अनघा पाठक
'माराठीर साजे आजे हे बांगाली
एक कंठे बोलो,
जयतु शिवाजी…'
सन 1905-06 चा थोड्या आधीचा काळ. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मवाळ राजकारणाची चलती होती. पण याच सुमारास होणाऱ्या एका घटनेने भारतीय स्वातंत्र्य चळवळीची दिशा आणि राजकारणाची विचारधारा दोन्ही बदलणार होतं.
ब्रिटिशांच्या काळात बंगाल प्रांत म्हणजे आताचा पश्चिम बंगाल, बांगलादेश, बिहार आणि ओरिसा यांनी मिळून बनला होता. इतक्या अवाढव्य प्रदेशाची फाळणी करण्याचं अनेक वर्षांपासून सरकारच्या मनात होतं. या फाळणीची योजना आखणाऱ्या लॉर्ड कर्झनने एका ठिकाणी लिहूनही ठेवलं होतं, "बंगाली लोक स्वतःला एक राष्ट्र समजतात. त्यांनी जो गोंधळ माजवला आहे त्यापुढे आपण झुकलो तर भविष्यात पूर्व भारत इतका शक्तीशाली होईल की त्यांना हरवणं अशक्य होईल."
आणि म्हणूनच 1904-05 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली. या कृतीविरोधात रोषाचा आगडोंब उसळला आणि वंग-भंग आंदोलनाची सुरूवात झाली. या आंदोलनाने अनेक गोष्टी बदलल्या. भारतात पहिल्यांदा स्वदेशी चळवळ सुरू झाली, ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत जहाल राजकारणाचा प्रभाव वाढला.
स्वदेशी आणि स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरणाऱ्या या आंदोलनाची प्रेरणा होते छत्रपती शिवाजी महाराज. रविंद्रनाथ टागोरांनी त्यावेळेस कविता लिहिली 'शिवाजी उत्सव'. हीच कविता वंगभंग चळवळीचं स्फूर्तीगान ठरली.
पु. ल. देशपांडे आपल्या वंगचित्रे या पुस्तकात लिहितात, "शिवाजी उत्सव ही रविद्रांची अत्यंत तेजस्वी कविता आहे. शिवगौरवाचा एकेक शब्द आगीच्या ठिणगीसारखा उडाला आहे. रविंद्रांची रविकिरणांसारखी सप्तरंगी प्रतिभा परंतु जेव्हा सात्विक संतापाने हा महाकवी उफाळून उठतो तेव्हा गद्य काय आणि पद्य काय ऋषीवाणीसारखे गर्जना करून उठत असते."
रविंद्रनाथ टागोरांच्या या कवितेतल्या काही भाग पुलंनी मराठीत अनुवादित करून पुस्तकात पुढे लिहिला आहे तो असा -
'हे राजतपस्वी वीरा, तुझी ती उदात्त भावना -
भरून राहिली आहे असंख्य भांडारातून
त्यातला एक कण देखील काळाला नष्ट करता येणार नाही.'
'शिवाजी उत्सव' ही रविंद्रनाथांची प्रसिद्ध कविता असली तरी याही आधी त्यांनी 'प्रतिनिधी' नावाची कविता लिहिली होती. याही कवितेची प्रेरणा शिवाजी महाराज होते.
यात समर्थ रामदासांचाही उल्लेख आहे. राजाने जनतेचा प्रतिनिधी असावं आणि वैरागी असावं अशा आशयाची ही कविता आहे. शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेल्या या कवितेतल्या एका ओळीचा भावार्थ असा की, "राज्य त्याने करावं जो राजा नाही."
पण बंगाली साहित्यातला शिवाजी महाराजांचा उल्लेख इतकाच नाहीये.
लेखक आणि इतिहासकार असलेल्या अनुराधा कुलकर्णी अरबिंदो घोषांवर असलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रभावाबद्दल सांगतात. "त्यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर बाजीप्रभू नावाची मुक्तछंदातली इंग्लिश कविता लिहिली. ही प्रदीर्घ कविता 1909-10 च्या सुमारास मासिकांमधून प्रसिद्ध झाली. यात बाजीप्रभू देशपांडे - तानाजी मालुसरे यांचा संवादही चित्रीत केला आहे."
स्वामी विवेकानंदांच्या भाषणातही अनेकदा शिवाजी महाराजांचे उल्लेख असायचे असंही त्या म्हणतात.
शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तकं, लेख वंगभंग चळवळीच्या काळात लिहिले गेले. त्यातलं एक नाव म्हणजे जुगंतर नावाचं बंगाली मासिक ज्यात अनेक लेख प्रसिद्ध झाले होते. या मासिकावर नंतर ब्रिटिशांनी बंदी आणली. मुळच्या मराठी असलेल्या सखाराम देऊस्कर यांनी बंगालीमधून शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. याकाळात शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित बंगाली नाटकंही सादर व्हायची.
स्वदेशी चळवळ आणि शिवाजी महाराज
स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेला एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे दोन उत्सव आयोजित करायला सुरूवात केली. टिळकांच्या सार्वजनिक शिवजयंतीचं लोण लवकरच इतर राज्यांमध्येही पसरलं.
"लाल-बाल-पाल या त्रयींनी शिवजयंती जोशात साजरी करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात तर होत होतीच, त्याबरोबरीने लाला लजपत रायांनी पंजबामध्ये आणि बिपिनचंद्र पालांनी बंगालमध्ये साजरी करायला सुरुवात केली. त्याकाळात महाराष्ट्रखालोखाल बंगालमध्ये शिवजयंती इतक्या जोशात साजरी व्हायची," इतिहासकार पांडुरंग बलकवडे सांगतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात शिवाजी महाराज स्वातंत्र्यांची प्रेरणा ठरले असंही ते म्हणतात.
"सुभाषचंद्र बोस फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते पण गांधींच्या असहकारामुळे त्यांना ते पद सोडावे लागलं. यानंतर निराश अवस्थेत जेव्हा ते पुण्याला आले तेव्हा त्यांनी सिंहगडाला भेट दिली. तेव्हा त्यांच्यासोबत टिळकांचे भाचे केतकर होते. तेव्हा सुभाषचंद्र बोसांनी कल्याण दरवाजासमोरच्या पाच पायऱ्यांवर रविंद्रनाथ टागोरांचं शिवकाव्य म्हटलं होतं. तशी नोंद आहे. इथून त्यांना पुढची प्रेरणा मिळाली," बलकवडे नमूद करतात.
वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशी चळवळीने जोर धरला. परदेशी मालाची होळी व्हायला लागली, लोक देशी गोष्टींचा पुरस्कार करायला लागले. याची प्रेरणाही महाराजच होते. वंगभंग आंदोलनानंतर पहिल्यांदा पूर्ण स्वातंत्र्यांची मागणी केली गेली जी शिवाजी महाराजांच्याच स्वराज्य स्थापनेवरून प्रेरित झाली होती.
स्वदेश आणि स्वातंत्र्य या दोन कल्पनांवरून रविंद्रनाथ लिहातात -
'तोमार शे प्राणोत्सर्ग
स्वदेश लक्ष्मीर पूजाघरे,
शे सत्यसाधन,
के जानितो होये गेछे
चिर युगयुगान्तर तरे भारतेर धन...'
याचा मराठी अनुवाद करताना पुलं लिहितात - 'स्वदेश लक्ष्मीच्या गाभाऱ्यात वाहिलेले तुझे प्राण, तुझी ती सत्यसाधना भारताची चिरयुगयुगांतराचं धनसंपदा बनली आहे.'
बंगालचं राजकारण आणि छत्रपती शिवाजी
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, त्यांच्या नावाने राजकारणही केलं जातं. पण स्वातंत्र्यापूर्व काळात बंगालच्या राजकीय, सामजिक पटलावर जितक्या प्रखरपणे शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात होतं तेवढं त्यानंतरच्या काळात घेतलं गेलं नाही. बंगाली माणसाच्या मनात आज शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे पण त्याहीपेक्षा त्यांच्या मनात, लोककथा आणि अंगाईगीतांमध्येही मराठ्यांनी केलेल्या बंगालच्या स्वाऱ्यांची प्रतिबिंब आहेत.
पण याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात मात्र विश्व-भारतीच्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविंद्रनाथ टागोर यांची 'शिवाजी उत्सव' या कवितेतल्या काही ओळी बंगालीत म्हणून दाखवल्या. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही होती. त्या ओळींचा अर्थ असा की 'एक दिवशी, शिवाजी राजे तुम्हाला वाटलं की छिन्नविछिन्न झालेल्या या देशाला एका सूत्रात बांधायला हवं.'
या सूत्राचा भाजपला अभिप्रेत असलेला अर्थ हिंदुत्व आहे का? भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचं राजकारण करतोय. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांचेच पट्टशिष्य असलेले आणि आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे शुभेंदू अधिकारी आमनेसामने आलेत, तिथून बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांना रिपोर्टींग करताना अनेकांनी सांगितलं की, "भाजपने हिंदू विरुद्ध मुस्लीम वातावरण तयार केलंय."
भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी आदल्याच दिवशी म्हणाले होते की "बेगम निवडून आली तर नंदीग्रामचा मिनी-पाकिस्तान होईल," हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचे उघड आणि छुपे दोन्ही प्रयत्न भाजप इथे करत आहे.
त्याला काही प्रमाणात यशही मिळतंय. इथल्या छोट्या गावांतही काही लोक पत्रकारांना पाहून मोठ्या आवाजात 'जय श्री राम' अशा घोषणा देतात. 'जय श्री राम' ही अयोध्या मंदिर आंदोलनात वापरलेली राजकीय घोषणा आधी बंगालमध्ये लोकप्रिय नव्हती, असं इथले पत्रकार सांगतात.
'एका धर्मात देश बांधणारा राजा' असं रवींद्रनाथ टागोर का म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी रवींद्रनाथांची मूळ कविता म्हणून दाखवली त्यातले शब्द आहेत...
'एक धर्मराज्यपाशे खंड छिन्न विक्षिप्त भारत
बंधे दिबो आमी'
यातल्या 'धर्म' वर सध्याच्या राजकीय परिस्थितीत जास्तच जोर दिला जातोय. पण रविंद्रनाथांनी ही कविता लिहिली तेव्हा त्यांना एका 'धर्मांत' भारतीयांना बांधणं अपेक्षित होतं का?
"रवींद्रनाथ हे मुळातच बंडखोर आणि व्यवस्थेच्या विरोधात जाणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं शिवाजी महाराजांशी जे नातं होतं तेही बंडखोरीचं, व्यवस्थेच्या विरोधात जाण्याचं. शिवाजी महाराज सन 1900 पासून बंगालची प्रेरणा बनले ते याच कारणासाठी," कोलकाता विद्यापीठात सहायक प्राध्यपक असलेले अबीर चॅटर्जी म्हणतात.
रवींद्रनाथांना संघटित धर्म ही संकल्पनाच मान्य नव्हती, प्रा चॅटर्जी पुढे सांगतात.
त्यांनी कायम धर्माशी, व्यवस्थेशी आणि वरिष्ठ वर्गाशी झगडा केला. याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा रविंद्रनाथ टागोरांना नोबेल मिळालं तेव्हा त्यांची भलामण करणाऱ्या, त्यांना डोक्यावर उचलणाऱ्या बंगालमधल्या बुद्धीजीवी वर्गावर त्यांनी टीकेचे आसूड ओढले होते.
असा कवी शिवाजी महाराजांसारख्या व्यवस्थेला उलटवून लावणाऱ्या प्रतिमेच्या प्रेमात पडला नसता तर नवलंच.
"बंगालमध्ये त्याकाळात शिवाजी महाराजांना शोषितांचा राजा, व्यवस्थेच्या विरोधात उभा राहाणारा हिरो म्हणून पाहिलं गेलं. स्वातंत्र्य चळवळीत ज्या आदर्शांची कमतरता होती ती जागा शिवाजी महाराजांनी भरून काढली. पण बंगाली माणसाने त्यांच्याकडे कधीच हिंदुत्वाच्या चष्म्यातून बघितलं नाही. बंगाली माणसासाठी शिवाजी मुस्लिमांविरूद्ध लढणारा राजा नाही तर शोषकांविरोधात लढणारा राजा आहे. त्याच प्रेरणेने बंगाली माणसं ब्रिटिशांविरोधात लढली," प्रा चॅटर्जी नमूद करतात.
इतिहासकार पांडूरंग बलकवडे यांच्या मते शिवाजी महाराजांचं महत्त्व फक्त यासाठी नाही की ते मुगलांविरोधात लढले, यासाठीही आहे की त्यांच्या आयुष्यातल्या लढाया ते जिंकले. ब्रिटिशांविरोधात लढताना ही गोष्ट प्रेरक होती की आपणही महाराजांच्या मार्गावर चालून जिंकू शकतो. म्हणून वंगभंग चळवळीची आणि स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा शिवाजी महाराज बनले.