- श्रीकांत बंगाळे
“ललिताचा ललित झाला, ललित बाप झाला. मुलीचा मुलगा झाला, मुलगा बाप झाला.”
हे सांगताना ललित साळवेंच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. ललित बीडमध्ये राहतात.
ललित आणि त्यांची पत्नी सीमानं जानेवारी महिन्यात एका मुलाला जन्म दिला. पण, ललित यांच्यासाठी आतापर्यंतचा प्रवास प्रचंड संघर्षाचा राहिला.
ललिता साळवे ही ललित यांची 2020 पर्यंतची ओळख. लहानपणापासून आपल्या शरीरात काहीतरी गडबड आहे, असं ललिताला वाटत होतं. जननेंद्रियाजवळ काही गाठीसारखं जाणवल्यानं ललिता डॉक्टरांकडे गेली आणि ती स्त्री नसून पुरुष असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं.
2018 ते 2020 दरम्यान एकूण 3 शस्त्रक्रिया झाल्यानंतर ललिताला ललित साळवे अशी नवी ओळख मिळाली. त्यानंतर 2020 मध्ये ललितनं लग्न केलं.
ललित सांगतात, “मी लग्न करू शकतो का? असा प्रश्न मी डॉक्टरांना विचारला. तर ते म्हणाले की, तुम्हाला फीट वाटत असेल तर नक्की करू शकता. त्यानंतर मग मी लग्नाचा निर्णय घेतला. ”
14 फेब्रुवारी 2020 ला ललित यांनी संभाजीनगरमधील सीमा बनसोडे या तरुणीशी लग्न केलं. पण हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता.
ललित सांगतात, “एक काळ असा होता की, लोक मला म्हणायचे, मुलीचा मुलगा थोडंच होता येतं. हे काहीपण करतंय. लोक हसायचे, हेटाळणी करायचे. हिणवायचे. या सगळ्या गोष्टींना मला तोंड द्यावं लागलं. मी त्यामधून बाहेर पडलो. मी मुलीचा मुलगा झालो.
"त्याच्यानंतर लोक म्हणाले की याला पोरगी कोण देईल? याच्यासोबत कोण लग्न करेल? मी एका मुलीशी लग्न केलं. म्हटले ठीक आहे, पण याच्यानं लेकरं-बाळं थोडी होत असत्येत. पोरीनं आयुष्याचं वाटोळं करुन घेतलं म्हटले. पण आता मी बापही झालोय.”
लग्नाला तीन वर्षं पूर्ण झाल्यानंतर ललित आणि सीमा यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या गरोदरणाविषयी माहित झाल्यावर ललित यांच्या काय भावना होत्या?
“शब्दांमध्ये नाही व्यक्त करू शकत त्या भावना. ज्या दिवशी मला समजलं मिसेस प्रेग्नेंट आहे, माझा आनंद माझ्या गगनात मावत नव्हता. मी माझ्या आईला फोन करून सांगितलं. ज्याप्रमाणे प्रत्येक कपलचं ठरलेलं असतं की आताच कुणाला सांगायचं नाही, तसंच आमचंही ठरलेलं होतं.”
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर मात्र ललित यांच्या सगळ्या नातेवाईंकांना आणि परिचयाच्या लोकांना सीमा यांच्या गरोदरपणाविषयी माहिती झालं.
तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या, या प्रश्नावर ललित सांगतात, “ललित बाप होतोय? छे ! काही सांगतोय तो. लोक फोनवर विचारायचे की, अरे तू डोहाळेजेवण केलंय बायको प्रेग्नंट आहे म्हणून. काही म्हणायचे, यानं टेस्ट ट्यूब बेबी केलं असेल किंवा दुसरं काहीतरी केलं असेल. मुलीचा मुलगा होतोय, पण बाप कसा होऊ शकतो?”
“अरे ललित फोटो पाठव बरं डोहाळे जेवणाचा, व्हीडिओ टाक बरं. असंही लोक म्हणायचे. मग फोटो पाहून म्हणायचे की, अरे खरंच की. अभिनंदन.”
15 जानेवारी 2024 रोजी ललित आणि सीमा यांच्या बाळाचा जन्म झाला. तो दिवस आठवल्यावर ललित यांच्या अंगावर शहारे येतात.
“डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलवलं. आतमध्ये मी थरथरत्या पायांनी गेलो होतो. नेमकं काय झालं म्हटलं. गेलो तर बाळाच्या अंगावर कपडा होता. बाळ रडत होतं. डॉक्टरांनी त्याच्या अंगावरचा कपडा काढला आणि म्हणाले तुम्हाला मुलगा झालाय. खूप सुंदर. मी डॉक्टरांना हात जोडले. आजही ते आठवलं की अंगावर शहारे येतात.”
बाळाच्या जन्मासाठी टेस्ट ट्यूब किंवा आयव्हीएफ अशा कोणत्याही तंत्रज्ञानाचा आधार न घेतल्याचं ललित आवर्जून सांगतात. पण, ललित साळवेंचं बाप होणं इतर पुरुषांपेक्षा वेगळं कसं होतं?
ललित सांगतात, “वेगळं म्हणजे ज्या माणसाचं काही अस्तित्वच नव्हतं. तो कोणत्या घटकाचा होता, तो स्त्री आहे की पुरुष आहे, तो कोणत्या जातीचा आहे हेच स्पष्ट नव्हतं. अशी व्यक्ती पुढे जाऊन त्याचं अस्तित्व निर्माण करतो. त्याचं जग निर्माण करतो. तर ही फार मोठी गोष्ट आहे.”
ललित 2010 पासून पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलासाठी काही स्वप्नं पाहिली आहेत.
मुलगा मांडीवर घेऊन त्याच्याकडे पाहत ललित सांगतात, “इथपर्यंतचा माझा प्रवास संपला आहे. आता आम्हाला बाळाला घडवायचं आहे. तो सध्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. पण माझं स्वप्न आहे की, मी कॉन्स्टेबल आहे पण मला माझ्या मुलाला आयएएस, आयपीएस अधिकारी बनवायचं आहे. हे माझं समोरचं टार्गेट आहे.”
ललित सध्या इतर लोकांना मार्गदर्शन करत आहेत. लोक त्यांना फोन करून लिंग बदल शस्त्रक्रियेविषयीची विचारणा करतात. यात बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल, गुजरात या राज्यांमधील लोक आहेत.
याविषयी ललित सांगतात, “मी या लोकांना विचारतो की, तुम्हाला काय अडचण आहे. ते विचारतात की, मला तुमच्यासारखं करायचं आहे. मग मी त्यांना विचारतो की, का करायचं आहे? कशामुळे करायचं आहे? आई-वडिलांना माहितीये का, डॉक्टरांना दाखवलं का?
"या सगळ्या गोष्टींची शहानिशा करतो आणि खरंच फिमेल टू मेल करण्याची त्यांना गरज असेल तर त्यांना मार्गदर्शन करतो. त्यासाठी डॉक्टरांशी बोलतो.”
पण, यात सगळ्याच प्रकारचे लोक असल्याचाही उल्लेख ललित करतात. त्यासाठी ते एक उदाहरण देतात.
एका पुरुषाचं एका बाईवर प्रेम होतं. पण, त्या पुरुषाच्या पत्नीला माहिती पडल्यास ते एकमेकांसोबत राहू शकणार नाही अशी भीती या महिलेला होती. म्हणून मग तिनं ललितला फोन करुन फिमेल टू मेल सर्जरीबाबत विचारणा केली.
ललित यांनी या महिलेला सर्जरी करायचं कारण विचारल्यावर ती म्हणाली की, सर्जरीनंतर मी पुरुष होईल आणि मग मला प्रियकरासोबत राहता येईल.
तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींकडे समाजानं माणुसकीच्या नजरेनं पाहायला हवं, अशी अपेक्षा ललित व्यक्त करतात.
ते म्हणतात, “ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी, एलजीबीटी या लोकांकडे आपला समाज चुकीच्या नजरेनं बघतो. तुम्ही ज्या पद्धतीनं स्त्री म्हणून स्त्रीकडे बघता, पुरुष म्हणून पुरुषाकडे बघता. पण ट्रान्सजेंडर रस्त्यानी चालल्याच्यानंतरच तुम्हाला कुतूहल का वाटतं? तुम्हाला ललित साळवेचं का कुतूहल वाटतं?
"रस्त्यानं एखादा तृतीयपंथी चालला तर तुम्ही त्याला हिजडा म्हणून का हिणवता? तुम्ही त्याला माणूस म्हणून बघा.”
ललिताचा ललित आणि ललितचा बाप होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, असा प्रश्न विचारल्यावर ते सांगतात, “ललिताचा ललित म्हणजे महिलेचा पुरुष आणि पुरुषाचा बाप. हा माझा प्रवास प्रचंड संघर्षाचा होता. खूप लढाईचा होता. चार भींतींच्या आत रडायचा होता. दरवाज्याच्या बाहेर रस्त्यावरती लढायचा होता. खूप मोठा तो संघर्ष होता. त्यामधून आता ललित मुक्त झालेला आहे. खूप मोकळा श्वास घेतोय, खूप आनंदाने जगतोय.”