काँग्रेस नेते हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत. गुजरात हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे.
मेहसाणात आमदाराच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी विसनगर कोर्टानं दोन वर्षाची शिक्षा दिली होती. गुजरात हायकोर्टानं या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
हार्दिक यांच्यासमोर सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय आहे. जामनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहे. पण काँग्रेसनं अजून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. 12 मार्चला हार्दिक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
जामनगरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे. गुजरातमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार आहे.
त्यामुळे हार्दिक यांच्या हातात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 3 दिवस असल्याचं बोललं जात आहे.
हार्दिकचे वकील एम. सईद यांनी कोर्टाच्या निकालानंतर सांगितलं, "कोर्टाच्या निकालाचा अभ्यास केल्यानंतर आम्ही पुढे काय करायचे ते ठरवणार आहोत. आम्ही लवकरच सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत आणि शिक्षेस स्थगिती मागणार आहोत."
हार्दिक यांनी ट्वीट करून कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत असल्याचं म्हटलंय. तसंच यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे. "भाजपच्या काही नेत्यांवर आरोप आहेत, त्यांना शिक्षा देखील झाली आहे, पण कायदे फक्त आमच्यासाठी आहेत," असं त्यांनी म्हटलंय.
पाटीदार आंदोलनाचा चेहरा ते काँग्रेस प्रवेश
हार्दिक पटेल यांचा जन्म 20 जुलै 1993 रोजी या गुजराती पाटीदार मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचा सबमर्सिबल पाइप्सचा व्यवसाय आहे.
सरदार पटेल ग्रुपच्या माध्यमातून ते समाजकारणात आले. सरदार पटेल ग्रुप ही पाटीदार युवकांची संघटना आहे. 2012 पासून ते 2015 पर्यंत हार्दिक पटेल यांनी या ग्रुपमध्ये काम केलं. 2015 साली पाटीदार अनामत आंदोलन समितीची स्थापना त्यांनी केली.
हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या मागणीला बळ मिळालं. या समितीच्या मार्फत 2015 आरक्षणासाठी मोठी चळवळ उभारण्यात आली होती. या आंदोलनाचं नेतृत्व हार्दिक पटेल यांनी केलं होतं. तेव्हापासून पाटीदार आंदोलनाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
गुजरात निवडणुकीच्या वेळी हार्दिक पटेल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता तसेच त्यांनी निवडणूक देखील लढवली नव्हती. गुजरात निवडणुकीच्या वेळी त्यांची वयाची 25 वर्षं पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास अपात्र होते. आता त्यांची वयाची 25 वर्षं पूर्ण झाली आहेत त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास पात्र आहेत.
हार्दिक पटेल आणि काँग्रेसची जवळीक
हार्दिक पटेल यांनी ऑगस्ट महिन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केलं होतं. हे उपोषण दोन आठवडे चाललं. त्यांच्या उपोषणाला त्यावेळी संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. हार्दिक यांनी त्यावेळी आपलं मृत्यूपत्र देखील लिहिलं होती. त्याची देखील चर्चा होती.
हार्दिक उपोषणाला बसल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात काँग्रेस नेते भेटायला आले. सिद्धार्थ पटेल, अर्जुन मोधवाला, काँग्रेस आमदार शैलेश परमार, हिम्मत सिंह पटेल आणि माजी खासदार विक्रमभाई मदाम या नेत्यांनी हार्दिक यांची भेट घेतली होती.