"लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं तरी त्या सरकारची गत 1996 सालच्या वाजपेयी सरकारसारखीच होईल. 13 ते 15 दिवसांत हे सरकार कोसळेल," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवारांनी 23 मे नंतरच्या राजकीय शक्यतांवर भाष्य केलं.
"यावेळी सत्तेवर येणारं सरकार त्रिशंकू नसेल. UPA म्हणा किंवा अन्य काही, पण समविचारी पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार देतील. भाजपच्या हातात सत्ता जाणार नाही," असंही पवार यांनी म्हटलं.
महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार असल्याचं भाकित पवारांनी वर्तवलं. सध्या महाराष्ट्रभर दुष्काळ दौरा करत असलेल्या पवारांनी सरकारविरोधात संतप्त जनमत असल्याचंही सांगितलं.