Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कमल हसनः नथुराम गोडसे - स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता

कमल हसनः नथुराम गोडसे - स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता
, सोमवार, 13 मे 2019 (15:59 IST)
"स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी एक हिंदू होता. त्याचं नाव होतं नथुराम गोडसे," असं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कळ निधी मय्यम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी केलं आहे. चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. अर्वाकुरची इथं येत्या रविवारी पोटनिवडणूक होणार आहे. कमल हासन यांच्या पक्षाचे एस. मोहनराज इथून निवडणूक लढवत आहेत. "हा मुस्लीमबहुल भाग आहे म्हणून मी हे विधान करत नाहीये. गांधीजींच्या पुतळ्यासमोर उभं राहून मी हे बोलत आहे," असं कमल हासन यांनी म्हटलं. 
 
कमल हासन यांच्या या विधानावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपनं कमल हासन यांच्या विधानावर टीका केली असून ते 'आगीला हवा' देत असल्याचं म्हटलं आहे.
 
तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष तामिळसाई सुंदरराजन यांनी ट्वीट करून म्हटलं, की "अभिनेते कमल हासन यांना आता झालेली गांधी हत्येची आठवण आणि त्याला हिंदू दहशतवाद म्हणून संबोधणं हे खरंच निंदनीय आहे. प्रचारसभेत अल्पसंख्यांकांशी बोलताना असं विधान करून ते आगीशी खेळत आहेत. "मतं मिळवण्यासाठी तुष्टीकरणाचा हा प्रकार आहे. मात्र असं करताना श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या बाँबस्फोटांवर त्यांनी मौन का बाळगलं?
 
अभिनेता विवेक ओबेरॉयनंही कमल हासन यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. "कलेप्रमाणेच दहशतवादालाही धर्म नसतो. गोडसे दहशतवादी होता, हे तुम्ही म्हणू शकता. पण त्याला 'हिंदू' जोडण्याची काय आवश्यकता आहे. तुम्ही मुस्लीम बहुसंख्य भागात मतं मागत असल्यानं असं विधान केलं का?" असं ट्वीट विवेक ओबेरॉयनं केलं आहे. नथुराम गोडसे हे हिंदू दहशतवादी होते, असं विधान करणारे कमल हासन हे काही पहिलेच नाहीत.
 
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनीही गोडसेंबद्दल असंच ट्वीट केलं होतं. विशाल भारद्वाज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, की "माझ्या एका मित्रानं मला विचारलं, भारतातला पहिला दहशतवादी कोण होता? मी विचार केला आणि 'गोडसे' हे नाव आठवलं." "तुमच्या विचारधारेशी सहमत नसलेल्या व्यक्तीला तुम्ही ठार करता, याला दहशतवाद नाही तर काय म्हणायचं?" असंही विशाल भारद्वाज यांनी म्हटलं होतं.
 
कमल हसन आणि वाद
कमल हासन आणि त्यांचे वादग्रस्त वक्तव्य लोकांसाठी नवीन नाहीत.
 
कमल हासन यांनी नरेंद्र मोदींच्या नोटाबंदी निर्णयाचे स्वागत ट्वीट करून केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, "मिस्‍टर मोदी यांना सलाम. या निर्णयाचं सर्व राजकीय विचारांच्या पुढे जाऊन कौतुक व्हायला हवं." मात्र नंतर त्यांनी या वक्तव्यावरून युटर्न घेतला होता.
 
सरकारी शिक्षकांच्या संपाच्या बाबतीत कमल हासन यांनी ट्वीट करत राजकीय नेत्यांवर निशाणा साधला होता. "काम नाही तर पैसे नाही, हा नियम फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच का? रिसॉर्टमध्ये सौदेबाजी करणाऱ्या नेत्यांबद्दल काय विचार आहे," असं ट्वीट त्यांनी केलं होतं.
 
कमल हासन यांनी उजवी विचारधारा आणि हिंसाचार यासंबंधीचा लेख 'आनंद विकटन' या मासिकात लिहिला होता. त्यानंतर मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते.
 
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कमल हासन यांनी ट्वीट करत निषेध नोंदवला होता. या ट्वीट मध्ये त्यांनी लिहिलं होतं की, "बंदुकीच्या वापरानं तोंड बंद करून चर्चेत जिंकणं ही सर्वात वाईट गोष्ट आहे. गौरी यांच्या निधनाने दुःखी झालेल्या सर्व लोकांसोबत माझी भावना जोडली आहे."
 
अभिनेता ते नेता
कमल हासन यांचं खरं नाव पार्थसारथी आहे. त्यांचे वडील डी. श्रीनिवासन हे फौजदारी वकील होते.
 
1960 साली 'कलाथूर कन्नम्मा' या चित्रपटातून त्यांनी सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. आजवर त्यांचे 7 चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटांच्या विभागामध्ये पाठविण्यात आले होते.
 
कमल हासन हे एकमेव अभिनेते आहेत ज्यांनी हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी आणि बंगाली या 6 भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. कमल हासन यांचा 'मरुध्यानयागम' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी केलं होतं. मात्र काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. 'गिरफ्तार' या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन, रजनीकांत या महानायकांसोबत कमल हासन यांचीही भूमिका होती. कमल हासन यांच्या नावावर चार राष्ट्रीय चित्रपट, तीन सर्वश्रेष्ठ अभिनेता तसेच एक सर्वश्रेष्ठ बाल कलाकार असे पुरस्कार मिळवणाचा रेकॉर्ड आहे.
 
हॉलिवूड स्टार जॅकी चॅन भारतात कमल हासन यांच्या 'दशावतारम' या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचसाठी आले होते. तेव्हा कमल हासन यांनी "आपण जॅकी चॅन यांचे फॅन" असल्याचं सांगितलं. "मी माझ्या चित्रपटांमध्ये जॅकी चॅन यांच्यासारखे स्टंट करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मला 32 फ्रॅक्चर झाले होते," असं त्यांनी सांगितलं.
 
शंकर यांच्या बहुचर्चित चित्रपट एधिरन (रोबोट) मध्ये कमल हासन हे मुख्य भूमिकेत असणार होते. मात्र नंतर गोष्टी बदलल्या आणि सुपरस्टार रजनीकांत हे चिट्टी आणि प्रोफेसर वसीकरण म्हणून आपल्याला दिसले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1988 मध्ये मोदींनी केल होतं पहिलं Email ? बॉलीवूड कलाकारासह सर्व हैराण