Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थप्पड 6 वर्षांनी ऐकायला आली का? : संजय राऊत

थप्पड 6 वर्षांनी ऐकायला आली का? : संजय राऊत
, गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (14:37 IST)
'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. पाच वर्ष जुना तो विषय आहे. शिवाजी महाराजांचा अपमान भाजपमध्ये गेलेल्यांना पटला असेल, पण आम्हाला तो पटलेला नाही', अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.
 
योगींना थप्पड लगावण्याच्या वक्तव्यावर बोलताना राऊत पुढे म्हणाले, "6 वर्षांनी थप्पड ऐकायला आली का, तसं असेल तर तुमच्या कानात काहीतरी दोष आहे," असं म्हणावं लागेल.
 
"मुख्यमत्र्यांना जाहीरपणे धमकी दिली तर कारवाई झालीच पाहिजे. प्रत्येकाला आपल्यावर सुडाने कारवाई होत असल्याचंच वाटतं. पण सूडाने कारवाई करण्याची व्याख्या समजून घेतली पाहिजे. सुडाने कारवाई करण्यासाठी आमच्या हातात ईडी किंवा सीबीआय नाही", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. कारवाई अयोग्य असेल तर न्यायालयात दाद मागता येते.
 
व्हायरल व्हीडिओ प्रकरणीही संजय राऊत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची पाठराखण केली. कॅबिनेटमधील प्रत्येक मंत्री हा सरकार असतो, असं राऊत यांनी म्हटलं.
 
"भारतीय जनता पक्ष इतका महान आहे की ते कुणावरही गुन्हा दाखल करू शकतात. ते परग्रहवासींयावरही गुन्हा दाखल करू शकतील."
 
नारायण राणे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगींबद्दल केलेलं वक्तव्य जुनं आहे. पाच वर्षांपूर्वीचं ते प्रकरण आहे. ते आता उकरून काढण्याची काय गरज, आज टीका करणारे त्यावेळी झोपले होते का, असा प्रश्न राऊत यांनी विचारला.
 
"योगींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याची प्रतिक्रिया म्हणून ते वक्तव्य होतं. त्यांनी महाराजांचा अपमान केला होता. भाजपमध्ये गेलेल्यांना ते पटलं असेल, पण आम्हाला ते पटलेलं नाही. असं संजय राऊत राणे यांचं नाव न घेता म्हटलं.
webdunia
"कॅबिनेटचे एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नव्हे. आम्हाला केंद्राशी संवाद साधायचा असेल तर आम्ही थेट मोदी-शाह यांच्याशी करू, असंही राऊत यांनी म्हटलं.
 
मी असं काय बोललो होतं ज्याचा राग आला? - नारायण राणे
'मी असं काय बोललो होतं ज्याचा राग आला? ते वाक्य पुन्हा बोलणार नाही. भूतकाळात एखादं वाक्य बोललो तर गुन्हा कसा झाला?' असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं.
 
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज (25 ऑगस्ट) 4.30 वाजता आपल्या जुहू येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. मंगळवारी (24 ऑगस्ट) अटक आणि जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे पत्रकारांशी बोलत होते.
 
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या विधानांचा दाखले दिले.
 
'सेनाभवन बद्दल जे बोलतील त्याचे थोबाड फोडा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तो क्राईम नाही का? मुख्यमंत्र्यांनी यूपीच्या मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरले. योगी आदित्यनाथांबद्दल बोलले होते की हा योगी आहे की ढोंगी...ते पण मुख्यमंत्री आहेत. पवारसाहेबांनी या सुसंस्कृत व्यक्तीला मुख्यमंत्री केले आहे,' असं नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.
 
नारायण राणे यांनी शिवसेना नेते अनिल परब आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली.
webdunia
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आहेत की अनिल परब असा टोला राणे यांनी लगावला.
 
सामनातील अग्रलेखांच्य संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राणेंनी संजय राऊत हे केवळ उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी लिहितात, असंही म्हटलं.
 
'महाड न्यायालयाचा आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने लागला आहे. देशात कायद्याचं राज्य आहे हे सिद्ध झालं,' असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं.
 
कोर्टाची केस असल्याने मी काही गोष्टींवर भाष्य करणार नाही, असंही राणे यांनी स्पष्ट केलं.
 
राणेंनी म्हटलं, की कुणी माझं काही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारे पण नव्हते.
 
नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-
पोलिसांच्या विनंतीनुसार मी कोर्टात हजर झालो. मला अटक झाली नव्हती. मी माझ्या गाडीतून गेलो.
देशाचा स्वातंत्र्य दिन ज्याला माहित नाही त्यामुळे माझ्या तोंडून ते वाक्य आलं.
आता जपून पावलं टाकली पाहिजेत. परवापासून जनआशीर्वाद यात्रा सुरू करणार. देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन मी स्वीकारेन. काही हरकत नाही
राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे आहे? दिशा सॅलियनचं कोणी काय केलं, कोण मंत्री आहे त्याचा छडा का लागत नाही? पूजा चव्हाणच्या बाबतीत तेच.... आता आम्ही याचा पाठपुरावा करणार. पूजा चव्हाण प्रकरणी कोर्टात जाणार. त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत शांत बसणार नाही. लोकशाही मार्गाने याचा पाठपुरावा करणार.
मला शिवसेनेने मुख्यमंत्री केलं. गँगस्टर मुख्यमंत्री कसा चालतो? आता जे मंत्री आहेत ते पण मग असेच असतील.
जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद काही लोकांना बघवला नाही.
त्यांना वाटतं कायमस्वरुपी सरकार असेल. पण कुछ दिनो के मेहमान है. 17 सप्टेंबरनंतर उत्तर देऊ.
राणेंना हाय कोर्टाकडून दिलासा
नारायण राणे यांना आज मुंबई हाय कोर्टाकडून दिलासा मिळाला. नारायण राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती.
 
ते म्हणाले, "नारायण राणे यांच्यावर पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाहीय. 17 सप्टेंबरला पुढील सुनावणी आहे. नाशिक येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात नारायण राणे यांची अटक करणार नसल्याची माहिती राज्य सरकारने हाय कोर्टात दिली."
 
तसंच नारायण राणे यांनी यापुढे कोणती वक्तव्य करावीत याबाबतही मुंबई हाय कोर्टाने काहीही म्हटलं नसल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे. तेव्हा नारायण राणे यांना आता 17 सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नितेश राणेंचा युवा सेनेवर निशाणा