Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

पर्यावरण दिन : झाडांच्या गोष्टी सांगणाऱ्या या मुंबईतल्या आजींना भेटलात का?

environment saver Mumbai grannies
- ओंकार करंबेळकर
"या झाडाचं नाव आहे 'आसन'. या झाडाच्या खोडावरचे काटे काही काळानंतर गळून पडतात. आता ऐका या झाडाची गोष्ट."
 
भीष्म पितामह अत्यंत गुणवान होते. भीष्म पितामहांच्या चांगल्या कामामुळे आणि सद्गुणांमुळे भरपूर शक्ती असणारे बाण त्यांच्या भात्यात जमा झाले होते. एकेदिवशी ते रथातून जात असताना एक पाल त्यांच्या रथाला आडवी गेली.
 
कितीही सद्गुणी असले, संयम असला तरी भीष्म पितामहांना काही क्षण दुखावल्यासारखे वाटले, आपला अपमान झाला असं त्यांना वाटलं. त्यामुळं त्यांनी त्या पालीला गरागरा फिरवलं आणि फेकून दिलं.
 
ही फेकलेली पाल थेट जाऊन आसन वृक्षावर जाऊन पडली. आसन्नमरण स्थितीतल्या पालीनं भीष्म पितामहांना तुम्हाला बाणांमुळेच मृत्यू येईल असा शाप दिला. पालीचा शाप ऐकून भीष्म पितामहांना त्यांची चूक कळली.
 
त्यांनी तिची माफी मागायला सुरुवात केली. पण एकदा दिलेला शाप मागे घेता येणार नाही असं पालीनं सांगितलं. शेवटी भीष्मांनी तिच्याकडे इच्छामरण मागितलं. मला जेव्हा मरावसं वाटेल तेव्हाच मी प्राण सोडेन असा उःशाप त्यांनी मागून घेतला.
 
पुढे घडलेल्या महाभारतात तसंच झालं. शरशय्येवर पडलेल्या भीष्मांनी उत्तरायणाच्यावेळेस प्राण सोडले. यावेळेस मरण येणाऱ्याला स्वर्ग मिळतो असं मानलं जातं.
 
तुम्ही मुंबईतल्या एखाद्या बागेतून किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून फिरत असाल आणि जर तुम्हाला दोन आजीबाईंचा असा आवाज आला तर तिथंच थांबा आणि त्या काय सांगत आहेत ते ऐका.
 
या दोघींची नावं आहेत रेनी व्यास आणि उषा देसाई. एकीचं वय 63 आणि दुसरीचं फक्त 80.
 
आसनवृक्षाची कहाणी सांगून त्या दोघी तात्पर्यही सांगतात. या जगात सर्वांना जगण्याचा समान हक्क आहे.
 
मुंबईच्या आरे जंगलात असतील तर त्या म्हणतील, 'आरे किसी बाप की जागीर नही है, कोणाला बागडायचं आहे, फिरायचं आहे, प्राण्यांना राहायचं आहे. हे जंगल सर्वांचं आहे'. अशा गोष्टींमधून झाडांची, पाना-फुलांची माहिती देत त्या पुढे जात असतात.
 
यातल्या बहुतेक कथा त्या दोघींनी कोठेतरी ऐकलेल्या असतात किंवा रचलेल्या असतात. आरे जंगलामध्ये मेट्रो प्रकल्पाची कारशेड उभी होण्याची चर्चा असल्यामुळे तसा एखादा संदर्भही तात्पर्यात जोडतात.
 
उन्हात घालायच्या गोल टोप्या, कानाला हेडफोन असा जामानिमा करून या दोन्ही निसर्गमैत्रिणी मुंबईतल्या बागांमध्ये लोकांना मार्गदर्शन करत असतात. एखादं झाड समोर आलं की लगेच त्याची माहिती किंवा एखादी कथा त्या सांगू लागतात.
 
"हे पाहा अमूक झाड. हे अमूकवेळेस फुलतं. याचा रंग पाहा, याच्यावर कोणत्या पक्ष्यांनी घरटी केली आहेत ते पाहा".
 
मग त्या झाडाचं स्थानिक भाषेतलं, हिंदी-इंग्रजी आणि शास्त्रीय भाषेतलं नावही सांगतात. असं सांगत झाडांमागोमाग झाडं करत या रेनी आणि उषा पुढे सरकतात.
 
झाडांची माहिती मिळवायची आणि ती लोकांना द्यायची हा त्यांचा क्रम जोरात सुरू असतो. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर पाच-दहा लोक यायचे आता 70 ते 80 लोक त्यांच्याबरोबर येतात. मग या लोकांचे दोन गट करून एका गटाला रेनी आणि दुसऱ्या गटाला उषा देसाई फिरवून आणतात.
 
webdunia
खरंतर रेनी यांचं आयुष्य चारचौघांसारखं होतं. घर सांभाळून पतीबरोबर व्यवसायात त्या लक्ष घालत. त्यांचं लहानपण वाराणसीला गेलं होतं. तशी वाराणसीला त्यांची निसर्गाशी थोडी तोंडओळख झाली होती. पण पन्नाशी उलटल्यावर त्यांना नव्याने निसर्गओळख करून घ्यावसं वाटू लागलं.
 
झालं... बाईंनी व्यवसायाचं सगळं काम यजमानांकडे दिलं आणि त्या झाडांमध्ये रमू लागल्या. गार्डनिंगचा कोर्स केल्यावर त्यांनी 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे (बीएनएचएस) बॉटनीचे कोर्सेस करायला सुरूवात केली.
 
मुंबईतल्या रुग्णालयातून निवृत्त झालेल्या डॉ. उषा देसाई यांनाही अशीच आवड होती. रिटायर्ड झाल्यावर त्यांनीही कीटकशास्त्र, बॉटनीचे कोर्सेस करायला सुरुवात केली.
 
एकेदिवशी या दोघींची 'टोस्ट टू ट्रीज' नावाच्या कार्यक्रमात भेट झाली. नंतर दोघींनी बीएनएचएसमध्ये 'फील्ड बॉटनी'चा कोर्स केला.
 
आपण जे शिकतोय ते निसर्गात कसं दिसतं हे पाहाण्यासाठी त्या दोघी मुंबईजवळच्या जंगलांमध्ये, बागांमध्ये फिरू लागल्या.
 
2010 साली चारपाच लोकांनी 'ट्री अप्रिसिएशन वॉक' नावाने उद्यानफेऱ्या सुरू केल्या. थोड्या फेऱ्यानंतर बाकीचे सदस्य काही कारणांनी गळाले. पण या दोघींनी वॉक्स चालूच ठेवले.
 
डॉ. उषा देसाईंची गोष्टही तितकीच भन्नाट आहे. त्यांचा जन्म झिम्बाब्वेमध्ये झाला. भारतात शिक्षण झाल्यावर त्यांनी इंग्लडमध्येही वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. 1992 पासूनच त्यांनी निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास सुरू केला. 1997 साली त्या रिटायर्ड झाल्या.
 
रिटायर्ड होताना त्यांनी घोषणा करून टाकली. आता मी काहीही झालं तरी खासगी प्रॅक्टिस करणार नाही. तेव्हा त्यांच्या हॉस्पिटलमधले कर्मचारी हसले होते.
 
'मॅडम! तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय स्वस्थ बसणारच नाही', असं ते म्हणायचे. पण उषाबेन त्यावेळेस हसून नाही म्हणायच्या. त्यांना आता निसर्गात रमायचं होतं आणि त्यांनी तसंच केलं आहे.
 
गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी निसर्गात फिरताना स्वत:कडे या माहितीचा मोठा साठाच तयार केला आहे. त्यांच्याबरोबर मुंबईतल्या बॉटनी, झूलॉजीचे विद्यार्थी, शिक्षकही फिरायला येतात. अशावेळी एखाद्या मुलाने नवी माहिती दिली की त्या चटकन शिकून घेतात.
 
एखादेवेळेस काही विद्यार्थी त्यांना फोन करून अमके झाड कोठे आहे असे विचारतात तेव्हा डॉ. उषा ते झाड मुंबई आणि आसपास कोठे आहे ते चटकन सांगतात. त्यांच्या या अचूक माहितीमुळे मुलं त्यांना 'लिविंग जीपीएस' म्हणू लागली आहेत.
 
पंचाहत्तरी ओलांडली असली तरी प्रत्येक झाडाचा संदर्भ, त्याची गोष्ट, संबंधित पुस्तक उषाबेनना लगेच सांगता येतात. नवं फुलपाखरु, पान-फुल दिसले की त्या सरळ फोटो काढतात आणि व्हॉटसअ‍ॅपवरून रेनी किंवा इतर अभ्यासकांकडून माहिती मिळवूनच गप्प बसतात.
 
डॉक्टरकीची प्रॅक्टीस संपली असली तरी फिरताना एखादं झाड ओळखताना 'डायग्नोसीस' करावं लागतं त्यामुळे डायग्नोसिसने अजून आपली पाठ सोडलेली नाही असे त्या गंमतीने म्हणतात.
 
लोकांना झाडांची माहिती लवकर समजावी यासाठी त्यांनी गोष्टींचा मार्ग निवडला आहे. रेनी सांगतात, "आधीच बॉटनी शिकायला कोणालाही नको असतं. लोकांचं झाडांवर प्रेम असतं पण त्यांना बॉटनी किचकट वाटते. म्हणून मग आम्ही गोष्टींचा मार्ग निवडला आहे."
 
"आपल्याकडे एखाद्या बाईने साडी जरी विकत आणली तरीही ती कशी आणली, कशी निवडली, किंमत कशी कमी करून घेतली याची एक लहानशी गोष्ट करून येणाऱ्या-जाणाऱ्याला सांगते.
 
आपल्याला गोष्टी ऐकायला आणि सांगायला फार आवडतात. त्यात भारतीय संस्कृतीत मौखिक इतिहासाला मोठं महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टी सांगायला सुरुवात केली.
 
'आसन' झाडाच्या गोष्टीप्रमाणे एखाद्या झाडाची गोष्ट सांगायची आणि त्याचं तात्पर्य आताच्या काळापर्यंत आणून ठेवलं की झालं. लोकांना या गोष्टी ऐकायला आवडतात."
 
रेनी आणि उषा लोकांना झाडं लावण्यासाठी मार्गदर्शन करतात. मुंबईतल्या शाळांमध्ये 'बटरफ्लाय गार्डन' करण्यासाठी त्या मदत करतात. अमूक झाडावर फुलपाखरांच्या अळ्या वाढतात, तमूक झाडाच्या फुलातून फुलपाखरं मधुरस शोषून घेतात अशी माहिती त्या मुलांना देत असतात. ही सगळी माहिती मुलं टिपून घेतात आणि बटरफ्लाय गार्डनचे प्रोजेक्ट पूर्ण करतात.
 
यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांचे 100 वॉक्स पूर्ण झाले आणि लवकरच 104वी उद्यानफेरी त्या पूर्ण करतील. मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राणीचा बाग, बीपीटी गार्डन, हँगिंग गार्डन इथं त्यांच्या फेऱ्या झाल्या आहेत. चारकोपला मॅन्ग्रोव्हच्या जंगलांमध्येही त्यांनी फेरी पूर्ण केली आहे.
 
निवृत्त झाल्यावर आपल्या आवडीचं काहीतरी करायला मिळत आहे यामध्ये त्या दोघीही समाधानी आहेत. लहानमुलांपासून मोठ्या माणसांच्या मनामध्ये हरितबिजं रोवण्यातलं समाधान पैशांमध्ये मोजता येत नाही असं त्या दोघी सांगतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर 'मुंबई'