण्यात आला होता. त्यामध्ये कोणताच बदल करण्यात आला नाही, असा दावाही काहीजण करताना दिसतात.
 
कोरोना व्हायरसची साथ सुरुवातीच्या टप्प्यात असतानापासूनच ही थिअरी मांडली जात होती. विशेष म्हणजे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीसुद्धा या थिअरीचं समर्थन केलं होतं.
 
अनेकांच्या मते, एक जैविक शस्त्र म्हणून वापरण्याकरिताच कोरोना व्हायरसमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले होते.
 
त्यावेळी मीडिया आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांनी हे षडयंत्र असल्याचं स्पष्टपणे नाकारलं होतं. मात्र या संशयाच्या खोलात जाणं गरजेचं असल्याचंही अनेकांनी म्हटलं होतं. आता पुन्हा तीच चर्चा जगभरात सुरू झाली आहे.
 
लॅब-लीक थिअरीने पुन्हा डोकं वर का काढलं?
कोरोना व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून लीक झाला, ही थिअरी पुन्हा एकदा जोर देऊन सांगितली जाण्याचं कारण काय?
 
या प्रश्नाचं उत्तर अमेरिकन माध्यमांमधील बातम्यांमध्ये असल्याचं दिसून येतं.
गेल्या आठवड्यात अमेरिकन माध्यमांमध्ये याविषयी अनेक बातम्या छापून आल्या. त्यामुळेच हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
 
सुरुवातीच्या टप्प्यात लॅब-लीक थिअरी नाकारणारे शास्त्रज्ञही आता या थिअरीबाबत बोलू लागले आहेत, हे विशेष.
अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या एका गुप्त अहवालात याबाबत माहिती देण्यात आली होती. 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात वुहानच्या एका प्रयोगशाळेत कार्यरत असलेल्या तीन संशोधकांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
 
शहरातील नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार व्हायला सुरु होण्यापूर्वीची ही घटना आहे. गेल्या आठवड्यात हीच बातमी अमेरिकन माध्यमांमधील चर्चेत होती.
या बातम्यांनुसार, डोनाल्ड ट्रंप यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका विभागाने लॅब-लिक थिअरीच्या शक्यतांची पडताळणी सुरू केली होती. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हा तपास बंद केला होता.
 
ट्रंप यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फाऊची यांनी 11 मे रोजी अमेरिकेच्या सिनेटसमोर म्हटलं, "व्हायरस प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा संशय आहे. याचा तपास व्हायला हवा, या मताचा मी आहे."
 
राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच कोव्हिड-19 चा प्रसार पहिल्यांदा कुठून झाला, याबाबत अहवाल मागितला होता.
 
हा विषाणू मानवी संसर्गाद्वारे बाहेर पडला की संक्रमित प्राण्यांमार्फत याचा प्रसार झाला, किंवा एखाद्या प्रयोगशाळेतून अपघाताने याचा प्रसार झाला या सर्व गोष्टींचा तपास व्हायला हवा, हे त्यांनी सांगितलं होतं.
 
मंगळवारी ट्रंप यांनी न्यूयॉर्क पोस्टला एक ई-मेल पाठवून कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचा नव्याने तपास करण्याच्या संदर्भात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
 
"मी याबाबत आधीपासूनच स्पष्ट केलं होतं की विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाला आहे. पण नेहमीप्रमाणे माझ्यावर चुकीच्या पद्धतीने टीका-टीप्पणी झाली. आता ट्रंप योग्य होते, हे लोकांना कळलं आहे," असं ट्रंप यांनी पत्रात लिहिलं आहे.
 
शास्त्रज्ञांचं मत काय?
शास्त्रज्ञांमध्ये याविषयी मतमतांतरं आहेत. जागतिक आरोग्य संघटनेलाही (WHO) या गोष्टीचा तपास करायचा होता. पण हा तपास उत्तरापेक्षाही जास्त प्रश्नांना तोंड फोडतो, असं शास्त्रज्ञांना वाटतं.
 
कोरोना व्हायरस वुहानमधूनच पसरला किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत शास्त्रज्ञांचं एक पथक या वर्षाच्या सुरुवातीला वुहानमध्ये दाखल झालं होतं.
 
हे पथक वुहानमध्ये 12 दिवस होतं. त्यांनी वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचा दौराही केला. यावेळी कोरोना व्हायरस प्रयोगशाळेतून पसरल्याची शक्यता खूपच कमी आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं.
 
आता या पथकाच्या संशोधनावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. WHO ने लॅब-लीक थिअरीचा गांभीर्याने विचार केला नाही, असं म्हणत शास्त्रज्ञांच्या एका प्रमुख संघटनेने त्यांच्या अहवालावर टीका केली होती.
 
WHO च्या शेकडो पानी अहवालात फक्त सुरुवातीच्या काही पानांमध्येच ही थिअरी फेटाळून लावण्यात आली आहे.
 
या अहवालावर टीका करणाऱ्या शास्त्रज्ञांनी एका विज्ञान मासिकात लिहिलं, "योग्य माहिती मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला दोन्ही शक्यता गांभीर्याने पडताळून पाहिल्या पाहिजेत. हा व्हायरस प्रयोगशाळा आणि नैसर्गिकपणे असा दोन्ही प्रकारे पसरू शकतो.
 
दरम्यान, विषाणू प्रयोगशाळेतून लीक होण्याचा विषयही गांभीर्याने घ्यावा, याबाबत तज्ज्ञांचं एकमत होऊ लागलं आहे.
 
इतकंच नव्हे तर WHO चे प्रमुख डॉ. टेड्रोस एडहॉनम गिब्रयेसुस यांनीही याचा नव्याने तपास करण्याला सहमती दर्शवली आहे. सर्व शक्यता खुल्या आहेत. याचा अभ्यास व्हायला हवा, असं ते म्हणाले.
 
डॉ. फाऊची यांनाही हा व्हायरस नैसर्गिकपणे पसरला असेल, यावर विश्वास नाही.
 
एका वर्षापूर्वी त्यांचा दृष्टीकोन असा नव्हता. त्यावेळी हा व्हायरस प्राण्यांमधून मानवात संक्रमित झाला, असंच त्यांचंही मत होतं.
 
चीनचं काय म्हणणं?
कोरोना व्हायरस प्रयोगशाळेतून पसरल्याच्या वक्तव्यांना चीनने प्रत्युत्तर दिलं आहे.
 
ही आम्हाला बदनाम करण्याची मोहीम आहे हा व्हायरस इतर देशांमधून आलेल्या अन्नपदार्थांच्या माध्यमातून चीनमध्ये पसरला आहे, असं आम्हाला वाटतं, अशी प्रतिक्रिया चीनने दिली.
चीनने यासंदर्भात तेथील दुर्गम भागातील वटवाघळांच्या नमुन्यांवर संशोधनही केलं. चीनच्या प्रमुख विषाणू तज्ज्ञांचाही या संशोधनात सहभाग होता, असं त्यांनी सांगितलं.
 
चीनमध्ये वेटवुमन नावाने सुप्रसिद्ध असलेल्या विषाणू तज्ज्ञ शी जेंग्ली यांनी गेल्या आठवड्यात याबाबत एक संशोधन अहवाल प्रकाशित केला होता.
 
त्यानुसार, त्यांच्या पथकाने 2015 मध्ये चीनच्या एका खाणीत अस्तित्वात असलेल्या वटवाघळांमध्ये कोरोना व्हायरसच्या आठ प्रजातींची ओळख पटवली होती.
 
या प्रजातींपेक्षाही पँगोलिनमध्ये (खवल्या मांजर) आढळून येणारा कोरोना व्हायरस मानवासाठी जास्त धोकादायक असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं.
 
अमेरिका तसंच इतर पाश्चिमात्य देशांमधील माध्यमं याविषयी विविध प्रकारच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप चीनच्या सरकारी माध्यमांनी लावला आहे.
 
ग्लोबल टाईम्स या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या एका संपादकीय लेखानुसार, कोरोनाच्या स्त्रोताच्या मुद्द्यावरून अमेरिका झपाटली जाते, असं चीनच्या सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे.
 
याशिवाय चीन आता दुसऱ्या एका थिअरीवरही भर देताना दिसत आहे. या नव्या थिअरीनुसार, कोरोना व्हायरस चीनच्याच इतर भागातून किंवा दक्षिण-पूर्वेतील आशियाई देशातून फ्रोजन मीटच्या माध्यमातून वुहानमध्ये दाखल झालं आहे.
 
कोरोना व्हायरसशी संबंधित आणखी एक थिअरी?
कोरोना व्हायरसच्या संदर्भात आणखी एक थिअरीही सांगितली जाते. त्याला नॅच्युरल ओरिजिन थिअरी असं संबोधलं जात आहे.
यानुसार, हा व्हायरस नैसर्गिकपणे प्राण्यांमधूनच पसरतो. यामध्ये कोणत्याही शास्त्रज्ञाचा किंवा प्रयोगशाळेचा सहभाग नसतो.
 
नॅच्युरल ओरिजिन थिअरीनुसार, कोरोना व्हायरस सुरुवातीला वटवाघळांमध्ये वाढला. नंतर त्याचा संसर्ग मानवामध्येही झाला.
 
WHO नेही या थिअरीचं समर्थन केलं आहे. असं होण्याची खूपच जास्त शक्यता असल्याचं त्यांनी त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.याला त्यांना इंटरमिडियरी होस्ट थिअरी असं नाव दिलं होतं.
कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या शक्यतेला सर्वांकडून मान्यता मिळाली होती. पण त्यानंतर इतका वेळ जाऊनसुद्धा शास्त्रज्ञांना वटवाघुळ किंवा इतर कोणत्याही प्राण्यात अशा प्रकारचा व्हायरस आढळून आला नाही.
 
शास्त्रज्ञांच्या मते, त्यांना आढळून आलेल्या कोणत्याच व्हायरसची बनावट कोरोनाशी मिळतीजुळती नव्हती. त्यामुळेच इंटरमिडियरी होस्ट थिअरीवर संशय व्यक्त केला जात आहे.
 
संसर्गाचा स्त्रोत कळणं इतकं महत्त्वाचं का?
कोव्हिड-19 साथीने जगभरात थैमान घातलं आहे. यामुळे आतापर्यंत 35 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
 
हे पुन्हा होऊ नये, यासाठी हा व्हायरस नेमका कुठून आणि कसा आला, याची माहिती मिळणं महत्त्वाचं आहे, असं शास्त्रज्ञांना वाटतं.
 
व्हायरस प्राण्यांमधून मानवात दाखल झाला असं सांगणारी झूनॉटीक थिअरी खरी सिद्ध झाल्यास याचा शेती आणि वन्यजीव संबंधित क्षेत्रांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
 
याचा परिणाम काही प्रमाणात दिसूही लागला आहे.
 
डेन्मार्कमध्ये मिंक फार्मिंगमुळे व्हायरस पसरण्याची भीती असल्याने लाखो मिंक मारले जात आहेत.
 
मात्र, फ्रोजन फूड किंवा प्रयोगशाळेतून व्हायरस बाहेर पडल्याची थिअरी बरोबर असल्याचं सिद्ध झालं तर याचा शास्त्रीय संशोधन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रावर अत्यंत ठळक परिणाम दिसू शकतो.
ही गोष्ट सिद्ध झाल्यास चीनबाबतच्या जगाच्या दृष्टिकोनावर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो.
 
सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना व्हारयसशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती लपवल्याचे आरोप चीनवर आधीपासूनच केले जातात. या आरोपांमुळेच चीन आणि अमेरिकेमधील संबंध जास्त तणावपूर्ण बनले आहेत.
 
चीन आधीपासूनच यासंबंधित माहिती लपवण्याच्या प्रयत्नात होता, असं वॉशिंग्टन येथील अटलांटिक काऊंसिल या थिंक टँकचे फेलो जेमी मेट्जल यांना वाटतं.
 
जेमी मेट्जल सुरुवातीपासूनच लॅब-लीक थिअरीच्या तपासाची मागणी करत आहेत. त्यांच्या मते, लॅब लीकशी संबंधित पुरावे वाढत आहेत. याच्या शक्यतेचा आधार घेऊन आपण संपूर्ण तपासाची मागणी करू शकतो. मात्र इतर तज्ज्ञांच्या मते, चीनकडे बोट दाखवण्याची घाई-गडबड आताच करू नये.
 
सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्रा. डेल फिशर यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "आपण याबाबत थोडा धीर धरला पाहिजे. तसंच या विषयावर डिप्लोमॅटिकही व्हावं लागेल. चीनच्या मदतीशिवाय आपण तपास करू शकत नाही.
 
विषाणूचा संसर्ग कुठून व कसा झाला, याची माहिती मिळवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. मात्र तपास होईपर्यंत आपण त्या पद्धतीचं वातावरण तयार केलं पाहिजे. यामध्ये एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप आपण टाळू शकतो."

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल परब : 'माझ्यावरील आरोप सूडबुद्धीने आणि राजकीय हेतूने प्रेरित'