थायलंडचे राजे महा वाजिरालाँगकॉर्न यांनी आपल्या शाही जोडीदारचे सगळे अधिकार काढून घेतले आहेत. राजांशी केलेल्या "बेईमानी" आणि "गैरवर्तना"साठी ही शिक्षा दिल्याचं शाही घराण्याकडून आलेल्या अधिकृत पत्रकात म्हटलंय.
राजाच्या जोडीदार सिनीनत वोंगवाजिरपकडी या 'महत्त्वाकांक्षी' होत्या आणि त्यांनी स्वतःला 'राणीच्या बरोबरीचं' समजायला सुरुवात केली होती. "त्यांचं असं वागणं अपमानास्पद होतं," असं या पत्रकात म्हटलं आहे.
राजे महा वाजिरालाँगकॉर्न यांनी आपली चौथी पत्नी राणी सुथिदा यांच्याशी लग्न झाल्यानंतर दोनच महिन्यांनी जुलैमध्ये सिनीनत यांची शाही जोडीदार म्हणून नेमणूक केली होती.
सिनीनत यांना थायलंडच्या लष्करात मेजर-जनरल हे पद दिलं होतं. त्या प्रशिक्षित पायलट, नर्स आणि बॉडीगार्ड आहेत. Royal Noble Consort हा शाही जोडीदाराचा दर्जा मिळवणाऱ्या त्या गेल्या शतकभरात पहिल्या व्यक्ती होत्या.
राजे महा वाजिरालाँगकॉर्न यांच्या चौथ्या पत्नी, 41 वर्षीय राणी सुथीदा या माजी फ्लाईट अटेंडन्ट आहेत. त्या वाजिरालाँगकॉर्न यांच्या खासगी सुरक्षेच्या उपप्रमुखही आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या राजांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत.
सिनीनत यांना पदच्युत केल्याची घोषणा 'रॉयल गॅझेट'मध्ये सोमवारी प्रसिद्ध झाली. यामुळे सिनीनत यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत, यावर शिक्कामोर्तब झालं. गेली अनेक वर्षं त्या राजे महा वाजिरालाँगकॉर्न यांच्यासोबत दिसत होत्या.
अगदी वाजिरालाँगकॉर्न यांनी सुथिदा यांच्याशी लग्न केल्यानंतरही सिनीनत शाही कार्यक्रमांमध्ये नियमितपणे पाहुण्या म्हणून हजेरी लावायच्या.
काय होतं पत्रकात?
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या पत्रकात म्हटलं की सिनीनत यांनी "राणीची नियुक्ती होऊ नये म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न केले तसंच त्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला."
सुथिदा यांचा राज्याभिषेक जुलै महिन्यात झाला होता.
"राजांनी सिनीनत यांना शाही साथीदाराचं पद दिलं. त्यांनी अपेक्षा होती की यामुळे सिनीनत जो दबाव टाकत आहेत तो कमी होईल, तसंच त्या राजाला उपद्रव देणार नाहीत," पत्रकात म्हटलं.
सिनीनत यांनी राजा आणि राणीच्या विरोधात बंड केल्याचा आरोपही या पत्रकात करण्यात आला. तसंच आपल्या अधिकाराचा गैरवापर करत त्यांनी राजाच्या वतीने हुकूम दिल्याचंही त्यात म्हटलं आहे.
"राजांच्या लक्षात आलं की आपल्याला दिलेल्या पदाबद्दल सिनीनत कृतज्ञ तर नाहीतच, शिवाय त्या पदाला शोभेल असं कधी वागल्याही नाहीत," पत्रकात स्पष्ट केलं.
सिनीनत यांचे सगळे अधिकार शाही तसंच सैनिकी पदं, त्यांचं शाही सुरक्षारक्षकांमधलं सन्मान राजांनी काढून घेतले आहेत.
राजे वाजिरालाँगकॉर्न 2016 मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर सिंहासनावर बसले.
राजाच्या माजी पत्नींचं काय?
राजे वाजिरालाँगकॉर्न यांना राणी सुथिदा यांच्याआधी तीन पत्नी होत्या. राजकुमारी सोमसावली या 1997 ते 1993 पर्यंत त्यांच्या पत्नी होत्या तर 1994 ते 1996 मध्ये युवाधिदा पोलप्रासेर्थ. 2001 ते 2014 दरम्यान स्रिरास्मी सुवादी त्यांच्या पत्नी होत्या आणि आता राणी सुथिदा.
सिनीनत यांना पदच्युत का केलं, याचं खरं कारण कधीही समजू शकणार नाही, कदाचित कारण थायलंडमध्ये शाही परिवाराच्या अंतर्गत गोष्टींबाबत अत्यंत गुप्तता बाळगली जाते. देशातल्या शाही कायद्याअंतर्गत राजेशाहीचा कोणत्याही प्रकारचा अपमान करणं किंवा त्याविषयी अनुद्गार काढणं गुन्हा आहे. जगातल्या सगळ्यांत कडक कायद्यांपैकी हा कायदा मानला जातो.
सिनीनत यांचं पदच्युत करणं राजांच्या आधींच्या पत्नींचे हक्क ज्याप्रकारे काढून घेतले, त्यासारखंच दिसतं आहे. 1996 मध्ये वाजिरालाँगकॉर्न यांची दुसरी पत्नी यांचेही सगळे हक्क, सन्मान अशाच प्रकारे काढून घेण्यात आले होते. राजा आणि त्यांच्या चार मुलांनाही शाही परिवारातून बेदखल करण्यात आलं होतं. या पत्नीने नंतर अमेरिकेत आश्रय घेतला.
2014 मध्ये राजाची तिसरी पत्नी स्रिरास्मी सुवादी यांच्यासोबतही असंच झालं. त्यांची सगळी पदं आणि सन्मान काढून घेतले, तसंच त्यांच्या शाही दरबारात येण्यावर बंदी घालण्यात आली. त्या दोघांना एक मुलगा आहे, जो सध्या राजाच्या देखरेखीखाली जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये शिकतो आहे.
राजे वाजिरालाँगकॉर्न यांनी आपल्या हाती सगळी सत्ता एकवटली आहे. त्यांच्या आधीच्या राजांच्या तुलनेत त्यांनी आपल्या अधिकारांची पकड घट्ट केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी राजधानी बँकॉकमधल्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या दोन सैनिक तुकड्यांची कमान आपल्या हाती घेतली आहे. राजाच्या हाती सैन्याचं असं केंद्रीकरण याआधी आधुनिक थायलंडमध्ये झालेलं नाही.