"मी अशी भयाण परिस्थिती या आधी कधीही पाहिली नाही. मला विश्वास बसत नाहीये की आम्ही भारताच्या राजधानीत आहोत," हे वाक्य होतं जयंत मल्होत्रा यांचं.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "लोकांना ऑक्सिजन मिळत नाहीये आणि ते जनावरांसारखे मरताहेत."
जयंत मल्होत्रा दिल्लीच्या एका स्मशानभूमीत लोकांचे अत्यंसंस्कार करण्यासाठी मदत करत आहेत. दिल्लीच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे आहे आणि कोरोनाशी झुंज रोजचीच आहे.
सोमवारी भारतात सलग पाचव्या दिवशी कोरोनाच्या 3 लाखांपेक्षा केसेस सापडल्या आहेत. आजमितीला जगात सगळ्यात जास्त कोरोना संसर्गाची प्रकरणं भारतात सापडत आहेत.
अर्थात मंगळवारी, 27 एप्रिलला कोरोना संक्रमितांची संख्या जवळपास 30 हजाराने कमी झाली.
गेल्या दोन आठवड्यांपासून भारतात कोरोना रूग्णांच्या संख्येत अनपेक्षित अशी वाढ झाली आहे. याच काळात चीन, अमेरिका, यूरोप आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
अनेक देश लॉकडाऊन उठवत आहेत. यूरोपिनय यूनियनने ज्यांनी लस घेतली आहे अशा अमेरिकेतून येणाऱ्या लोकांना परवानगी देण्याचे संकेतही दिले आहेत.
पण भारतात बिघडणारी परिस्थिती जगासाठी संकट बनू शकते का?
भारतातलं कोरोना संकट किती मोठं?
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात रोज कोरोना संक्रमित होणाऱ्या लोकांची संख्या जवळपास 12 हजार झाली होती आणि मरणाऱ्यांची संख्या काही शे होती, तेव्हा वाटलं की भारतातला कोरोना संसर्गाचा सगळ्यात अवघड काळ येऊन गेला आहे.
पण एप्रिल 17 नंतर भारतात रोज दोन लाखाहून अधिक लोकांना संसर्ग होतंय असं समोर आलं. त्या तुलनेत जेव्हा भारतात गेल्या सप्टेंबर महिन्यात कोरोना व्हायरसचा संसर्गाने उच्चांक गाठला तेव्हा भारतात रोज 93 हजार केसेस समोर येत होत्या.
सध्याच्या काळात कोरोना संसर्गाने मरणाऱ्या लोकांची संख्याही वाढलीये. 25 एप्रिल 2021 पर्यंत मरणाऱ्यांची संख्या सरासरी 2336 झाली होती. ही संख्या गेल्यावर्षी मरणाऱ्याच्या तुलनेत दुप्पट आहे.
बीबीसीचे आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी जेम्स गॅलाघर यांच्यानुसार भारताला संघर्ष करावा लागतोय. ते म्हणतात की, "समोर जी भीती दिसतेय त्यामुळे मला कोरोनाच्या सुरुवातीचा काळ आठवतोय जेव्हा या साथीची सुरुवात झाली होती आणि लोकांना याविषयी फारशी काही माहिती नव्हती."
ते पुढे म्हणतात की, "पूर्ण वैद्यकीय काळजी घेऊनही कोरोना जीवघेणा ठरू शकतो. पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जागा नसते तेव्हा त्या लोकांचा जीव जातो ज्यांचा जीव कदाचित वाचवता आला असता."
दिल्लीत परिस्थिती वाईट आहे आणि इथे एकही आयसीयू बेड रिकामा नाहीये. अनेक हॉस्पिटल्स नव्या रूग्णांना अॅडमिट करून घ्यायला नाही म्हणत आहेत आणि दिल्लीतल्या कमीत कमी दोन हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन सप्लाय थांबल्यामुळे रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांचे नातेवाईक सोशल मीडियावर बेड, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटर मिळावा म्हणून मदतीची याचना करत आहेत.
कोरोना टेस्ट करणाऱ्या लॅब्सची अवस्थाही अत्यंत वाईट आहे कारण टेस्ट करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे टेस्टचे रिझल्ट यायलाही 3-4 दिवसांचा वेळ लागतोय.
स्मशानभुमीतही शव सतत येतच आहेत आणि तिथे 24 तास अंत्यसंस्कार होत आहेत.
दिल्लीव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. आतापर्यंत भारतात अधिकृतरित्या कोरोना संक्रमित लोकांचा आकडा 1 कोटी 70 लाख आहे आणि मरणाऱ्यांची संख्या 1 लाख 92 हजार झाली आहे.
पण असा संशय व्यक्त केला जातोय की हे आकडे खरे नाहीयेत आणि मरणाऱ्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
भारताची लोकसंख्याच इतकी जास्त आहे आणि साधनांची इतकी वानवा आहे की सगळ्या कोरोना रूग्णांची टेस्ट करणं आणि मरणाऱ्यांची खरी नोंद ठेवणं अवघड आहे. यामुळेच यूरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतातल्या कोरोना समस्येचा खराखुरा आवाका समजणं मुश्कील आहे.
परिस्थिती अजून चिघळणार का?
जेम्स गॅलघर म्हणतात की, "येत्या काही आठवड्यात परिस्थिती आणखी चिघळेल. हे खूप वाईट आहे. पण एक धडा आपण वारंवार शिकलोय तो म्हणजे संक्रमित लोकांची संख्या वाढली की काही आठवड्यांनी मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्याही वाढेल."
ते म्हणतात, "जरी भारताने व्हायरसचा प्रसार थांबवला तरी मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत राहील. कारण आधीच लोक मोठ्या प्रमाणावर संक्रमित झालेत आहेत. सध्यातरी संक्रमित लोकांची संख्या कमी होण्याची काही चिन्हं दिसत नाहीयेत. आता संक्रमित लोकांची संख्या किती वाढणार हे लसीकरण आणि लॉकडाऊन किती यशस्वी ठरतात यावर ठरेल."
हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतात अजून कोरोना संसर्गाचा उच्चांक आलेला नाही, ना मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा.
जॉन हॉपकिन्स विद्यापाठीनुसार 26 एप्रिल 2021 पर्यंत अमेरिकेत 3 कोटी 20 लाख लोक संक्रमित झाले होते तर 5 लाख 72 हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
दर 10 लाख लोकांमागे मरणाऱ्या लोकांची सरासरी काढली तर भारत अजूनही यूरोप आणि लॅटिन अमेरिकेतल्या अनेक देशांच्या तुलनेत मागे आहे.
पण भारताची लोकसंख्या जास्त आहे आणि गेल्या काही दिवसात संक्रमित लोक आणि कोरोनामुळे मरणाऱ्या लोकांच्या संख्येत इतकी वाढ झाली आहे की त्यामुळे सगळ्या जगाला चिंता वाटतेय.
संसर्गजन्य रोगांचे विश्लेषक प्रोफेसर गौतम मेनन यांनी बीबीसीला सांगितलं की, "आरोग्यव्यवस्थेत इतके रूग्ण अचानक यावेत की व्यवस्थेचा सगळा डोलारा कोसळावा अशी परिस्थिती याआधी आम्ही कधीही पाहिलेली नाही."
जर आरोग्य व्यवस्थाच धराशायी झाली असेल तर अनेक कारणांमुळे लोक मरायला लागतात. यांच्या मृत्यूचा समावेश कोरोनामुळे मरणाऱ्या लोकांच्या यादीत होत नाही.
याशिवाय भारतात आरोग्यव्यवस्थेसमोर इतक्या मोठ्या लोकसंख्येला आरोग्यसेवा पुरवण्याचं आव्हान असतं. देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्यसेवा उपलब्ध नाहीये.
जगावर याचे काय परिणाम होतील?
कोरोना एक जागतिक संकट आहे.
अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून वैज्ञानिक आणि आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं आहे की विमान प्रवास आणि जागतिक अर्थव्यवस्थेमुळे हा विषाणू एका देशातून दुसऱ्या देशात पसरतोय.
देशांच्या सीमा या विषाणूला थांबवू शकल्या नाहीत. जगभरातल्या प्रवासावर बंदी आणणं किंवा सीमा अनिश्चित काळासाठी कायमच्या बंद करणं अशक्य नसलं तरी व्यवहार्य नाहीये.
त्यामुळे साहजिकच भारतात जे होतंय ते जगभरात पसरणार, विशेषतः भारतीय वंशाचे लोक जगभरात सर्वत्र पसरलेले असताना. जेम्स गॅलघर म्हणतात, "या साथीने आपल्याला शिकवलं की एका देशाचा प्रश्न सगळ्या देशांचा प्रश्न आहे. कोरोना व्हायरस सगळ्यांत आधी चीनचं एक शहर वुहानमध्ये सापडला होता. पण आता हा विषाणू जगभरात पसरला आहे. भारतात कोरोना संक्रमणाचे उच्चांक नोंदवले जात आहे म्हणजे इथून दुसऱ्या देशातही संक्रमण पसरू शकतं. म्हणूनच अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. जर संक्रमित लोकांची संख्या वाढली तर विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटला पसरायला मदत मिळते."
भारतात जन्मलेला नवा धोका
भारतात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याचे परिणाम जगभरात कोरोनाच्या विरोधात चालू असलेल्या लढाईवर होऊ शकतात. केंब्रिज विद्यापीठात क्लिनिकल बायोलॉजीचे प्राध्यपक असणाऱ्या रवि गुप्ता यांचं म्हणणं आहे की, "भारताची लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता यामुळे हा व्हायरस म्युटेट होण्यासाठी ही सगळ्यात चांगली जागा आहे. जर या व्हायरसला म्युटेट करण्याची संधी मिळाली तर कोरोना व्हायरसची क्षमता जगभरात वाढेल."
जेम्स म्हणतात, "व्हायरसला म्युटेट होण्याची जितकी संधी मिळेल तितक्याच जास्त लोकांना तो संक्रमित करेल. अगदी त्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो ज्यांनी लस घेतली आहे."
यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतल्या नव्या व्हेरिएंट्सनी आधीच जगभरात पसरून मोठा प्रश्न उभा केला आहे. आता प्रा मेनन भारतातल्या नव्या व्हेरिएंटबदद्ल इशारा देताना म्हणतात की, "काही विषाणू प्रोटीनशी संबंधित असतात. यामुळे त्या विषाणुंना पेशींना धरून ठेवण्याची संधी मिळते. मग ते शरीरातल्या अँटीबॉडीही कमजोर करू शकतात."
"विषाणुच्या व्हेरिएंट्सला रोखणं अशक्य आहे. कोरोना व्हायरसचा B.1.617 व्हेरिएंट सगळ्यात आधी भारतात सापडला होता पण तो आहे जगातल्या अनेक देशांमध्ये दिसून येतोय. याचं एक कारण हेही असू शकतं की तो भारतातून तिथे गेला आहे."
प्रा मेनन इशारा देताना म्हणतात की, "व्हायरस म्युटेट होत राहाणार आणि ते रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्यासाठी रस्तेही शोधत राहाणार. याचाच अर्थ जे लोक आधी संक्रमित झालेत किंवा ज्यांनी आधी लस घेतली आहे त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकेल."
मग प्रश्न असा आहे की हे व्हायरस किती लवकर स्वतःला म्युटेट करू शकतील?
प्रा मेनन म्हणतात की, "जगभरातल्या वेगवेगळ्या व्हेरिएंटसचा अभ्यास करून आपल्याला कळलं आहे की SARS-CoV-2 हा विषाणू म्युटेट करू शकतो. म्युटेट झालेला विषाणू आणखी वेगाने पसरतो. अजून तरी आपण असं समजतोय की लस या नव्या व्हेरिएंट्सवर परिणामकारक आहे, पण भविष्यात कदाचित परिस्थिती वेगळी असेल."
भारत (आणि जगही) या विषाणूचा प्रादुर्भाव कसा थांबवू शकतो?
भारतातला ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून मदत घेतली जातेय.
यूकेने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसेन्ट्रेटर्स पाठवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने लस बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरचे निर्बंध उठवले आहेत. यामुळे कोव्हिशिल्ड लस बनवायला मदत मिळेल. इतर अनेक देश भारताला मेडिकल स्टाफ आणि इतर उपकरणं पाठवत आहेत.
भारत सरकारने देशात 500 नवे ऑक्सिजन जनरेशन प्लँट लावायला परवानगी दिली आहे.
पण यामुळे कोरोना व्हायरसमुळे होणारे मृत्यू थांबवता येतील, कोरोनाचा संसर्ग नाही.
भारताने आपली लसीकरणाची क्षमता वाढवावी म्हणजे या विषाणुचा फैलाव जगभरात होणार नाही ही खरी आजची गरज आहे.
जेव्हा या साथीची सुरुवात झाली होती तेव्हा भारताला या साथीला नियंत्रित करण्यात यश येईल अशी आशा होती कारण जगातल्या सर्वाधिक लशी भारतात बनतात.
भारतात लशीकरणाचे मोठे उपक्रम चालतात. जगातल्या 60 टक्के लशी भारतात बनतात. जगातल्या सगळ्यांत मोठ्या औषध निर्मात्यांपैकी, ज्यात सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचाही समावेश होतो, जवळपास 6 मोठ्या कंपन्यांची मुख्यालयं भारतात आहेत.
लसीकरणात अनपेक्षित अशी आव्हानं
भारतात कोरोना व्हायरसच्या विरोधात जगातलं सगळ्यांत मोठ लसीकरण 16 जानेवारीत सुरू झालं. जुलैपर्यंत जवळपास 25 कोटी लोकांना लस देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं.
आतापर्यंत फक्त 11 कोटी 80 लाख लोकांनाच लशीचा पहिला डोस मिळू शकला आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ही संख्या 9 टक्के आहे.
सगळ्यांत आथधी हेल्थवर्कर्स आणि फ्रंटलाईन स्टाफला लस दिली गेली. पण आता 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सगळ्यांना 1 मे पासून लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पण भारताची लोकसंख्या गृहित धरता लसीकरणात अडथळे निर्माण होत आहेत.
तज्ज्ञांच्या मते भारताला जर आपलं लसीकरणाचं उदिष्ट पूर्ण करायचं असेल तर लसीकरणाचा वेग वाढवावाच लागेल.
बीबीसीचे भारतातले प्रतिनिधी सौतिक बिस्वास म्हणतात की, "हे अजून स्पष्ट नाहीये की भारतात पुरेशा प्रमाणत लशी आहेत की नाही किंवा त्यांच्याकडे तरुणांना लशी देण्याची क्षमता आहे की नाही."
जोपर्यंत इतक्या मोठ्या लोकसंख्येला लस मिळत नाही तोवर पूर्ण जगाला धोका आहेच.
प्रा मेनन म्हणतात, "कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये एक अडचण अशी आहे की या साथी फक्त एका देशाचा प्रश्न बनून राहात नाहीत. खऱ्या अर्थाने वैश्विक समस्या बनतात."
ते म्हणतात, "आम्हाला कोरोना टेस्ट आणि लसीकरणाच्या बाबतीत अधिक आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे."
कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी म्हटलं होतं की, "जोवर प्रत्येक जण सुरक्षित होणार नाही, तोवर कोणीही सुरक्षित राहाणार नाही."