-नामदेव अंजना
सहा महिन्याच्या तयारीने आलोय, हे सांगणाऱ्या या शेतकऱ्याचं इतकं अप्रूप असण्याचं कारण म्हणजे त्यांचं वय. करम सिंह यांनी सत्तरी पार केलीय. 'हमारा क्या हो गया सब, बच्चों का सवाल है, हमारे जमीन का सवाल है,' असं बोलताना त्यांच्या आवाजाला धार चढली होती.
या शेतकऱ्यांशी संवाद साधताना करम सिंह यांच्यासारखे निर्धाराने आंदोलनासाठी आलेले आणि त्यांच्याच वयाचे बरेच शेतकरी दिसले, भेटले.
खरंतर ज्यावेळी दिल्लीतून सिंघु सीमेकडे जात होतो, तेव्हा सिंघु सीमेपासून काही किलोमीटर आधीच दिल्लीच्या हद्दीत बुराडी मैदान लागतं. पंजाब-हरियाणातील काही शेतकरी दिल्लीची सीमा ओलांडून इथेही पोहोचलेत आणि इथे दिल्ली सरकारने आंदोलक शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित नियोजन केलंय.
मात्र, इथे संपूर्ण आंदोलनातून अगदीच काही टक्के शेतकरी दिसतात. खरं आंदोलन सुरू आहे ते दिल्लीच्या सीमांवर.
सिंघु सीमेच्या चार-पाच किलोमीटरच्या हद्दीत पोहोचलो की, पोलिसांचे फौजा ठिकठिकाणी दिसतात. अनेक ठिकाणी कुठे बॅरिकेड्स तर कुठे सरळ ट्रकच आडवा उभा करून रस्ते अडवल्याचं दिसतं.
मग वळणं घेत घेत सिंघु सीमेवर पोहोचावं लागतं. प्रसारमाध्यमांच्या गाड्यांना सिंघु सीमेकडे जाण्याला परवानगी मिळते, बाकीच्या गाड्यांना हरियाणात जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाने वळवलं जातं.
आम्ही सिंघु सीमेपासून पाचशे मीटरवर असतानाच घोषणाचा आवाज आसमंतात निनादताना ऐकला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस, अतिरिक्त फौजफाटा दिसतो. गाडी काही अंतरावर पार्क करून पुढे चालत जावं लागतं. आम्ही सिंघु सीमेवर पोहोचलो आणि सीमा पार करून हरियाणाच्या भूमीवर पाऊल ठेवला.
सीमेला लागूनच छोट्याशा सभेसारखं वातावरण दिसतं. सभा म्हणजे काय तर रस्त्यावर गाद्या टाकून हे शेतकरी बसलेले आहेत. हे गेल्या पाच-सहा दिवसांपासून असंच आहे.
या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कुणी आल्यास या छोट्याशा सभेसमोर भाषण करतं. एक आंदोलक सांगत होते, पंजाबमधील गायक, अभिनेते इथे भेट देऊन गेले. क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगीराजही येऊन गेले. असे कुणी ना कुणी सारखं येत राहतंय. आपला शेतकरी घरदार सोडून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय, याचा अभिमान इथे भाषण करणाऱ्यांच्या शब्दातून दिसतो.
सिंघु सीमेपासून पुढे हरियाणा सुरू होतो. पंजाबमधून दिल्लीत येण्यासाठी हा प्रमुख मार्ग मानला जातो. त्यामुळे या सीमेवर असणारे बहुतांश शेतकरी हे पंजाबमधील आहेत. इथल्या शेतकऱ्यांच्या दाव्यानुसार, चाळीस हजार शेतकरी इथे आंदोलन करतायेत.
सिंघु सीमेपासून ते मुरथलपर्यंत चक्काजाम करण्यात आलाय. ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रॉली, दुचाकी, ट्रक ही वाहनं रस्त्यात एकामागोमाग एक उभी करण्यात आलीत. सिंघु सीमा ते मुरथल हे जवळपास 40 किलोमीटरचं अंतर आहे. यावरूनच या आंदोलनाची तीव्रता आणि भव्यता लक्षात येऊ शकते.
माझ्या सहकाऱ्यासोबत आम्ही जवळपास तीन-साडेतीन किलोमीटरचा रस्ता पायी चालत गेलो. रस्त्यात गटा-गटाने शेतकरी बसलेले दिसतात. कुणी घोषणा देत असतो, तर कुणी पंजाबमधील स्थानिक गाणी गात असतो, कुणी काहीतरी खाद्यपदार्थही वाटत फिरताना दिसतो.
दर काही पावलांवर आम्ही शेतकऱ्यांशी बोलत होतो. आमच्या मनातील प्रश्न विचारत होतो. एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली ती म्हणजे या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात झालीय. एक शेतकरी म्हणाला, "महिन्याभरापासून आम्ही पंजाबमध्ये आंदोलन करत होतो. कायद्यातल्या त्रुटी आम्हाला माहित आहेत. घरदार मागे ठेवून उगाच इथवर आलोय का?"
काही शेतकऱ्यांना हिंदीत बोलताना अडचण येई. सुदैवाने आमच्यासोबत अमृतसरमध्ये पीएचडीचं शिक्षण घेणारा हरजिंदर नावाचा तरूण होता. त्याची मदत आम्हाला होई.
किमान आधारभूत किंमत, बाजार समित्या व अडत्यांचं अस्तित्व यांबाबतच्या शंका आणि भीती प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या बोलण्यात वारंवार येत होत्या. आपलं म्हणणं मांडल्यावर 'मोदी जुलूम कर रहा है, लेकिन हम मानेंगे नहीं' असा शेवट प्रत्येकाच्या बोलण्यात असे.
इतरवेळीही पंजाबी लोकांच्या बोलण्यातला ठामपणा आणि आक्रमकपणा दिसतो, तो इथेही दिसला. पटियालातील केसर सिंग घोषणा द्याव्या अशा आवाजात आम्हाला सांगत होते, "अडतिया से हमारा नौ मास का रिश्ता है, उसको हम नहीं छोडेंगे, हमारी मंडी हमें चाहिये"
इथल्या शेतकऱ्यांशी बोलताना अगदी बेसिक प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. कृषी कायदे मागे घ्या, या मागणीवर ठाम असलेले शेतकरी दिसतात. त्यांच्या मागण्या नेमक्या काय, हे आता माध्यमांमधून सर्वांपर्यंत पोहोचलंच आहे. मात्र, या आंदोलनावर काही प्रश्नही उपस्थित केले गेले. त्याबाबतही आम्ही विचारलं.
कुणा राजकीय पक्षाचा किंवा अगदी खलिस्तानचाही संबंध या आंदोलनाशी जोडला गेला. पण यावर बोलताना रणजितसिंह अक्कड नावाच्या पंच्याहत्तरी पार केलेल्या आंदोलक शेतकऱ्यानं सांगितलं, "आम्हाला समस्यांना सामोरं जावं लागतंय म्हणून आमची शेतीची कामं मागे ठेवून आम्ही इथे आलोय."
असं सांगत असतानाच त्यांनी म्हटलं, "1971 च्या युद्धात मी भाग घेतला आहे. कुणी आम्हाला देशविरोधी ठरवू नये."
हीच गोष्ट इथे फिरताना विशेषत: जाणवली. साधरणत: कुठल्याही आंदोलनात पुढे असलेली काही लोक वगळता मागच्यांना आंदोलनातल्या मुख्य मुद्द्यांची फारशी माहिती नसते. एखाद-दुसरा मुद्दा माहित असतो. बाकी ते समर्थनासाठी असतात. पण इथल्या शेतकऱ्यांशी बोलताना असं वाटलं नाही.
ज्या ज्या आंदोलकांशी बोललो, त्यांना हे कायदे का मागे घ्यावेत, याची किमान एक-दोन कारणं त्यांच्याकडे होती. मग कुणाला किमान आधारभूत किंमतीचा मुद्दा खटकत होता, कुणाला बाजार समित्यांचा, तर कुणाला कंत्राटी पद्धतीने शेती देण्याचा मुद्दा खटकत होता.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध कॉलेजमधून तरुण-तरुणीही आले होते. कुणी पोस्टर रंगवून देत होतं, तर कुणी ताला-सुरात घोषणा देत होतं. अमृतसरमधूनही अनेक विद्यार्थी आले होते. अशा विद्यार्थ्यांचं येणं केवळ दखलपात्र नाही, तर त्यांना या समस्यांची जाणीव दिसली.
सिंघु सीमेवर पोहोचल्यावर भेटलेला एक मूळचा पंजाबी तरूण दिल्लीत शिकत होता आणि तो फक्त पाठिंब्यासाठी तिथं पोहोचला होता. इथे उपस्थित राहणं आपलं कर्तव्य तो मानत होता. अत्यंत उत्साहाने तो शेतकऱ्यांचे मुद्दे आम्हाला सांगत होता.
दरम्यान एक मुद्दा आवर्जून नमूद करायला हवा, तो म्हणजे कोरोनाचा. कारण कोरोनासारख्या आरोग्य संकटाचा काळ असूनही हजारोंच्या पटीत शेतकरी सहभागी झाले आहेत. बहुतांश जणांच्या तोंडाला मास्क नाहीय. याबद्दल विचारलं, तर रणजित सिंह हे बिहारच्या निवडणुकीचा दाखला देतात. ते म्हणतात, "तिथे निवडणुकांवेळी हजारोंच्या सभा घेतल्या, तेव्हा तुम्हाला कोरोना आठवला नाही का? आमच्या आंदोलनावेळीच कोरोना आला का?"
अशा बऱ्याच गोष्टी या आंदोलनात पाहायला मिळाल्या. आज सहा दिवस झाले हे शेतकरी रस्त्यावर बसलेत. या भागातील तापमान दहा अंशापर्यंत खाली येतो. डिसेंबरमधल्या दिवसागणिक हा आकडा आणखी खाली येत जाईल. अशावेळीही शेतकरी आंदोलनावर तसूभरही मागे सरत नाहीत.
सहा-सहा महिन्यांची सोय करूनच शेतकरी दिल्लीच्या दिशेनं घरातून निघालेत. केवळ खाण्या-पिण्याचीच नव्हे, तर मानसिक तयारीही करून आलेत. या परिसरात अनेक गुरुद्वारांच्या मार्फत खाण्यची सोय करण्यात आलीय. शिवाय, कुणी ना कुणी फलं, पाणी, बिस्किटं असे वाटप करत आहेच.
दिवसभर आंदोलनाच्या परिसरात फिरल्यानंतर संध्याकाळी परतत असताना अर्ध्या रस्त्यात आलो आणि मोबाईलवर मेसेज आला, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेतून ठोस असे काहीच बाहेर आले नाही. चर्चेसाठी समितीचा प्रस्ताव सरकारने ठेवलाय.
दिवसभर शेतकऱ्यांशी जेवढं बोललो, त्यावरून एवढं निश्चित की, घरदार मागे ठेवून, शेतीचं कामं ठप्प ठेवून, गाडी-घोड्यासह शकेडो किलोमीटर राजधानीवर धडकलेल्या हे शेतकरी एका निर्धारानं आलेत. त्यांच्याशी सरकार कसा संवाद साधतंय आणि यातून मार्ग काढतंय, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.