Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दलित अत्याचार : ‘जाधव’ आडनाव लावायची तुझी हिंमत कशी होते, असं बोलत त्याने माझ्या कानशिलात लगावली’

दलित अत्याचार : ‘जाधव’ आडनाव लावायची तुझी हिंमत कशी होते, असं बोलत त्याने माझ्या कानशिलात लगावली’
, सोमवार, 7 डिसेंबर 2020 (15:44 IST)
भार्गव पारीख
भारत जाधव या नावाचा फटका एका दलित मुलाला बसल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे.
 
"माझे आईवडील शेतमजूर म्हणून काम करतात, पण आम्हा दोघा भावांना आणि बहिणीला शिक्षण मिळावं आणि आम्ही चांगलं जीवन जगावं, असं स्वप्न ते कायम पाहत असतात. आमच्या शिक्षणासाठी ते पै-न्-पै साठवतात."
 
"टाळेबंदीमुळे सगळी कॉलेजं बंद आहेत. त्यामुळे थोडे पैसे कमवायला मी सौराष्ट्रातून साणंदला आलो. पण माझं आडनाव आणि शर्टाचं बटण उघडं ठेवायची सवय मला एवढ्या मोठ्या संकटात टाकेल नि मला नोकरी सोडावी लागेल, याची मला अजिबात कल्पना नव्हती."
 
अनुसूचित जातीमधील २१ वर्षीय भारत जाधवची ही कहाणी आहे. भारतातील तथाकथित उच्चजातीयांसारखंच आडनाव असल्याच्या कारणावरून उच्चजातीय पुरुषांनी त्याला मारहाण केली.
 
अनेक दलित आणि राजपूत समुदायांमध्ये जाधव हे आडनाव सर्रास आढळतं.
 
साणंद जीआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
 
प्रकरण काय आहे?
भारत मूळचा गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ तालुक्यामधल्या भेताडी गावचा आहे. गेले काही महिने तो अहमदाबादजवळच्या साणंद जीआयडीसीतील एका कारखान्यामध्ये काम करत होता.
 
भारतचे वडील बाबुभाई जाधव वेरावळ तालुक्यात शेतमजूर म्हणून काम करतात. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, हे बाबुभाईंचं स्वप्न आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत साणंदमधील एका कारखान्यात काम करायला लागला.
एफआयआरची प्रत
 
दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर भारतने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पुढील शिक्षणासाठी तो राजकोटला गेला. अभ्यास करत असतानाच कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी भारत अर्धवेळ नोकरीही करत होता.
 
बीबीसी गुजरातीशी बोलताना भारत म्हणाला, "टाळेबंदीमुळे शाळा आणि कॉलेज बंद झालं, त्यामुळे मी घरीच होतो. तेव्हा माझा एक मित्र म्हणाला की, साणंदमधल्या एका कारखान्यात कामगार हवे आहेत आणि कंत्राटी पद्धतीने ते लोकांना नोकरीवर घेतायत.
 
"सध्या ऑनलाइनच वर्ग होत असल्यामुळे कॉलेज पुन्हा उघडेपर्यंत थोडे पैसे कमवावेत, असा मी विचार केला. म्हणून मी एका ठेकेदाराच्या माध्यमातून इथे रुजू झालो."
 
"माझी कामाची पाळी दुपारनंतर होती, त्यामुळे सकाळच्या वेळात मी ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहायचो आणि दुपारी एक वाजता कामाच्या ठिकाणी दाखल व्हायचो. इतर दोन-तीन मित्रांसोबत साणंदला मी एक खोली भाड्याने घेतली. मोल्डिंग केलेले भाग तपासायचे हे माझं काम होतं. मला महिन्याला ९२०० रुपये पगार मिळत होता. पगाराचा थोडा भाग मी शिक्षणासाठी राखून ठेवायचो."
 
भारत म्हणतो, "एक डिसेंबरला मी कंपनीच्या गेटपाशी पोहोचलो, तेव्हा हर्षद नावाच्या एका माणसाने मला थांबवलं. शिव्या देत हर्षदने मला विचारलं, 'तुझ्या शर्टाची बटणं उघडी का आहेत? तू काय इथल्या गँगचा म्होरक्या आहेस का?'
 
घाबरत मी त्याला म्हणालो, 'दादा, तुम्हाला आवडत नसेल तर मी शर्टाची बटणं लावून घेतो'. असं म्हणून मी कंपनीत गेलो."
 
"मधल्या सुट्टीच्या वेळेत हर्षदने माझं नाव आणि जात विचारलं. मी वेरावळहून आलोय आणि खालच्या जातीतला आहे, असं मी त्याला सांगितलं. तर, लगेच तो मला म्हणाला की, निव्वळ दरबारी (एक क्षत्रिय जात) आडनाव लावल्याने काही मी तुला 'भाऊ' म्हणू शकत नाही."
 
भारत म्हणतो, "माझी कामाची वेळ संपल्यावर मी बस-स्टॉपवर वाट बघत थांबलो होतो, तेव्हा हर्षद आणखी पाच-सहा तरुणांसोबत तिथे आला. त्याने माझ्याविरोधात अश्लील शेरेबाजी केली आणि तू खालच्या जातीतला आहेस, तर दरबारी आडनाव लावायची तुझी हिंमत कशी होते, शर्टाचं बटण तू उघडं का ठेवतोस, असं त्याने मला विचारलं. असं बोलत त्याने माझ्या कानशिलात लगावली."
 
फोनवरून धमक्या
आपण हात जोडून हर्षद आणि त्याच्या मित्रांसमोर माफी मागितल्याचं भारत सांगतो.
 
"मी हर्षदला म्हणालो, 'दादा, मी एक छोटासा विद्यार्थी आहे आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही नोकरी करतोय. कॉलेज उघडल्यावर मी राजकोटला परत जाईन. उद्यापासून मी शर्टाची सगळी बटणंही लावून येईन'.
"हे ऐकल्यावर हर्षद ओरडला, 'दलित असून तू मला भाऊ कसं म्हणतोस?' मग त्यांनी मला मारायला सुरुवात केली.
 
"रात्रीचे साडेदहा वाजले होते आणि मला मदत करायला बस-स्टॉपवर कोणीही नव्हतं. मारहाणीत माझे कपडे फाटले होते. तशातच तिथून जाणाऱ्या बसमध्ये मी कसाबसा चढलो.
 
"बस कंडक्टरने माझी विचारपूस केल्यावर मी त्याला सगळं सांगितलं. त्याने मला साणंद पोलीस स्टेशनपर्यंतचं तिकीट दिलं आणि पोलिसांकडे तक्रार करायला सांगितलं."
 
"साणंद पोलीस स्टेशनला पोचल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसाने मला सांगितलं की, ही घटना साणंद जीआयडीसीला घडलेय, त्यामुळे मी तक्रार तिकडच्या पोलीस स्टेशनला नोंदवायला हवी. मग मी रात्री उशिरा साणंद जीआयडीसी पोलीस स्टेशनला पोहोचलो. तिथे माझी तक्रार नोंदवून घेण्यात आली. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही," असं भारत सांगतो.
 
"दुसऱ्या दिवशी मी कामावर गेलो नाही. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी कोणालाही अटक केलं नव्हतं. दरम्यान, मला फोनवर धमक्या दिल्या जात होत्या. अनेकांनी मला तक्रार मागे घ्यायला सांगितलं."
 
"'दरबारी माणसाशी पंगा का घेतोयस,' असं फोन करणारे विचारायचे."
 
घाबरलेला भरत त्याच्या मित्रांसोबत आणि वनकरवासच्या रहिवाशांसोबत साणंद जीआयडीसी पोलीस स्टेशनला गेला. त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्यानंतर या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केलं.
 
पोलिसांचं म्हणणं काय आहे?
साणंद जीआयडीसी पोलीस स्टेशनमधील निरीक्षक धीरूबा जडेजा म्हणाले, "भारत पोलीस स्टेशनला आला तेव्हा तो घाबरलेला होता आणि केवळ एकच माणूस त्याच्या माहितीतला होता."
 
"आम्ही या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केलं आहे आणि इतर काहींना ताब्यात घेतलं आहे. ओळख परेड झाली आणि भारतने हर्षदसह आणखी तीन तरुणांना ओळखलं आहे. अॅट्रॉसिटी कायद्याखाली आम्ही तक्रार दाखल केली असून आरोपींना तुरुंगात पाठवलंय. इतर आरोपींचा तपास सुरू आहे."
 
या घटनेतील कोणाही अपराध्याला मोकळं सोडलं जाणार नाही, आणि गरज पडल्यास भारतला पोलिसांचं संरक्षण दिलं जाईल, असं आश्वासन जडेजा यांनी दिलं.
 
पोलिसांनी तिघांना अटक केली असली, तरी भारत जाधवने भीतीमुळे गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
 
भारत म्हणतो, "मला माझ्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावायचा होता. माझा भाऊसुद्धा कुटुंबाला आधार देण्यासाठी नोकरी करतोय."
 
"मला अजूनही फोनवरून धमक्या दिल्या जातायंत. जीवाच्या भीतीने मी घराबाहेर पाऊलही ठेवलेलं नाही. मी साणंद सोडून माझ्या गावी परत जातोय. राजकोटमध्ये किंवा आसपासच्या भागात मला नोकरी शोधावी लागेल. साणंदला मी कधीच परत येणार नाही."
 
'बीबीसी गुजराती'ने या प्रकरणातील आरोपी हर्षद राजपूतच्या कुटुंबीयांशी बोलायचा प्रयत्न केला, पण कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं कारण देऊन त्यांनी काही बोलायला नकार दिला.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' जिल्ह्यात पोलिसानी पकडला महिलांचा जुगार अड्डा